चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:19 PM2018-07-15T23:19:24+5:302018-07-15T23:19:29+5:30

Four curved doors of the Chandoli Dam opened | चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले

चांदोली धरणाचे चारही वक्राकार दरवाजे उघडले

Next


वारणावती : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक १३,६८३ क्युसेक असल्याने धरणाचे चारही वक्राकार दरवाजे रविवारी सकाळी १० वाजता ०.५० मीटरने खुले करण्यात आले असून त्यातून २१०० क्युसेक विसर्ग सुरू केला होता. सायंकाळी चार वाजता एक मीटरने दरवाजे उचलण्यात आले. त्यावेळी ४२०० क्युसेक व वीज निर्मितीकडून ५९२ व उच्चस्तर द्वारातून ८०० क्युसेक असा एकूण ३४९२ क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरण ३४.४० टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे राज्यातील मातीचे सर्वात मोठे धरण आहे. चांदोली धरण परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्याप्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पाण्याने शनिवारी सांडवा पातळी ओलांडली होती. त्यामुळे रविवारी सकाळी दहा वाजता धरणाचे चारही दरवाजे ०.५० मीटर उचलून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला. वीजनिर्मिती केंद्रातून ५९२ व उच्चस्तर द्वारातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना अगोदरच धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. गतवर्षी आजच्या तारखेला ८१० मिलिमीटर पाऊस पडला होता. यंदा त्याचे प्रमाण १३२४ मिलिमीटर इतके आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५१४ मिलिमीटर पाऊस अधिक बरसला आहे. १७.९५ टीएमसी पाणीसाठा होता, तर यंदा २७.७७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. त्याची टक्केवारी ८०.७१ आहे.

सतर्कतेचा इशारा
वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पाणी पात्राबाहेर गेले आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढविण्यात येणार आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे, असा इशारा धरण प्रशासनामार्फत देण्यात आला आहे.

Web Title: Four curved doors of the Chandoli Dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.