भारत विदेशी भांडवलदारांच्या हाती जातोय : सीताराम येचुरी, सांगलीत माकपच्या राज्य अधिवेशनाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 02:40 PM2018-02-15T14:40:54+5:302018-02-15T15:08:01+5:30

अनेक विदेशी कंपन्यांसोबत अनेकप्रकारचे करार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश आता विदेशी भांडवलदारांच्या हाती सोपविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भारतातील सामान्य माणसाचे आर्थिक शोषण यापुढील काळात गतीने वाढणार आहे, अशी भीती माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी गुरुवारी सांगलीत व्यक्त केली.

India is in the hands of foreign capitalists: Sitaram Yechury, CPI (M) 's state convention begins | भारत विदेशी भांडवलदारांच्या हाती जातोय : सीताराम येचुरी, सांगलीत माकपच्या राज्य अधिवेशनाला सुरुवात

भारत विदेशी भांडवलदारांच्या हाती जातोय : सीताराम येचुरी, सांगलीत माकपच्या राज्य अधिवेशनाला सुरुवात

Next
ठळक मुद्देभारत विदेशी भांडवलदारांच्या हाती जातोय : सीताराम येचुरीसांगलीत माकपच्या राज्य अधिवेशनाला सुरुवात

सांगली : अनेक विदेशी कंपन्यांसोबत अनेकप्रकारचे करार करून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा देश आता विदेशी भांडवलदारांच्या हाती सोपविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भारतातील सामान्य माणसाचे आर्थिक शोषण यापुढील काळात गतीने वाढणार आहे, अशी भीती माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी गुरुवारी सांगलीत व्यक्त केली.

माकपच्या २२ व्या तीनदिवसीय राज्य अधिवेशनाचे उद्घाटन गुरुवारी येथील मराठा सांस्कृतिक भवनात येचुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास शेकापचे आ. जयंत पाटील, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम, प्राचार्य व्ही. वाय. पाटील, निलोत्पल बसू, महेंद्र सिंग, डॉ. अशोक ढवळे, मरियम ढवळे, सीपीआयचे कॉ. नामदेव गावडे,भाई सुभाष पाटील, कॉ. रमेश सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते.

येचुरी म्हणाले की, मनमोहन सिंग पंतप्रधानपदावरून पायउतार होऊन नरेंद्र मोदी त्या पदावर बसल्यापासून देशाच्या आर्थिक विकासाचे प्रमाण झपाट्याने घटत आहे. देशातील आर्थिक शोषण अधिक गतीने वाढत आहे. गरिबांची गरिबी अधिक गडद होताना श्रीमंतांची श्रीमंती कित्येक पटीने वाढत आहे.

भारतातील भांडवलदारांच्या विचाराने धोरणे आखली जात आहेत. त्यामुळे देशांतर्गत सर्व व्यवस्था, यंत्रणा आणि सार्वजनिक व्यवस्थाही आता भांडवलदारांच्या हाती सोपविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच भाग म्हणून छोटे व्यावसायिक संपुष्टात आणण्याचा डाव आणि सर्वत्र खासगीकरणाचा घाट घातला जात आहे.

वास्तविक देशाच्या विकासाचा सर्वात मोठा हिस्सा शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि कामगारांच्या माध्यमातून तयार होतो. तरीही याच घटकावर कुऱ्हाड  चालविण्याचे काम सध्या सुरू आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगांसाठी वापरात आणून विदेशातील शेतीमालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा छुपा अजेंडा आता उजेडात आला आहे. देशातील आणि विदेशातील भांडवलदारच आता देशाचे अर्थकारण चालवू पाहात आहेत. आपल्यासमोरील हे मोठे संकट उलथविण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारलाच उखडून फेकण्याचे काम शेतकरी आणि कामगारांनी करावे.

समाजवादी विचारसरणीचे सरकार जोपर्यंत सत्तेवर येत नाही, तोपर्यंत देशातील कष्टकरी समाजाचे कल्याण अशक्य आहे. त्यासाठीच शेतकरी आणि कामगार हे दोन वर्ग संघटित झाले पाहिजेत. माकपने त्यासाठीच ही मोहीम उघडली आहे. त्यामध्ये अनेक डाव्या विचारसरणीचे लोक सहभागी होताना दिसत आहेत. क्रांतीची ही वाट थांबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असले तरी, क्रांती होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सत्तेसाठी जातीय ध्रुवीकरण 

येचुरी म्हणाले की, भारतात सर्वत्र जातीय दंगली, हिंसा आणि अत्याचाराच्या घटना घडत आहेत. जातीय ध्रुवीकरणाचा हा प्रयोग केवळ सत्तेसाठीच भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे देशाची अखंडता, बंधुता आणि संविधान अडचणीत आले आहे, असे मत येचुरी यांनी यावेळी व्यक्त केले.

भारताची आंतरराष्ट्रीय छबी बिघडली

भारताची यापूर्वीची आंतरराष्ट्रीय  प्रतीमा निष्पक्ष व समतावादी विचाराचा देश म्हणून होती. आता ही छबी बिघडली आहे. भारत हा अमेरिकेच्या हातचे बाहुले असलेला देश म्हणून जगभरात ओळखला जात आहे. मालदिव, चीन, सौदे अरेबियायासारखे देश आज भारताच्या विरोधात गेले आहेत. ही कशाची लक्षणे आहेत, हे सर्वांनी ओळखावे. आपले संबंध सर्वच देशांशी चांगले असले पाहिजेत, असे मत येचुरी यांनी व्यक्त केले.

उद्योजकांना माफी, शेतकऱ्यांना नाही

शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागितली, तर त्यासाठी ८० हजार कोटी रुपये सरकारकडे उपलब्ध नसल्याचे त्यांच्या मंत्र्यांनी सांगितले, मात्र कर्जबुडव्या उद्योजकांचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारने २ लाख कोटी रुपये लगेच दिले, अशी टीका येचुरी यांनी केली.

Web Title: India is in the hands of foreign capitalists: Sitaram Yechury, CPI (M) 's state convention begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.