कडेगाव : कडेगाव तालुक्यात बहुतांश गावांतील ग्रामसेवक नेमणुकीच्या गावाकडे फिरकतही नसल्याचे चित्र आहे. तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींकरिता ४४ ग्रामसेवक कार्यरत आहेत. ग्रामसेवकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील पंचायत समिती कार्यालयात विस्तार अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. मात्र या अधिकाऱ्यांचा ग्रामसेवकांवर वचक राहिलेला नाही. ग्रामसेवकांच्या दांड्या वाढल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार ढिसाळ झाला आहे.
अपवाद वगळता बहुतांशी ग्रामसेवक संबंधित गावामध्ये जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांमधून होत आहे. सांगली, इस्लामपूर, विटा, कऱ्हाड, कडेगाव अशा शहरांच्या ठिकाणी किंवा स्वत:च्या मूळ गावी राहून कारभार पाहणारे अनेक ग्रामसेवक आहेत. ते नेमणुकीच्या गावातील ग्रामपंचायतीकडे फिरकतही नसल्याच्या तक्रारी पंचायत समिती पातळीवर वाढल्या आहेत. काही ग्रामसेवक केवळ पंचायत समितीच्या मासिक बैठकीलाच हजेरी लावतात व पुन्हा मासिक बैठकीच्या निमित्ताने वेळ मिळाला तर नेमून दिलेल्या गावात भेट देतात. कामचुकार ग्रामसेवकांचे वेतनही पंचायत समिती स्तरावरून विनाअडथळा काढले जाते. त्यामुळे एकप्रकारे अशा कामचुकार ग्रामसेवकांना पंचायत समितीचे प्रशासन अधिकारीच पाठबळ देत आहेत.
ग्रामपंचायत स्तरावरील काही सरपंच मंडळी अशा ग्रामसेवकांना पाठबळ देऊन हित जोपासण्यातच धन्यता मानत आहेत. कडेगाव पंचायत समितीतील बैठकीचे किंवा सांगलीला जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या कामाचे कारण सांगून ग्रामसेवक लोकांची दिशाभूल करतात . (वार्ताहर)

कामचुकार ग्रामसेवकांची गय नाही : सभापती करांडे
ग्रामसेवकांबाबत पंचायत समितीकडे ग्रामस्थांची तक्रार आल्यास त्याची लगेच दखल घेण्यात येईल. अशा ग्रामसेवकांची गय करणार नाही. कामचुकार ग्रामसेवकांवर तातडीने कारवाई केली जाईल, असे कडेगाव पंचायत समितीच्या सभापती मंदाताई करांडे यांनी सांगितले.
विकास कामात ग्रामसेवकांची टक्केवारी
काही ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे काम करण्यासाठी नव्हे, तर कामाची टक्केवारी घेण्यासाठीच ग्रामसेवक पदावर बसलो आहोत, अशा अविर्भावात वागतात. एखाद्या कामाची निविदा काढण्यापूर्वी ते काम टक्केवारी घेण्यासाठी सोयीच्याच ठेकेदाराला कसे मिळेल, यासाठी प्रयत्न केले जातात. सोयीच्या ठेकेदाराला काम मिळाले नाही तरीही, टक्केवारीचा विषय असतोच.