बंडखोर उमेदवारांच्या माघारीसाठी धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:44 PM2018-07-16T23:44:41+5:302018-07-16T23:44:47+5:30

Run for rebel candidates | बंडखोर उमेदवारांच्या माघारीसाठी धावाधाव

बंडखोर उमेदवारांच्या माघारीसाठी धावाधाव

Next


सांगली : महापालिका निवडणुकीत पक्षाने उमेदवारी डावलल्यानंतर बंडखोरी केलेल्या नाराजांचे मन परिवर्तन करण्यासाठी सोमवारी सर्व राजकीय पक्षांच्या मातब्बर नेत्यांची धावाधाव सुरू होती. थेट घरात जाऊन काही नेत्यांनी नाराजांची भेट घेतली, तर काहींशी दूरध्वनीवरून संपर्क साधत अर्ज मागे घेण्याच्या विनवण्या केल्या. काही नाराजांनी नेत्यांचा शब्द प्रमाण मानत माघारीची ग्वाही दिली, तर काहीजण अजूनही रिंगणात उतरण्यावर ठाम राहिल्याने नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
महापालिकेच्या ७८ जागांसाठी १ आॅगस्टला मतदान होत आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात बंडखोरी उफाळून आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे. छाननीनंतर एकूण ९१६ उमेदवार रिंगणात आहेत. यात काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी, भाजप, शिवसेना, जिल्हा सुधार समिती, स्वाभिमानी विकास आघाडी या अधिकृत पक्षांचे २२५ उमेदवार रिंगणात असून, उर्वरित उमेदवार अपक्ष आणि इतर पक्षांचे आहेत. अनेक प्रभागांत नाराजांनी बंडखोरी केल्यामुळे त्यांची मनधरणी करण्याचे दिव्य पार पाडावे लागत आहे. आज, मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सोमवारी दिवसभर नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. पक्षांच्या उमेदवारांसोबत नेत्यांनीही यासाठी मैदानात उडी घेतली होती.
काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील ‘अस्मिता’ बंगल्यावर ठाण मांडून होते. काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाल्याने अनेक मातब्बरांना डच्चू मिळाला आहे. त्यामुळे सर्वाधिक बंडखोरी काँग्रेसमध्ये झाली आहे. या नाराजांना बंगल्यावर बोलावून त्यांच्याशी चर्चा केली जात होती. अनेकांनी उमेदवारी डावलल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काहींनी नाखुशीने अर्ज माघार घेण्याची तयारी दर्शविली. काही नाराजांशी आ. कदम यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून मनधरणी केली.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, कमलाकर पाटील यांनी सांगली व मिरजेतील पक्षाच्या नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न चालविला होता. बजाज व श्रीनिवास पाटील यांनी मिरजेत नाराजांची थेट भेट घेतली. आमदार जयंत पाटील यांच्याशी काहीजणांचे बोलणे करून देण्यात आले, तर जगदाळे व कमलाकर पाटील सांगलीत नाराजांची भेट घेत होते.
राष्ट्रवादीकडून १५० जणांनी बंडखोरी केली आहे. त्यापैकी १२५ नाराजांची समजूत काढण्यात यश आल्याचे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले. भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे यांनी बंडखोरांची भेट घेऊन त्यांना विनवण्या केल्या. इनामदार तर थेट उमेदवारांच्या घरापर्यंत गेले.
नगरसेवकपदाचे उद्दिष्ट गाठण्यात अडचणीच्या ठरणाऱ्या अपक्षांचा शोध घेत, उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू असतानाच दुसरीकडे प्रतिस्पर्ध्याची मते खात आपल्या उमेदवाराला सुरक्षित करणाºया बंडखोरांना चिथावण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी बंडोबांना शांत केल्याचा दावा केला असला तरी नेमके चित्र मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच स्पष्ट होईल.
दिवसभरातील घडामोडी
१ काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम व राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यात सकाळी बैठक. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना ‘अस्मिता’ बंगल्यावर बोलावून प्रभागातील अडचणी, बंडखोरीचा आढावा.
२ दुपारी बारानंतर काँग्रेसच्या नाराजांना बंगल्यावर बोलावून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हेही यावेळी उपस्थित.
३ राष्ट्रवादीचे संजय बजाज, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे यांची सांगली व मिरजेत नाराजांची समजूत काढण्यासाठी पळापळ. नाराजांच्या प्रत्यक्ष भेटीवर राष्ट्रवादीचा जोर.
४ भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार यांच्याकडून नाराजांना प्रत्यक्ष भेटून विनवण्या. भविष्यात नाराजांना चांगली संधी देण्याची ग्वाही.

Web Title: Run for rebel candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.