ठळक मुद्देअंकली-हरिपूर रस्त्यावर मोटारीत मृतदेह घातलाअनिकेतला पंख्याच्या हुकाला उलटे टांगले. त्याचे डोके खाली जमिनीपर्यंत आले. पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले

सांगली : अनिकेत कोथळेचा मृतदेह तब्बल १४ तास निलंबित पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पथकाकडे होता. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी पहाटे चारपर्यंत सांगली शहरात भटकंती केली. पण येथे योग्य जागा न मिळाल्याने त्यांनी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) गाठले. त्यापूर्वी अंकली-हरिपूर रस्त्यावर पोलिस गाडीतून मृतदेह काढून तो हवालदार अनिल लाडच्या मोटारीत घालण्यात आला, अशी माहिती तपासातून पुढे आली आहे.

लुबाडणूक प्रकरणात अटक केलेल्या अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला सोमवारी रात्री आठ वाजता सांगलीतील पोलिस कोठडीतून बाहेर काढण्यात आले. त्यांना डीबी रुममध्ये नेण्यात आले. आणखी कोठे गुन्हे केले आहेत, अशी विचारणा करत कामटेने लाल रंगाच्या लोखंडी पाईपने पायाच्या नडगीवर मारण्यास सुरुवात केली. दोघांचे सर्व कपडे काढण्यात आले. त्यांचा चेहरा काळ्या कापड्याने झाकला. त्यानंतर अनिकेतला पंख्याच्या हुकाला उलटे टांगले. त्याचे डोके खाली जमिनीपर्यंत आले.

डोक्याखाली पाण्याने भरलेली बादली ठेवली होती. त्याला मारताना दोरी तुटल्याने तो डोक्यावर या बादलीत पडला. अनिल लाड, अरुण टोणे यांनी त्याला उचलून टेबलवर पालथे झोपविले. पुन्हा कामटे व नसरुद्दीन मुल्ला यांनी त्याला बेदम मारहाण केली. अनिकेतच्या पाठीवर अमोल भंडारेला बसविले. ‘माझा श्वास गुदमरतोय, मला सोडा’, अशी विनवणी करीत अनिकेत ओरडत होता. तो हात-पाय घासून तडफडत होता. तरीही कामटेच्या पथकाने त्याला सोडले नाही. त्याची हालचाल थांबून अंग गार पडल्यानंतर मात्र कामटेच्या पथकाला घाम फुटला.

कामटेने अनिकेतला पाठीवर झोपवले. भंडारेला त्याच्या तोंडात फुंकण्यास सांगितले. त्याचवेळी कामटेच्या पथकाने अनिकेतला कपडे घातले. झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले याने अनिकेतला कपडे घातले. भंडारेलाही कपडे घालण्यास सांगितले. रात्री साडेआठ वाजता हा प्रकार घडला. अनिकेत मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. भंडारेला पुन्हा कोठडीत ठेवले. रात्री अकरा वाजता त्याला कोठडीतून बाहेर काढले. त्याला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर जाण्यास कामटेने नसरुद्दीन मुल्ला यास सांगितले.

पोलिस गाडीत मृतदेह
घाटावर नसरुद्दीन मुल्ला भंडारेला घेऊन बसला होता. त्यांच्यासोबत २७ व १९ वर्षाचे दोन तरुण होते. पोलिस ठाण्याच्या बेकर मोबाईल गाडीत अनिकेतचा मृतदेह ठेवला होता. कामटे, लाड, टोणे व पट्टेवाले हे चौघे कृष्णा नदीसह अन्य भागात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी फिरले. यादरम्यान पहाटेचे चार वाजले. सांगलीत कोठेही ठिकाण निश्चित होत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी कृष्णा नदीघाटावरच आंबोली घाटात मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरविले.

मृतदेह जाळला
आंबोलीचा ‘प्लॅन’ ठरताच अनिल लाड स्वत:ची मोटार घेऊन घाटावर आला. या मोटारीत लाड, टोणे, मुल्ला, पट्टेवाले बसले. अमोल भंडारेला डिकीत बसविले. त्यांच्यापाठोपाठ अनिल शिंगटे बेकर मोबाईल गाडी घेऊन होता. मोटार अंकली-हरिपूर रस्त्यावर घेण्यात आली. तेथे पहाटे चार वाजता त्यांनी या बेकर मोबाईल गाडीतून मृतदेह काढून तो लाडच्या मोटारीच्या डिकीत ठेवला. तेथून ते अंकलीत गेले. तेथील पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरले. कागल, निपाणीमार्गे चार तासाच्या प्रवासानंतर ते आंबोलीत पोहोचले. सकाळी दहा ते अकरा या वेळेत जंगलातील लाकडे गोळा करुन तेथे अनिकेतचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न झाला. पण मृतदेह व्यवस्थित जळाला नसल्याने कामटे व लाडने पुन्हा दोन बाटल्यांमधून डिझेल आणले. ते ओतून मृतदेह जाळण्यात आला. अर्धवट जळालेला मृतदेह पन्नास फूट दरीत टाकण्यात आला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.