सांगली : जन्मदात्या पित्यानेच आपल्या तीन वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करुन मोबाईलवरुन त्याचा व्हीडीओ तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पित्याला बाललैंगिक अत्याचारविरोधी कायद्याखाली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करताना महिला संघटना व संतप्त नागरिकांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच खबरदारी घेतल्यामुळे अनर्थ टळला. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली.
मिरजेतील गुरुवार पेठेत राहणारा हा ३० वर्षीय नराधम पिता कंत्राटदार आहे. त्याचा जयसिंगपूर येथील तरुणीशी पाच वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्याला तीन वर्षाची मुलगी आहे. कौटुंबिक वादामुळे तो व पत्नी विभक्त राहतात. सध्या त्याची पत्नी मुलीसह जयसिंगपूर येथे माहेरी राहत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो विविध कारणे देऊन पत्नीला सांगलीत बोलवत आहे. शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी त्याने पत्नीला सांगलीला बोलाविले. त्याची पत्नी मुलीसह दुपारी तीन वाजता सांगली बस स्थानकावर आल्यानंतर, त्या दोघींना चारचाकी वाहनातून तो घेऊन गेला. रात्री साडेदहापर्यंत पत्नी व मुलीसह तो चारचाकी वाहनातून सांगली शहरात फिरत होता. त्यानंतर एका कमी वर्दळीच्या जागी वाहन थांबवून त्याने पत्नीसमोरच आपल्याच मुलीशी अश्लील चाळे सुरू केले. त्याची चित्रफीतही काढली. त्यानंतर, ही गोष्ट कोणाला सांगितल्यास चित्रफीत मोबाईलवरून सर्वत्र पसरविण्याची धमकीही त्याने पत्नीला दिली. या प्रकारानंतर पत्नीने नातेवाईकांसह मंगळवारी शहर पोलिसांत धाव घेऊन त्याच्याविरूद्ध फिर्याद दाखल केली.