ठळक मुद्देअनेक पुरस्कारांचे ओझे माझ्यावर आहे. मागच्यावर्षी नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार घेताना मनापासून आनंद झाला

सांगली : कलावंताचा सन्मान हा कलाकाराच्या अभिनयाला दाद देणारा असतो. कलावंताबद्दल सुख देणारा सन्मान आयुष्यात महत्त्वाचा असतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेच्यावतीने रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला नाट्यक्षेत्र, साहित्य क्षेत्र, नाट्यतंत्र अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया व्यक्तींचा सन्मान अभिनेते सावरकर आणि भावे पुरस्काराचे मानकरी अभिनेते मोहन जोशी यांच्याहस्ते करण्यात आला. डॉ. तारा भवाळकर यांना ‘काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार’, प्रा. वैजनाथ महाजन यांना ‘आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार’, सुरेश आठवले यांना ‘प्रा. अरुण पाटील नाट्यतंत्र पुरस्कार’, तर अरविंद लिमये यांना ‘प्रा. दिलीप परदेशी नाट्यरंग पुरस्कार’ आणि डॉ. शरद कराळे यांचा गौरव केला. यावेळी सावरकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आयुष्यात माझ्या हस्ते इतक्या मान्यवरांचा सन्मान होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. अनेक पुरस्कारांचे ओझे माझ्यावर आहे. मिळणारा पुरस्कार हा मनाला आनंद देणारा असतो. कलावंताबद्दल सुख देणारा हा पुरस्कार असतो. मागच्यावर्षी नाट्याचार्य विष्णुदास भावे पुरस्कार घेताना मनापासून आनंद झाला, असे ते म्हणाले.

अभिनेते मोहन जोशी म्हणाले, भावे पुरस्कार मला जाहीर झाला, हे माझे भाग्य आहे. यात लेखक, निर्माते, कलावंत, रसिकांचे सहकार्य लाभले. आयुष्यभर सिनेमा आणि नाटक सोडून मी काही केले नाही.यावेळी पुरस्कारप्राप्त तारा भवाळकर, प्रा. वैजनाथ महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी नाट्यपरिषदेचे मध्यवर्ती मंडळाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर, कोषाध्यक्ष भालचंद्र चितळे, डॉ. दयानंद नाईक आदी उपस्थित होते. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्षा चेतना वैद्य यांनी पुरस्कार मिळालेल्यांचा परिचय करुन दिला. कार्यवाह श्रीनिवास जरंडीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय कडणे यांनी आभार मानले.

सांगली पहिली सांस्कृतिक नगरी होईल : महाजन
पुण्याला प्रथम सांस्कृतिक नगरी म्हटले जात आहे. दोन नंबरचे नाव राज्यात सांगलीचे घेतले जात आहे. सांगली, मिरज शहरातील नाट्य संस्था आणि कलाकारांच्या कार्याचा वेग लक्षात घेता, भविष्यात सांगली ही राज्यात पहिली सांस्कृतिक नगरी असेल, असा विश्वास प्रा. वैजनाथ महाजन यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थित कलाकार व रसिकांनी या गोष्टीस टाळ््यांच्या कडकडाटात दाद दिली.