लोककलावंतांबाबत सरकार उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:21 AM2018-02-26T00:21:42+5:302018-02-26T00:21:42+5:30

Government disappointed about the publicists | लोककलावंतांबाबत सरकार उदासीन

लोककलावंतांबाबत सरकार उदासीन

Next


तासगाव : कलावंतांच्या जोरावरच समाजात सामाजिक क्रांती झाली. छत्रपती शाहू महाराजांचे कलावंतांसाठी मोठे योगदान आहे. मात्र महाराजांच्या नावाचा गवगवा करणारे सरकार त्यांचे आचारविचार आत्मसात करताना दिसत नाही. साहित्यिकांच्याबाबतीत सरकार निर्दयी झाले आहे. कलावंतांच्याबाबतीत सरकार करंटेपणाचे धोरण अवलंबित असून, या कारणामुळेच महाराष्ट्रातील लोककलावंत आज उपेक्षितांचे जीवन जगत आहेत, अशी खरमरीत टीका ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि दुसºया प्रतिष्ठा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केली.
तासगाव येथील लेखणीसम्राट गणपतराव व्ही. माने चिंचणीकर साहित्यनगरी येथे प्रतिष्ठा फौंडेशनच्यावतीने दुसरे प्रतिष्ठा साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. तहसीलदार सुधाकर भोसले स्वागताध्यक्ष होते.
सबनीस पुढे म्हणाले, महाराष्टÑातील लोकसाहित्यिकांना, कलावंतांना अखेरच्या काळात जगण्यासाठी भीक मागण्याची वेळ येते. त्यांना ताठमानेने जगणेही मुश्किल होेते. मात्र, अशा कलावंतांना, साहित्यिकांना स्वाभिमानाने जगण्यासाठी साधी मदतही करण्याची कुवत या सरकारची आणि राजकारण्यांची नाही. सरकारचा करंटेपणा आणि निष्क्रियतेमुळे लोककलावंतांच्या पदरी उपेक्षिताचे जीणे आले आहे. नवनवीन लेखक उदयास येत आहेत. मात्र सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे. संस्कृती शुध्दीकरण झाले पाहिजे आणि यासाठी साहित्य संमेलने तुरटीसारखे काम करतात. पैसे घेऊन पुरस्कारांची संमेलने भरवली जातात.
यावेळी चंद्रलेखा बेलसरे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या कविसंमेलनासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, तर जयवंत आवटे यांचे कथाकथन झाले.
यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, कविसंमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे, गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, संयोजक तानाजी जाधव यांच्यासह साहित्यिक उपस्थित होते. तहसीलदार भोसले, डॉ. गुरव यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.
यावेळी गटविकास अधिकारी अरुण जाधव, निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले यांना ‘प्रशासनरत्न’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, तर वसंतदादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांना ‘शिक्षणरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
नेत्यांवर निशाणा
गेल्या काही वर्षात सुरू असलेल्या जातीय राजकारणावर परखड मत मांडताना सबनीस यांनी नेत्यांवर निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्टÑ जातीपातींनी दुभंगलेला आहे. राजकीय नेते शुध्दतेचा आव आणत आहेत. मात्र त्यांच्या चारित्र्यावर कलंकतेचा डाग आहे. राजकीय व्यवस्था मोडित निघालेली असताना समाजाचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. साहित्यातून नवा महाराष्टÑ, नवा भारत उभा करावा लागेल. महापुरुषांच्या नावाने समाज, धर्म बिघडवला जात आहे, साहित्यातून तो बिघडवू देऊ नका. भारतीय संस्कृती ही महान आहे. जगभरात तिचे दाखले दिले जातात. त्यामुळे साहित्यीकांनी आपली जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे. सामाजिक भाष्य करणारे, संस्कृतीवर प्रकाशझोत टाकणारे साहित्य घडले पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

Web Title: Government disappointed about the publicists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली