दुष्काळी तालुक्यातील पशुधनास चारा छावण्यांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 04:48 PM2019-06-19T16:48:38+5:302019-06-19T16:50:29+5:30

माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 67 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 64 चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत.

Fodder fodder for drought-hit taluka | दुष्काळी तालुक्यातील पशुधनास चारा छावण्यांचा आधार

दुष्काळी तालुक्यातील पशुधनास चारा छावण्यांचा आधार

googlenewsNext
ठळक मुद्देदुष्काळी तालुक्यातील पशुधनास चारा छावण्यांचा आधार सांगली जिल्ह्यात 64 चारा छावण्या सुरू

सांगली : माणसांबरोबरच दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शासन व प्रशासनाकडून सर्वोच्च प्राधान्यक्रमाने उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 67 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी 64 चारा छावण्या सुरू झालेल्या आहेत.

या चारा छावण्यांमध्ये दिनांक 16 जूनअखेर मोठी 32 हजार 726 व लहान 5515 अशी एकूण 38 हजार 241 जनावरे आहेत. दुष्काळी भागातील जित्राबं वाचवण्यासाठी या चारा छावण्या तारणहार ठरत असून, पशुधन जगण्यासाठी मोठा आधार मिळाला आहे. आटपाडी, कवठेमहांकाळ, जत तालुक्यातील चारा छावणीचालक, लाभार्थी यांच्या याबाबतच्या प्रतिक्रिया शासन, प्रशासनाने आभार मानणाऱ्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने आटपाडी तालुक्यात 26 चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. या सर्व छावण्या सद्यस्थितीत सुरू झाल्या आहेत. जत तालुक्यात 30 चारा छावण्यांना मंजुरी दिली असून यापैकी 26 छावण्या सुरू आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 9 चारा छावण्यांना मंजुरी दिली असून यापैकी 8 छावण्या सुरू आहेत. तासगाव व खानापूर तालुक्यात प्रत्येकी एका चारा छावणीस मंजुरी दिली असून त्या सुरू आहेत.

श्री गजानन कामगार मजूर सहकारी संस्था आटपाडी या संस्थेने तडवळे येथे जिल्ह्यात सर्वप्रथम चारा छावणी सुरू केली. संस्थेचे अध्यक्ष तथा चारा छावणी चालक दादासाहेब हुबाले म्हणाले, तडवळे, बनपुरी, मिटकी, मासाळवाडी, शेटफळे, करगणी आणि आटपाडी अशा परिसरातील 7 ते 8 गावांतील जनावरांना छावणीचा लाभ होत आहे.

तडवळे गावचे तलाठी रवींद्र कांबळे म्हणाले, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार सचिन लुंगटे यांच्या देखरेखीखाली चारा छावण्या सुरू आहेत. गेल्या 3 वर्षांपासून आटपाडी तालुक्यात पाऊस न झाल्याने ग्रामस्थ आणि जनावरांना पाणी व चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर चारा छावणी सुरू केल्यामुळे पशुधनास लाभ झाला आहे.

विजय गिड्डे हे येथील पशुपालक समितीचे अध्यक्ष आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे चारा, पेंड दिले जात आहे. जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. लसीकरण व अन्य औषधोपचार अशा अन्य वैद्यकीय सुविधाही दिल्या जात आहेत. चारा, पेंड पुरवठ्यावर समितीची देखरेख आहे. एखादे जनावर आजारी असल्यास तात्काळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण केले जाते. काही अडचण येऊ देत नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश सरग (मरगळ वस्ती, गोंदेरा, आटपाडी) यांची 4 जनावरे या चारा छावणीत आहेत. त्यांची 15 एकर शेती आहे. 2 ते 3 वर्षं पाऊस पडला नसल्याने जनावरांची परिस्थिती बिकट झाली. चारा छावणीमुळे ही जित्राबं जगली, असे ते सांगतात. हनुमंत लेंगरे (लेंगरेवाडी) यांची 10 ते 15 एकर जमीन आहे. पाऊस-पाणी नसल्यामुळे जोडधंदा म्हणून ते पशुपालन करतात. मात्र, दुष्काळामुळे पशुधन वाचवण्यासाठी चारा छावणीत आणण्याशिवाय पर्यायच नव्हता. इथे पाणी, चारा मिळत असल्याने जनावरे सुखरूप राहत आहेत, असे त्यांनी सांगितले.

