Lok Sabha Election 2019 सांगली, मिरज शहरातील मतदान युती-आघाडीला ठरणार भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 02:31 PM2019-04-16T14:31:44+5:302019-04-16T14:33:56+5:30

मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, सांगलीतील मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे बालेकिल्ले

Lok Sabha Election 2019 Sangli, Miraaj City polls will be the alliance-friendly alliance | Lok Sabha Election 2019 सांगली, मिरज शहरातील मतदान युती-आघाडीला ठरणार भारी

Lok Sabha Election 2019 सांगली, मिरज शहरातील मतदान युती-आघाडीला ठरणार भारी

Next
ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांची जत, उमदी, कवठेमहांकाळ शहरांवरच भिस्त आहे.

अशोक डोंबाळे। 

सांगली : मोदी लाटेवर स्वार झालेले भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्यापुढे जत, कवठेमहांकाळ, मिरज, सांगलीतील मताधिक्य टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे बालेकिल्ले असलेली सांगली, मिरज, जत ही शहरे महत्त्वाची, तर वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांची जत, उमदी, कवठेमहांकाळ शहरांवरच भिस्त आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा, धनगर, मुस्लिम समाज आरक्षणाच्या प्रश्नावर प्रचंड आक्रमक झाला होता. लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्मासह आरक्षणाची मागणीही तेवढीच महत्त्वाची होती. यामुळे काँग्रेसविरोधात प्रचंड असंतोष होता. बेरोजगारी हटाव आणि शेतीला हमीभाव देण्याची आश्वासने देऊन देशभर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हायटेक प्रचार यंत्रणा राबविली होती. या मोदी लाटेतच सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून संजयकाका पाटील यांच्या रूपाने कमळ फुलले होते. पाच वर्षांत प्रचंड घडामोडी झाल्या आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न कोर्टात प्रलंबित असून, धनगर, मुस्लिम समाजाचे आरक्षण आणि लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीकडे भाजप सरकारने ढुंकूनही पाहिले नाही.

यामुळे मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजात मोठा असंतोष होता. संजयकाकांना उमदी, संख, जत, कवठेमहांकाळ, मिरज, मालगाव, सांगली, माधवनगरमध्ये विक्रमी मताधिक्य मिळाले होते. याच त्यांच्या हक्काच्या मतदारसंघात मताधिक्य टिकविण्याचे फार मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. भाजपमधील असंतोषासह मागील निवडणुकीतील त्यांचे स्टार प्रचारक धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे.

भाजप विरोधातील असंतोषाच्या लाटेवर स्वार होण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील सज्ज झाले आहेत. जत, उमदी, संख, कवठेमहांकाळ, मालगाव, मिरज, सांगलीतील दादाप्रेमी तरुणांसह वयोवृध्दांच्या भेटी घेऊन बालेकिल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टींनी भक्कम पाठबळ दिले आहे. जत, उमदीमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत, राष्ट्रवादीचे सुरेश शिंदे, अ‍ॅड. चन्नाप्पा होर्तीकर त्यांच्या मदतीला धावून आल्याचे दिसत आहे. सांगली, मिरज, मालगाव, माधवनगरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची फौजही त्यांच्या कामी येताना दिसत आहे. 

गोपीचंद पडळकर हेही मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह लिंगायत समाजाच्या स्वतंत्र धर्माच्या मागणीबाबत भाजपकडून कशी फसवणूक झाली, हे मांडत आहेत. धनगर आणि दलित, ओबीसी मतदारांवर त्यांची मोठी भिस्त आहे. जत, उमदी, संख, कवठेमहांकाळ शहरावर त्यांची भिस्त आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 Sangli, Miraaj City polls will be the alliance-friendly alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.