सांगली : जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समितींच्या निवडणूक प्रचाराची सांगता रविवार, १९ फेब्रुवारीला होत आहे. प्रचारासाठी नेते व कार्यकर्त्यांना आता केवळ दोनच दिवस मिळणार असल्यामुळे, वेगवान घडामोडी सुरू आहेत. काँग्रेसच्या प्रचाराची सांगता स्थानिक नेत्यांच्या सभांनी, राष्ट्रवादीची प्रचारसांगता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभेने, तर भाजपच्या प्रचाराची सांगता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सभेने होणार आहे.
निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ दोनच दिवस शिल्लक राहिल्यामुळे नेते व उमेदवारांनी कोपरा सभा, पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटी, जाहीर सभांचा धूमधडाका उडवून दिला आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि रयत विकास आघाडीने नेत्यांच्या सभा घेऊन व्होट बँक खेचण्यासाठी प्रयत्न केले आहेत. निवडणुकीने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांनी स्थानिक पातळीवर आघाड्या केल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक पक्षाची आघाडी वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांबरोबर झाली आहे. सर्वच पक्षांनी तत्त्वे बाजूला ठेवून आघाड्या केल्यामुळे, राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या बगल दिली आहे. राजकीय पक्षांवरील आरोप-प्रत्यारोपांना मर्यादा आल्या आहेत. निवडणुकीसाठी जिल्हा, तालुका हा घटक आता राहिलेला नाही. मतदारसंघ हाच घटक झाला आहे.
भाजपकडून मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांच्या प्रचार सभा जिल्ह्यात होणार होत्या. यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सभा वगळता कुणाच्याही सभा झाल्या नाहीत. शिराळा व खरसुंडी (ता. आटपाडी) येथे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जाहीर सभेने प्रचाराची सांगता होणार आहे.
राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री जयंत पाटील यांनी सांभाळली आहे. गुरुवारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या तासगाव आणि जत तालुक्यात दोन सभा झाल्या. उर्वरित एकही नेता जिल्ह्याकडे फिरकलेला नाहीत.
काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ जत तालुक्यातून युवा नेते नीलेश राणे यांच्या सभेने झाला. परंतु, त्यानंतर काँग्रेसच्या प्रचाराची धुरा माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, मोहनराव कदम, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई मदन पाटील, माजी आ. सदाशिवराव पाटील, सत्यजित देशमुख सांभाळत आहेत.
सर्वच पक्षांनी स्टार प्रचारकांच्या सभांना बगल दिली असून, स्थानिक नेतेमंडळी व उमेदवारांनीच प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचून मतदारांची भेट घेण्यावर भर दिला आहे.
शिवसेना, रयत विकास आघाडी, अपक्षांनीही प्रचारात आघाडी घेतली असून, काही ठिकाणी ते चमत्कार घडविण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)