सांगली महापालिकेसाठी राजकीय महायुध्द सुरू : भाजपची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:57 PM2018-06-25T23:57:11+5:302018-06-26T00:00:26+5:30

महापालिकेच्या रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना गती आली आहे

 Political World War for Sangli Municipal Corporation: BJP's Test | सांगली महापालिकेसाठी राजकीय महायुध्द सुरू : भाजपची कसोटी

सांगली महापालिकेसाठी राजकीय महायुध्द सुरू : भाजपची कसोटी

Next
ठळक मुद्दे काँग्रेसची सत्ता राखण्याची, तर राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी लढाई; सुधार समितीचे आव्हान

सांगली : महापालिकेच्या रणधुमाळीला सोमवारपासून सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच राजकीय पक्षांच्या हालचालींना गती आली आहे. विद्यमान सत्ताधारी काँग्रेससमोर सत्ता टिकविण्याची, तर विरोधी राष्ट्रवादीसमोर अस्तित्व टिकविण्याची लढाई आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपची या निवडणुकीत खरी कसोटी लागणार असून या पक्षाचे सध्या केवळ दोन सदस्य आहेत व त्यांच्यासमोर ही संख्या ४० वर नेण्याचे दिव्य असेल.

गेल्या महिन्याभरापासून महापालिकेच्या निवडणुकीची चर्चा रंगली होती. गतवेळी ७ जुलैला मतदान झाले होते. त्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू झाली. पण यंदा जून महिन्याचा तिसरा आठवडा उजाडला तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होत नव्हता. अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका सत्तासिंहासनाच्या युद्धाचा शंखनाद केला.

सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोगाने तयारीचा आढावा घेतला. त्याचवेळी आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्याचे जाहीर केले. सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. गत निवडणुकीत काँग्रेसला ४३ जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादीला २६ (सहयोगी सदस्यांसह). स्वाभिमानी आघाडीला ११ जागांवर समाधान मानावे लागले होते. गेल्या पाच वर्षात कृष्णेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. काँग्रेसअंतर्गत संघर्ष, सुंदोपसुंदीने विकासाला गती देता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विरोधक की सत्ताधारी अशीच राहिली, तर स्वाभिमानी आघाडीही अस्तित्वासाठी झुंजत होती.

गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात भाजपने राजकीय मांड पक्की केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रथमच मोठ्या प्रमाणात कमळ फुलले आहे. आता काँग्रेसच्या ताब्यातील एकमेव सत्तास्थान असलेल्या महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या हालचालीही गतिमान झाल्या आहेत.

शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. काही प्रभागांमध्ये त्यांचेही मतदार असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांचा परिणाम होणार आहे. जिल्हा सुधार समिती व आम आदमी पक्षाने स्वतंत्र आघाडी करीत मैदानात उतरण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत बहुरंगी लढतींचे चित्र दिसत आहे.

महापौरपद : ओबीसी महिलेला
आगामी महापौरपद नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) महिलेसाठी आरक्षित आहे. एकूण २० प्रभागांतील अकरा जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे या प्रभागातील लढतींना मोठे महत्त्व येणार आहे. हे अकरा प्रभाग सोडून सर्वसाधारण प्रवर्गातून एखादी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला निवडून आल्यास तीदेखील महापौर पदाची दावेदार ठरू शकते. परंतु तशी संधी मिळण्याची शक्यता फारच धूसर असते. नागरिकांचा मागास वर्ग महिलांसाठी आरक्षित झालेले प्रभाग असे : प्रभाग १, २, ४, ७, ८, १०, १४, १५, १७, १८ व १९.

१४२ सैनिक करणार मतदान
महापालिका निवडणुकीसाठी प्रथमच सैनिकांना मतदान करता येणार आहे. तशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. महापालिका क्षेत्रात १४२ सैनिक आहेत. त्यांची नावे मतदार यादीत असली तरी, त्यांचे पत्ते अद्याप प्रशासनाला मिळालेले नाहीत. त्यामुळे या सैनिकांना नेमक्या कोणत्या प्रभागाच्या मतपत्रिका पाठवायच्या, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे संबंधित सैनिकांनी त्यांचा राहण्याचा पत्ता जिथे असेल त्याची माहिती मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे आवश्यक त्या पुराव्यानिशी द्यावी. त्यानुसार त्यांचा त्या प्रभागात समावेश होणार आहे, असे आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी सांगितले.


सव्वाचार लाख मतदार
महापालिकेसाठी ४ लाख २३ हजार ३६६ मतदार आहे. यात २ लाख १५ हजार ८९ पुरुष, २ लाख ८ हजार २४० स्त्री व इतर ३७ मतदारांचा समावेश आहे. अंतिम मतदार यादी २ जुलैला प्रसिद्ध होणार आहे.

Web Title:  Political World War for Sangli Municipal Corporation: BJP's Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.