Pets of sparrows unfriendly by animals: - The events of Sangli | प्राणीमित्रांनी मुक्त केले चिमणीच्या पिलांना - : सांगलीतील घटना
प्राणीमित्रांनी मुक्त केले चिमणीच्या पिलांना - : सांगलीतील घटना

ठळक मुद्देएकमेकांना चिकटलेले दोन्ही पिलांचे पाय केले वेगळे; इन्साफ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना यश

सांगली : माणसाचा सहजीवी म्हणून चिमण्यांची ओळख असली तरी, चिमण्यांच्या घटत्या संख्येची चिंता व्यक्त होत आहे. चिमणी संवर्धनाच्या मोहिमा आखल्या जात असताना, अ‍ॅनिमल फाऊंडेशनच्या पथकाने मंगळवारी पाय चिकटलेल्या दोन चिमण्यांची मुक्तता करीत, त्यांचे विहाराचे स्वप्न साकार केले.

शिवोदयनगरमधील घराबाहेर एका बंद दुचाकीच्या हेडलाईट कव्हरच्या मोकळ्या जागेत चीरक (इंडियन रॉबिन) या चिमणीने घरटे बांधले. विणीचा हंगाम सुरू असल्याने लगबगीने हे घरटे तयार केले. तिला दोन पिली झाली. चोचीत अन्न, पाणी आणून ती पिलांना भरवायलाही लागली. पिली उडण्याच्या अवस्थेला आल्यानंतर किलबिलाट सुरू झाला. पिली उडायचा प्रयत्न करायची आणि खाली पडायची. पुन्हा त्यांना त्यांच्या घरट्यात सोडले, की पुन्हा तोच प्रकार व्हायचा. त्या दोन्ही पिलांचा एक पाय एकमेकांना जन्मजात चिकटला होता. पिले खाली पडली की कुत्री, मांजरी त्यांच्यावर ताव मारण्यासाठी टपून बसलेली असायची. त्यामुळे पिलांच्या आईचा जीव टांगणीला लागला होता.

तेथील नागरिकांनी इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर यांच्याशी संपर्क साधला. मुजावर यांच्यासह मंदार शिंपी व जावेद शेख या प्राणीमित्रांनी तातडीने धाव घेतली. घरट्यातून पिलांना बाहेर काढले आणि पाहणी केली, तर दोन्ही पिलांचे पाय चिकटले होते. त्यातच एक दोराही अडकल्याने एका पिलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. प्राणीमित्रांनी अत्यंत कष्टाने व अलगदपणे दोन्ही पिलांना स्वतंत्र केले. एका चिमणीच्या पायाला कापड बांधून दोघांनाही घरट्यात पूर्ववत ठेवण्यात आले. दोन्ही पिलांना जीवदान मिळाले. इन्साफ फाऊंडेशनच्या या कार्यकर्त्यांनी चिमणीच्या घरट्यातील हानिकारक धागेही बाजूला केले.

काय आहे पक्ष्याचे वैशिष्ट्य...
हा पक्षी झुडपी रानात, तसेच शहरात आणि खेडेगावामध्येही दिसतो. या पक्ष्याचा मुख्य आहार म्हणजे किडे, कोळी. या पक्ष्याची शेपटी उभारलेली असते आणि पंख शेपटीच्या बाजूंवर पाडलेले असतात. नर काळा कुळकुळीत, तर मादी तपकिरी रंगाची असते.
 

घरट्यात पुन्हा किलबिल
प्राणीमित्रांकडून पिलांवर उपचार सुरू असताना तसेच पिलांचीही वेदनेने तडफड होत असताना तिच्या आईच्या जिवाची घालमेल सुरू होती. पिलांसाठी तिचा आरडाओरडा सुरू होता. पिली सुखरूप व स्वतंत्र होऊन घरट्यात परतल्यानंतर मात्र लगेचच तिने चोचीतून अन्न आणून पिलांना भरविले. बराच वेळ शांत असलेल्या घरट्यात पुन्हा किलबिलाट सुरू झाला.


Web Title: Pets of sparrows unfriendly by animals: - The events of Sangli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.