नगरसेवकांच्या भाजप प्रवेशास अंतर्गत विरोध-खासदार गटाकडून खो : विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:12 AM2018-05-22T00:12:40+5:302018-05-22T00:12:40+5:30

सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अकरा आजी-माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेशाचा बेत सोमवारी बारगळला. या नगरसेवकांच्या प्रवेशाला आता खासदार संजयकाका पाटील गटाकडूनही विरोध सुरू झाल्याची

Opposition under the entry of the corporators of the corporators - Report from the MP that the group is not being taken into confidence | नगरसेवकांच्या भाजप प्रवेशास अंतर्गत विरोध-खासदार गटाकडून खो : विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार

नगरसेवकांच्या भाजप प्रवेशास अंतर्गत विरोध-खासदार गटाकडून खो : विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार

Next

शीतल पाटील ।
सांगली : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीमधील अकरा आजी-माजी नगरसेवकांचा भाजप प्रवेशाचा बेत सोमवारी बारगळला. या नगरसेवकांच्या प्रवेशाला आता खासदार संजयकाका पाटील गटाकडूनही विरोध सुरू झाल्याची चर्चा पक्षांतर्गत वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी हे नगरसेवक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार होते, पण मुख्यमंत्रीच दिल्लीला निघाल्याने त्यांच्यासोबतची बैठक आठवडाभर लांबणीवर पडली आहे.

महापालिका निवडणुका जुलै महिन्यात होत आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनेने तयारी सुरू केली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीतील २५ नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात होता. पण राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार जयंत पाटील यांची निवड झाल्यानंतर अनेक नगरसेवकांनी भाजप प्रवेश लांबणीवर टाकला आहे. त्यातूनही मिरजेतील काही नगरसेवक मात्र सातत्याने भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. गेल्याच आठवड्यात नगरसेवक सुरेश आवटी यांच्या नेतृत्वाखाली अकरा नगरसेवकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन चर्चा केली. यात काँग्रेसचे माजी महापौर व रिपाइंचे प्रदेश सचिव विवेक कांबळे, आनंदा देवमाने, नगरसेवक शिवाजी दुर्वे, माजी नगरसेवक महादेव कुरणे यांचा प्रामुख्याने समावेश होता.

गेल्या सहा महिन्यांपासून आजी-माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. सुरुवातीला मिरजेतील भाजपच्या निष्ठावंत गटाकडून प्रवेशाला विरोध झाला. तेच ते चेहरे देण्याऐवजी समाजातील वकील, डॉक्टर, उद्योजक, व्यापारी अशा प्रतिष्ठितांना भाजपकडून उमेदवारी देऊन निवडून आणावे, किमान महापालिकेच्या विकासाला दिशा मिळेल, असा तर्क निष्ठावंत गटाकडून लावला जात होता. पण भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निष्ठावंत गटाची समजूत काढल्याने त्यांचा विरोध मावळला. त्यानंतर पुन्हा एकदा या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरू लागली होती. पण आता त्याला खासदार गटाकडून विरोध सुरू झाला आहे.

खा. पाटील यांनी प्रत्यक्षात त्यावर कधीच भाष्य केले नसले तरी, महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत खासदार गटाला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे हा गट नाराज असल्याचे समजते. नगरसेवकांच्या प्रवेशाबाबत खासदार संजयकाका पाटील यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार या गटाची आहे. त्यामुळे या गटाने पक्षश्रेष्ठींकडेच तक्रार करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपवासी होणाऱ्या या नगरसेवकांच्या प्रवेशाला काहीसा ब्रेक लागला आहे.

मुख्यमंत्र्यांची बैठक : लांबणीवर
दरम्यान, भाजप प्रवेशासाठी इच्छुक अकरा आजी-माजी नगरसेवकांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचे नियोजन केले होते. या भेटीत त्यांचा भाजप प्रवेश करण्यात येणार असल्याची चर्चाही दिवसभर होती. पण मंगळवारची त्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला जाणार असल्याने पुढील आठवड्यात ही बैठक घेण्याचा निरोप या नगरसेवकांना देण्यात आला आहे.
 

मुख्यमंत्र्यांच्या सभेत प्रवेश?
येत्या ४ व ५ जून रोजी भाजपच्या राज्य कार्यकारिणी समितीची बैठक सांगलीत होत आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, सुरेश प्रभू यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. ४ जून रोजी स्टेशन चौकात मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. या सभेत या नगरसेवकांचा प्रवेश घेण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी खासदार गटाचा विरोध संपवावा लागेल. अन्यथा प्रवेशावरून भाजपमध्ये महाभारत घडेल, असेही बोलले जात आहे.

Web Title: Opposition under the entry of the corporators of the corporators - Report from the MP that the group is not being taken into confidence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.