खोकी पुनर्वसनासाठी महापालिकेवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:20 AM2017-09-19T00:20:35+5:302017-09-19T00:20:35+5:30

A meeting of the municipal corporation for the rehabilitation of the box | खोकी पुनर्वसनासाठी महापालिकेवर मोर्चा

खोकी पुनर्वसनासाठी महापालिकेवर मोर्चा

googlenewsNext



लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका हद्दीतील खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, यासह विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हा पान असोसिएशनच्यावतीने सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. येत्या पंधरा दिवसांत खोकीधारकांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, तर महापौर व आयुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
या मोर्चाचे नेतृत्व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी केले. मोर्चाला स्टेशन चौकातून सुरूवात झाली. महापालिकेवर मोर्चा आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की, २००५ मध्ये खोकीधारकांचे मुव्हेबल व पक्क्या गाळ्यांत पुनर्वसन करण्यासाठी संघटनेने आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन त्यावेळी काँग्रेस नेते मदन पाटील आणि त्यावेळच्या प्रशासनाने खोकीधारकांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार खोकीधारकांनीही खोकी हटवून सहकार्य केले होते. आतापर्यंत दीड हजार खोकीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले. परंतु त्यानंतर पुनर्वसनाचे काम रखडले आहे. आजही हजारहून अधिक खोकीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही.
यासंदर्भात वेळोवेळी आयुक्त, महापौर, मुख्यमंत्र्यांपासून न्यायालयापर्यंतही आम्ही प्रयत्न केले. त्यानुसार महापालिकेला आदेश होऊनही पुनर्वसनात आडकाठीच सुरू आहे. निव्वळ खोकी पुनर्वसन करू अशी आश्वासने नकोत. आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली तात्काळ समिती नेमून काम सुरू करावे. मालमत्ता व्यवस्थापक, ‘नगररचना’चे अधिकारी तसेच संघटनेचे प्रतिनिधी यांनी समिती करून याबाबत पुनर्वसनाचा आराखडा करावा, त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली.
जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे म्हणाले, एकीकडे पुनर्वसनाचे काम होत नाही, तर दुसरीकडे गणेश मार्केटसह इतर ठिकाणच्या गाळेधारकांच्या हस्तांतराच्या सुमारे ४०० हून अधिक फायली पडून आहेत. मथुबाई कन्या महाविद्यालयाच्या पश्चिम बाजूस खोकी पुनर्वसन करावे, जुन्या स्टेशन चौक बसस्थानकामागे २५ खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, शासकीय रुग्णालय, विश्रामबाग रेल्वे गेट, विश्रामबाग जुना जकात नाका आदी ठिकाणी खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, अशा अनेक मागण्या आहेत. खोकीधारकांबाबत प्रशासन व पदाधिकाºयांच्या या उदासीनतेमुळे संयमाचा बांध सुटला आहे.
यावेळी युसूफ जमादार, राजू पागे, एकनाथ सूर्यवंशी, प्रकाश कोकाटे, मन्सूर नरवाडे, मयूर बांगर, अशोक कारंडे, गणेश कोडते, महेश हरमलकर, मकरंद जमदाडे, राजकुमार खोत, राजू पागे, राजू खोत, प्रकाश मोरे आदींसह शेकडो खोकीधारक उपस्थित होते.
झोपमोड आंदोलन : करणार
खोक्यांच्या पुनर्वसनाबाबत वारंवार आंदोलन करूनही महापालिका प्रशासन दाद देत नाही. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार केला आहे. येत्या पंधरा दिवसात खोकी पुनर्वसनाबाबत निर्णय न झाल्यास महापौर, आयुक्तांच्या घरासमोर झोपमोड आंदोलन, रोटी दो आंदोलन, धरणे, उपोषण आदी आंदोलने लोकशाही मार्गाने करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष नांगरे यांनी दिला.

Web Title: A meeting of the municipal corporation for the rehabilitation of the box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.