दडपशाही कराल तर, तुम्हाला हद्दपार करू: जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:29 PM2018-07-22T23:29:08+5:302018-07-22T23:29:39+5:30

If you do suppression, you will be expelled: Jayant Patil | दडपशाही कराल तर, तुम्हाला हद्दपार करू: जयंत पाटील

दडपशाही कराल तर, तुम्हाला हद्दपार करू: जयंत पाटील

Next


सांगली : महापालिका हद्दीतील गुन्हेगारांना हद्दपार करण्यास कुणाचाच विरोध नाही; पण भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारातील कार्यकर्त्यांना हद्दपार करण्याचे षड्यंत्र पोलिसांकडून सुरू आहे. चार दिवस सासूचे’ ही म्हण महाराष्ट्रात प्रचलित आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही सत्तेवर आल्यानंतर तुम्हाला शोधून अशा ठिकाणी पाठवू, जिथे तुमच्या मनात हद्दपारीची भावना येईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी रविवारी पोलीस व जिल्हा प्रशासनाला दम भरला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार प्रारंभ रविवारी सांगलीत झाला. यावेळी काँग्रेस भवनसमोर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सतेज ऊर्फ बंटी पाटील, आ. विश्वजित कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे संजय बजाज उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, महापालिका हद्दीतील ७० जणांना हद्दपारीच्या नोटिसा बजाविल्या आहेत. निवडणुकीपूर्वी पोलिसांनी ही कारवाई करण्याची गरज होती. आता निवडणुका सुरू झाल्या. उमेदवार प्रचारात आहेत. अशावेळी आघाडीच्या उमेदवारांसोबत प्रचारात असलेल्या कार्यकर्त्यांना हद्दपार करण्याचे षड्यंत्र रचले आहे. सरकार भाजपचे आहे, त्यांचे ऐकावे लागते, असे म्हणत प्रांत, तहसीलदार, पोलिसांकडून कारवाई केली जात असेल तर, आम्ही तुमचा हिशेब चुकता करण्यास समर्थ आहोत. गुन्हेगारांवर कारवाई करण्यास कुणाचीही हरकत नाही. आम्ही गुन्हेगारांना उमेदवारी देण्याचे पाप केले नाही. दुसºया बाजूच्या उमेदवारांचाही अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी प्रशासनाला दिला.
राज्यातील भाजपचे मंत्री सांगलीत प्रचाराला येतील. शेवटच्या टोकाची आश्वासने देतील. तोंडात येईल ते बोलणे हा भाजपचा इतिहास आहे. कल्याण-डोंबिवलीत साडेसहा हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते; पण तिथे एक दमडीही दिलेली नाही. भाजप जेवढे बोलतो त्यातील पाच ते दहा टक्केही काम करीत नाही. मराठा धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजालाही आश्वासने दिली होती; पण तीही पाळलेली नाहीत. वसंतदादांच्या या नगरीत भाजपचा चंचूप्रवेश जनतेने रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी जयश्रीताई पाटील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, महापौर हारूण शिकलगार यांची भाषणे झाली. या सभेला राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, श्रीनिवास पाटील, पद्माकर जगदाळे, सागर घोडके, आनंदराव मोहिते आदी उपस्थित होते.
भाजप म्हणजे : इनकमिंगचा पक्ष
भाजप हा इनकमिंगवर जगलेला पक्ष आहे. त्याला एक आॅगस्टला आऊटगोर्इंग करा, असे आवाहन करीत हर्षवर्धन पाटील म्हणाले की, गेल्या चार वर्षात भाजपने राज्यात सत्ताधारी म्हणून काहीच काम केलेले नाही. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे. तेथे दीड वर्षात एकही काम केले नाही. तेच भाजपवाले सांगलीचा कसा विकास करणार? सध्याचे भाजप सरकार अल्पमतात आहे. त्यांचे २५-३० वर्षांचे मित्रपक्ष सोडून जात आहेत. मित्रपक्षांना सांभाळता येत नाही, ते सांगलीच्या जनतेला काय सांभाळणार? असा सवालही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांपेक्षा वारकरी बरा !
मुख्यमंत्र्यांनी आषाढीला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा कार्यक्रम रद्द केला. त्यांनी गेल्या चार वर्षांत अनेक खोटी आश्वासने दिली. त्यामुळे तुमच्याहस्ते पूजा नको, तुमच्यापेक्षा वारकरी बरा, असे विठ्ठलालाही वाटले असावे, असा चिमटा हर्षवर्धन पाटील यांनी काढला.
ट्रक भरून बॅगा आणूनही उपयोग नाही : विश्वजित कदम
विश्वजित कदम म्हणाले की, भाजपने २०१४ च्या निवडणुकीत अनेक आश्वासने दिली; पण महागाई कमी केली नाही. सीमेवर आजही जवान शहीद होतच आहेत. जनतेच्या आचार, विचार स्वातंत्र्यावर गदा आणली गेली आहे. जनतेच्या स्वातंत्र्याचा गळा घोटला जात आहे. आठवडाभरात भाजपचे अनेक नेते सांगलीत येतील, मोठमोठी आमिषे दाखवतील, पण तुम्ही २०१४ ला केलेली चूक करू नका. त्यांनी ट्रक भरून बॅगा आणल्या तरी, जनता काँग्रेसच्याच पाठीशी उभी राहील, असे ते म्हणाले.

ही तर लोकसभा, विधानसभेची नांदी !
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमुळे अनेकांना उमेदवारी देता आलेली नाही. पण आता कुणाला उमेदवारी मिळाली हे महत्त्वाचे नाही. सांगलीची ही निवडणूक लोकसभा व विधानसभेची नांदी ठरणार आहे. महापालिका क्षेत्रात भाजपचे दोन आमदार असतानाही त्यांना पुरेसा निधी आणता आलेला नाही. याउलट सत्ता नसतानाही महापालिकेच्या माध्यमातून काँग्रेसने ४०० कोटींची कामे केली आहेत. नुकताच लोकसभेत भाजपने विश्वासदर्शक ठराव जिंकला असला तरी, जनतेच्या दरबारात मात्र त्यांच्याबद्दल अविश्वास असल्याचे या निवडणुकीतून दिसून येईल.

Web Title: If you do suppression, you will be expelled: Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.