Raju Shetty, Jayant Patil's 'Target' Sadabhau: BJP also offers Khot | राजू शेट्टी, जयंत पाटील यांचे ‘टार्गेट’ सदाभाऊ : भाजपसमोरही खोत यांचाच पर्याय उपलब्ध
राजू शेट्टी, जयंत पाटील यांचे ‘टार्गेट’ सदाभाऊ : भाजपसमोरही खोत यांचाच पर्याय उपलब्ध

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभेचे राजकारण

अशोक पाटील ।
इस्लामपूर : हातकणंगले लोकसभा आणि इस्लामपूर मतदारसंघात खासदार राजू शेट्टी आणि आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात कोण लढणार? यावर आजही भाजप, शिवसेनेपुढे ठोस असे उत्तर नाही. परंतु शेट्टी आणि पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत हेच उमेदवार असावेत, जेणेकरून लढत रंगेल, अशाच भावना राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून उमटू लागल्या आहेत.

वाळवा - शिराळ्यात राष्ट्रवादीविरोधात भाजपची जबाबदारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे आली आहे. शिराळ्यात भापजकडे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली ताकद आहे. परंतु मंत्रीपद मिळाले नाही, त्यामुळे आमदार नाईक गट अस्वस्थ आहे. दुसरीकडे भाजपचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि स्वाभिमानी पक्षाचे नारायण राणे महाडिक गटाला ताकद देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे खोत यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणि भाजपच्या नेत्यांना इस्लामपूर मतदारसंघ महत्त्वाचा वाटतो. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे कोणत्याही परिस्थितीत पानिपत करण्याचा डाव भाजपने आखला आहे. यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे शेट्टी यांच्याविरोधात तगडा उमेदवार आजही भाजपकडे नाही. यावर पर्याय म्हणून शिवसेनेत नुकतेच आलेले धैर्यशील माने यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. परंतु शेट्टी यांच्याविरोधात सदाभाऊ खोत हेच उमेदवार असावेत, अशी इच्छा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

जशी अवस्था लोकसभा मतदार संघाची आहे, तशीच अवस्था इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचीही आहे. जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपकडे तगडा उमेदवार नाही. पहिल्या टप्प्यात मंत्री खोत यांनी इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये घेऊन आमदारकीची स्वप्ने दाखवली आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु याला मंत्री खोत यांचा हिरवा कंदील नाही. त्यातच महाडिक गटाची भूमिकाही महत्त्वाही आहे. जुने भाजपचे नेते विक्रमभाऊ पाटील हे सुद्धा निशिकांत पाटील यांचे नेतृत्व मानत नाहीत. त्यामुळे भाजपची ताकद विभागली गेली आहे.

पेठनाक्यावरील महाडिक गट जयंत पाटील यांचे पारंपरिक विरोधक असल्याचे मानतात. परंतु शिराळा आणि इस्लामपूर मतदारसंघात महाडिक गट कार्यरत आहे. जास्त करून शिराळा मतदारसंघात या गटाचे वर्चस्व आहे. त्यामुळे सम्राट महाडिक यांनी विधानसभा लढवण्याचा निर्धार केला आहे, तर त्यांचे बंधू राहुल महाडिक यांना इस्लामपूर मतदार संघात स्वारस्य आहे. त्यामुळे आजही महाडिक गटाची भूमिका अस्पष्ट असल्यासारखी जाणवते, असे राजकीय जाणकारांना वाटते.

यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रकांत पाटील हे महाडिक गटाशी संपर्क ठेवून आहेत, तर जयंत पाटील यांच्याविरोधात वैभव नायकवडी यांच्यासारखे नेतृत्व भाजपमध्ये घेण्याचा डाव आखला जात आहे. दुसरीकडे वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनाही आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे सध्या तरी जयंत पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार नाही. म्हणूनच खोत यांनी विधानसभा लढवावी आणि आपली ताकद दाखवावी, अशीही हवा मतदारसंघात वाहू लागली आहे.


Web Title: Raju Shetty, Jayant Patil's 'Target' Sadabhau: BJP also offers Khot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.