Patangrao, Jayantrao should take care of their own: Chandrakant Patil - Sangli municipal corporation will win BJP - all seats in Vidhan Sabha elections | पतंगराव, जयंतरावांनी आपापलं सांभाळावं : चंद्रकांत पाटील--सांगली महापालिका भाजप जिंकणारच- विधानसभा निवडणुकीत सर्व जागा आमच्याचर्

सांगली : भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्याने, सांगली महापालिका निवडणूक किस झाड की पत्ती! जिल्ह्याचे आजवर नेतृत्व करणारे पतंगराव कदम, जयंत पाटील, ज्यांना आपापल्या विधानसभा मतदार संघातील नगरपालिका, पंचायत समित्या वाचवता आल्या नाहीत, त्यांनी महापालिका निवडणुकीत लक्ष घालू नये. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप एकही जागा सोडणार नसून, सांगली महापालिका भाजपच जिंकणार असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत केले.

माजी आमदार दिनकरतात्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात पाटील बोलत होते. पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले की, आर. आर. पाटील यांच्या ताब्यात असलेली तासगाव नगरपालिका संजयकाकांनी ताब्यात घेतली. इस्लामपुरातील नगरपालिका जयंत पाटलांकडून ताब्यात घेतली. तसेच कडेगावमध्ये पतंगराव कदम यांच्याकडून पंचायत समिती ताब्यात घेतली. त्यामुळे पतंगराव व जयंतराव यांनी महापालिकेत लक्ष घालू नये. त्यांनी आपापली विधानसभेची जागा सांभाळण्यासाठी प्रयत्न करावेत.

पालकमंत्री सुभाष देशमुख म्हणाले की, सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या चालू असलेल्या कामकाजामुळे जनतेत भाजपबद्दल विश्वास वाढतो आहे. ७० वर्षे कॉँग्रेसला न करता आलेली कामे भाजप करत आहे. संपूर्ण देश भाजपमय होत असल्याने, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाला कोणतीही अडचण नाही.
यावेळी पाटील व देशमुख यांच्याहस्ते चांदीची तलवार देऊन दिनकरतात्या पाटील यांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

२४ तास पाणी, ‘स्मार्ट सिटी’साठी बांधील
महापालिका क्षेत्रात शुध्द पाण्याबरोबरच उघड्या गटारींसह इतरही समस्या आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात चोवीस तास स्वच्छ व शुध्द पाणी, बंदिस्त गटारी देण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे महसूल मंत्री पाटील यांनी सांगितले.

आता दर आठवड्याला सांगलीत
माझ्या कामाची पध्दत वेगळी असून, सभा घेण्याऐवजी घरा-घरात जाऊन भेटींवर माझा भर असतो. त्यामुळे पुढील आठवड्यापासून दर आठवड्याला सांगलीत येणार असून, पालकमंत्री देशमुख यांनीही आपले बिºहाड हलवावे. एक खासदार, दोन आमदार असताना, सत्ता यायला कोणतीही अडचण नाही, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.


Web Title:  Patangrao, Jayantrao should take care of their own: Chandrakant Patil - Sangli municipal corporation will win BJP - all seats in Vidhan Sabha elections
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.