संतोष विष्णु कदम (रा. तडवळे) हे या चारा छावणीत दीड ते दोन महिने आहेत. त्यांची या चारा छावणीत 4 जनावरे आहेत. तानाजी भानुदास गिड्डे यांची चारा छावणीत 5 जनावरे आहेत. तर अर्जुन आबा यमगर (बनपुरी, ता आटपाडी) यांची 4 जनावरे चारा छावणीत आहेत. या सर्वांनी चारा छावणी सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

आटपाडी तालुक्यातील दुसरी चारा छावणी आवळाई येथे सुरू करण्यात आली. पशुवैद्यकीय व्यावसायिक व छावणीचालक डॉ. तानाजी साळुंखे म्हणाले, मी आवळाईचा पशुवैद्यकीय व्यावसायिक आहे. पाऊस न पडल्यामुळे यावर्षी चारा उत्पादन झालेले नाही. त्यामुळे आम्ही सिध्दनाथ महिला दूध सहकारी संस्थेच्या माध्यमातून चारा छावणी सुरू केली.

शासनाच्या सहकार्यातून चारा, पाणी, पशुखाद्य अतिशय चांगल्या पध्दतीने मिळत आहे व त्यांच्या सहकार्यामुळे पशुधन वाचले आहे. दिनेश पवार (रा. आवळाई), आशाराणी भारत बोरोडे (शेरेवाडी) आणि किसन तुकाराम पाटील (आटपाडी) यांनी छावणी काढल्यामुळे परिसरातील जनावरांची चांगली सुविधा झाल्याचे सांगितले.

गंभीर स्वरूपाचा दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या कवठेमहांकाळ तालुक्यातील चुडेखिंडी येथे उभारलेली चारा छावणी चुडेखिंडीसह परिसरातील 5 किलोमीटर अंतरामधील जांभुळणी आणि चोरोची या गावामधील पशुधनासाठी तारणहार ठरली आहे.

या दुष्काळी टापूत दुग्ध व्यवसाय हे प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. गेली दीड वर्षे पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होता. अशा स्थितीत पशुधन वाचवण्याचे मोठे आव्हान होते. चुडेखिंडीच्या लोकनेते जयसिंग तात्या शेंडगे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अक्षयतृतीयेला चारा छावणी सुरू केली.

याबाबत चारा छावणी चालक बापू संभा पाटील म्हणाले, शासनाच्या आदेशाप्रमाणे जनावरांना चारा, पशुखाद्‌य वाटप व चांगल्या प्रकारचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. या चारा छावणीचा चुडेखिंडी, जांभूळवाडी आणि चोरोची या तिन्ही गावांना चांगला लाभ होत आहे.

पशुपालक समिती सदस्य जगन्नाथ संत्राम पाटील म्हणाले, चारा, पाणी वाटपावर पशुपालक समिती लक्ष ठेवून आहे. या छावणीमुळे दुष्काळ भागातील जनावरे वाचली आहेत. लाभार्थी हिराबाई भुसनर आणि विजय शितोळे यांनी ही चारा छावणी सुरू केल्याबद्दल शासनाचे व प्रशासनाचे ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत.

जत तालुक्‌यात 30 चारा छावण्यांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी 28 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. जत तालुक्यातील लोहगाव येथे श्री मारूतीराव पाटील सार्वजनिक वाचनालय यांच्या माध्यमातून छावणी सुरू करण्यात आली आहे. छावणी चालक सचिन पाटील म्हणाले, 12 मे रोजी ही चारा छावणी सुरू केली आहे. शेतकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

माणिक बाबर (रा. आवंढी) यांची शेती नाही. त्यांची 5 जनावरे असून, त्यावरच त्यांचा चरितार्थ चालतो. चारा छावणीमुळे जनावरे वाचण्यास मदत झाली असल्याचे सांगून, त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.

भारत चव्हाण (रा. लोहगाव) आणि भाऊसो बर्गे यांनी परिसरात पाणी नाही, ज्वारीचे पीक नाही. या पार्श्वभूमिवर शासनाने चारा छावणीची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल आभार मानले आहेत. एकूणच गंभीर दुष्काळी तालुक्यांतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी उचललेल्या या पावलाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.

 

 

Web Title: Fodder fodder for drought-hit taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.