गावकुसाबाहेरील मुलांसाठी गावकऱ्यांचा पदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:17 PM2018-07-15T23:17:30+5:302018-07-15T23:17:34+5:30

Patron of villagers for children outside the village | गावकुसाबाहेरील मुलांसाठी गावकऱ्यांचा पदर

गावकुसाबाहेरील मुलांसाठी गावकऱ्यांचा पदर

Next

शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परिस्थितीने तडे जात असल्याचेही वास्तव पाहायला मिळते. बेळंकीतील ग्रामस्थांच्या हृदयाला या मुलांच्या स्वप्नांनी ‘इरादा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साद घातली आणि गावकुसाबाहेरील या मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी त्यांना पदरात घेतले.
दररोज सुया, बिब्बे, पिना, कंगवे, टिकल्या विकून कुटुंबाची होणारी गुजराण...आजच्या आधुनिक जमान्यात सुया, बिब्बे या वस्तूंनाही कमी झालेली मागणी...ज्याचा संपूर्ण गावाला आदर त्या मरिआईचा गाडाही आता विसावलेलाच...त्यामुळे हाताचा आणि पोटाचा मेळ घालताना होणारी घुसमट गावकुसाबाहेरचा मरिआईवाले समाज भोगत असतो.
बेळंकीमध्ये मरिआईवाले समाजातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. या समाजातील छाया भगवान मरिआईवाले या मुलीचे सातवीपर्यंतचे शिक्षण बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. आता पुढेच खरा संघर्ष छायाला अनुभवास येणार होता. तिला हायस्कूलला जाण्याची इच्छा होती. दररोज सुया, बिब्बे, टिकल्या विकून तिची आई कुटुंब चालवित आहे. शाळा नसताना छायासुध्दा आईबरोबर जात असे.
हातावरचे पोट असणाºया उपेक्षित समाजातील छायाला शिक्षणासाठी वह्या, शैक्षणिक साहित्य, गणवेशाचीही भ्रांत होती. त्यामुळे तिला शिक्षण बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बाब जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर यांनी इरादा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांना सांगितली. यावर ‘इरादा’चे स्वप्नील कोरे, सुभाष जाधव, डॉ. शरद गायकवाड, अनिरुध्द गवाणे, अक्षय कांबळे, वैभव रणदिवे या तरुणांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी त्या समाजातील मुलांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप केले.
बेळंकीचे सरपंच राजाराम गायकवाड, माजी सरपंच पांडुरंग कोरे, श्रीराम उद्योग समूहाचे राजू गवाणे, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे, सुरेश कौलापुरे, केंद्रप्रमुख सुभाष पवार, मुख्याध्यापक पुष्पा मुळे, बेळंकी शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर, नवनाथ नरळे आदींच्या उपस्थितीत छायाला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या समाजातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा निरंतर पोहोचविण्याचा इरादा बेळंकीकरांच्या दानशूरपणाचे उदाहरणच ठरले आहे.
‘त्या’ मुलांना शिक्षित करणार
परिस्थिती आणि आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहणाºया मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ‘इरादा’चा एक प्रयत्न सुरू आहे. त्याची सुरुवात छायाच्या शाळाप्रवेशापासून झाली. गावातील मरिआईवाले समाजातील १२ मुले शिक्षण घेत आहेत. इयत्ता ७ वी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणानंतर इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ‘इरादा’ने घेतली आहे.
‘छाया’ ठरणार आदर्श
बेळंकीतील मरिआईवाले या समाजाच्या संपूर्ण पिढीतील ‘छाया’ ही पहिली मुलगी इयत्ता सातवीपुढील शिक्षण घेत आहे. तिच्यानंतर विविध इयत्तेत आठ ते दहा मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्या सर्वांपुढे ‘छाया’ आदर्श ठरणार आहे.

Web Title: Patron of villagers for children outside the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.