कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:07 AM2017-11-22T00:07:31+5:302017-11-22T00:07:31+5:30

Police custody of four along with Kamte extended | कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत वाढ

googlenewsNext


सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे मृत्यूप्रकरणी अटकेत असलेला बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने मंगळवारी दोन दिवसांची वाढ केली. गुन्ह्यातील दोरी, संशयितांचे मोबाईल व दुचाकी जप्त करायची असून, अमोल भंडारेला कृष्णा नदीच्या घाटावर घेऊन बसलेल्या दोन संशयितांचा शोध घ्यायचा असल्याने, ‘सीआयडी’ने कोठडी वाढवून घेतली.
सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना लुटमारीच्या गुन्ह्यात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला ‘थर्ड डिग्री’चा वापर करून बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे नेऊन जंगलात जाळला होता. याप्रकरणी युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलीस झाकीर पट्टेवाले यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना १३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी सकाळी अकरा वाजता त्यांना मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती पी. पी. खापे यांच्या न्यायालयात उभे केले होते. सरकारतर्फे अ‍ॅड. उज्ज्वला आवटे, ‘सीआयडी’चे पोलीस उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला. संशयितांपैकी कोणीही अजून वकील दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यातर्फे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अ‍ॅड. आर. पी. पाटील यांनी बाजू मांडली.
अ‍ॅड. उज्ज्वला आवटे, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, अनिकेतवर ‘थर्ड डिग्री’ वापरताना त्याला उलटा टांगण्यासाठी वापरलेली दोरी जप्त करायची आहे. संशयितांनी गुन्ह्यात चार वाहनांचा वापर केला आहे. त्यापैकी तीन वाहने जप्त केली आहेत. अजूनही एक दुचाकी जप्त करायची आहे. त्यांचे मोबाईलही जप्त करायचे आहेत. अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी काहीजणांना मोबाईलवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली आहे. हे लोक कोण आहेत, याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलचे ‘कॉल डिटेल्स’ काढावे लागणार आहेत. ‘कॉल डिटेल्स’ काढून संबंधितांना चौकशीसाठी बोलाविले जाणार आहे. कामटेच्या नखांचे नमुने तपासणीसाठी घ्यायचे आहेत, यासाठी संशयितांच्या पोलीस कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करावी. अ‍ॅड. आर. पी. पाटील यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, संशयितांना १३ दिवसांची कोठडी दिली होती. तपासाला हा कालावधी पुरेसा होता. त्यामुळे आणखी कोठडीची गरज नाही. न्यायाधीश पी. पी. खापे यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून कामटेसह सहाजणांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.

Web Title: Police custody of four along with Kamte extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा