‘वालचंद’च्या शिवोत्सवावर शोककळा! महाविद्यालयात सन्नाटा स्वागताऐवजी श्रद्धांजली वाहण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 01:41 AM2018-02-20T01:41:22+5:302018-02-20T01:41:39+5:30

सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचा शिवज्योत आणतानाच अपघाती मृत्यू झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमावर शोककळा पसरली.

 The mourning of 'Walchand'! Time to celebrate the tribute instead of silence in the college | ‘वालचंद’च्या शिवोत्सवावर शोककळा! महाविद्यालयात सन्नाटा स्वागताऐवजी श्रद्धांजली वाहण्याची वेळ

‘वालचंद’च्या शिवोत्सवावर शोककळा! महाविद्यालयात सन्नाटा स्वागताऐवजी श्रद्धांजली वाहण्याची वेळ

googlenewsNext

सचिन लाड ।
सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचा शिवज्योत आणतानाच अपघाती मृत्यू झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती कार्यक्रमावर शोककळा पसरली. शिवज्योतीचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून टिळक सभागृहापर्यंत रांगोळी घातली होती; पण अपघाताचे वृत्त येताच महाविद्यालात सन्नाटा पसरला. शिवज्योतीच्या स्वागताच्या प्रतीक्षेतील प्राध्यापक व विद्यार्थ्यांवर अपघातातील मृतांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रसंग ओढवला.

येथील वालचंद अभियंत्रिकी महाविद्यालयाचा देश-परदेशात लौकीक आहे. देशभरातून आलेले विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून शिवजयंती जल्लोषात साजरी करतात. यंदाही ती साजरी करण्यासाठी गेल्या आठ दिवसांपासून विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होती. दरवर्षीपेक्षा यंदा मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे नियोजन केले होते. पन्हाळा (जि. कोल्हापूर) येथून शिवज्योत आणली जाणार होती. मात्र, ती घेऊन येताना सुशांत पाटील, केतन खोचे, अरुण बोंडे, सुमित कुलकर्णी व प्रणित त्रिलोटकर, प्रतीक संकपाळ या सहा भावी अभियंत्यांचा अपघातात मृत्यू झाला, तर १७ विद्यार्थी जखमी झाले.

पुणे-बंगलोर राष्टÑीय महामार्गावर नागावफाटा येथे पहाटे साडेचारला झालेल्या या भीषण अपघाताचे वृत्त पहाटे साडेपाचला महाविद्यालयात येऊन धडकले. त्याचा प्राध्यापक, विद्यार्थ्यांना धक्का बसला. सर्वजण महाविद्यालयातील सेक्टर कार्यालयात जमा झाले. पहाटेपासून कोण-कोण विद्यार्थी शिवज्योत आणण्यास गेले होते, याची यादी बनविण्याचे काम सुरू झाले. एमटीई सोसायटीचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, संचालक व प्राचार्य जी. व्ही. परिशवाड, प्रा. राजेंद्र भोसले, तहसीलदार शरद पाटील, प्रांताधिकारी विकास खरात व काही विद्यार्थी कोल्हापूरला रवाना झाले.

रांगोळी, भगवे ध्वज पडून
वालचंद महाविद्यालयात प्रत्येकवर्षी विद्यार्थी शिवजयंती साजरी करतात. पन्हाळा येथून शिवज्योत आणली जाते. यावर्षी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्याचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी स्वत:सह प्राध्यापकांकडूनही वर्गणी गोळा केली होती. टिळक सभागृहामध्ये शिवजयंती साजरी केली जाणार होती. सभागृहासमोरील इमारतीवर शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा मोठा फलक लावला होता. रविवारी सायंकाळी पोवाड्याचा कार्यक्रम झाला होता. सोमवारी शिवज्योतीचे स्वागत, व्याख्यान व भोजनाचा कार्यक्रम होता. शिवज्योतीचे स्वागत करण्यासाठी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून टिळक सभागृहापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रांगोळी काढण्यात आली होती. सेक्टर कार्यालयाजवळ भगवे ध्वज, फेटे ठेवले होते.


आपत्कालीन कक्ष स्थापन
महाविद्यालयात सेक्टर कार्यालयात आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रजिस्ट्रार डी. बी. कुलकर्णी, प्रा. उमेश चव्हाण, प्रा. प्रेरणा सावगावे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. ते अपघातातील मृत व जखमींच्या नातेवाइकांशी मोबाईलवर संपर्क साधून माहिती देत होते.



पोलिसांचा फौजफाटा दाखल
अपघाताचे वृत्त समजताच विश्रामबागचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण दाखल झाले. महाविद्यालय व्यवस्थापनाकडून त्यांनी अपघाताची माहिती घेतली. दिवसभर महाविद्यालय परिसरात बंदोबस्त होता. वसतिगृहातही सन्नाटा होता. अनेक विद्यार्थी दिवसभर सेक्टर कार्यालयासमोर बसून होते.


केतन खोचेचे वडील फौजदार
मृत केतन खोचे याचे वडील जिल्हा पोलीस दलात सहायक पोलीस फौजदार आहेत. सध्या ते पोलीस मुख्यालयातील जिल्हा विशेष शाखेत कार्यरत आहेत. केतनची २७ फेब्रुवारीला अंतिम परीक्षा होती. महाविद्यालयातील हे त्याचे शेवटचे वर्षे होते.


पालक धास्तावले : कॉलेजशी संपर्क

पहाटे साडेचार वाजता अपघात झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या आॅनलाईन आवृत्त्यांतून सकाळी साडेसहापर्यंत वृत्त प्रसिद्ध झाले. वालचंदचे सहा विद्यार्थी ठार, या वृत्तात सुरुवातीला मृत विद्यार्थ्यांची नावे नव्हती. त्यामुळे देश-राज्यभरातील पालक महाविद्यालयात दूरध्वनी करून माहिती घेत होते.

अशी घडली घटना
पन्हाळा येथून शिवज्योत आणण्यासाठी रविवारी रात्री साडेअकराला महाविद्यालयातील ३० विद्यार्थी टेम्पोने, तर चार विद्यार्थी दुचाकीवरून गेले होते. शिवज्योत घेऊन येताना टेम्पोत काही विद्यार्थी होते, तर शिवज्योतीसोबत चार विद्यार्थी दुचाकीवरून येत होते. नागावफाटा येथे काहीवेळ थांबल्यानंतर अचानक ट्रकची धडक बसल्याने दुचाकीवरील चौघे व शिवज्योत घेतलेल्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला.





गावी अंत्यसंस्कारअपघाताचे वृत्त समजताच मृत सहाही विद्यार्थ्यांचे नातेवाईक कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात दाखल झाले. मुलगा मरण पावल्याचे समजताच त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला. रुग्णालयाच्या आवारातच त्यांनी हंबरडा फोडला. सकाळी अकरापर्यंत पाचही मृतदेहांची विच्छेदन तपासणी झाली. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा आणखी एका जखमी विद्यार्थ्याचा उपचारावेळी मृत्यू झाला. सहाही विद्यार्थ्यांवर त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिघे तिसºया वर्षालाप्रणित त्रिलोटकर इलेक्ट्रिकलच्या दुसºया वर्षात, सुशांत पाटील इलेक्ट्रिकलच्या तिसºया वर्षात, केतन खोचे बी.टेक.च्या शेवटच्या वर्षात, सुमित कुलकर्णी व अरुण बोडणे हे दोघेही मेकॅनिकलच्या तिसºया वर्षात शिकत होते. प्रतीक संकपाळ हा डिप्लोमा इलेिक्ट्रकलच्या तिसºया वर्षात शिकत होता. त्यांच्या अपघाती मृत्यूने महाविद्यालयात हळहळ व्यक्त होत आहे.


वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच धक्कादायक आहे. यातील केतन खोचे हा माझा विद्यार्थी होता. त्याची २७ फेब्रुवारीपासून परीक्षा होती. तो अभ्यासात हुशार होता. सुरुवातीला अपघाताच्या वृत्तावर आमचा विश्वास बसला नाही. प्रत्येकवर्षी विद्यार्थी शिवज्योत आणतात. या घटनेमुळे महाविद्यालयात शोकाकुल वातावरण झाले आहे.
- प्रा. उमेश चव्हाण, वालचंद महाविद्यालय

Web Title:  The mourning of 'Walchand'! Time to celebrate the tribute instead of silence in the college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.