ठळक मुद्देकोठडी मिळाली असताना बाहेर बसविलेसांगली शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदीपोलिसांनी बेदम चोप दिल्याची चर्चा

सांगली ,दि. ०७ : कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड या अभियंत्यास चाकूच्या धाकाने लुबाडल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे (वय २६) व अमोल सुनील भंडारे (वय २३, दोघे रा. भारतनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) या दोन संशयित आरोपींनी सांगली शहर पोलिस ठाण्यातून पलायन केले. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.


गायकवाड मुंबईत नोकरीस आहेत. रविवारी पहाटे ते नांदणी (ता. शिरोळ) येथे सासरवाडीला जाण्यासाठी एसटीने सांगलीच्या मुख्य बसस्थानकावर आले होते. त्यावेळी संशयितांनी त्यांना चल भावा, तूला नांदणीला सोडतो, असे म्हणून दुचाकीवर बसविले. त्यांना कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ नेऊन चाकूचा धाक दाखवून दोन हजाराची रोकड व मोबाईल काढून घेतला होता.

शहर पोलिसांनी या घटनेचा २४ तासात छडा लाऊन अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना अटक केली होती. सोमवारी दुपारी न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.


रात्री उशिरा या दोघांना चौकशीसाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले होते. चौकशीनंतर त्यांना पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. पोलिस त्यांच्या कामात व्यस्त होते. याची संधी साधून हे दोघेही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेले.

रात्री साडेबारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे आरोपींची कोठडी तपासणीसाठी पोलिस ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी हे दोन्ही आरोपी नसल्याचे लक्षात आले. त्यांनी विचारणा केल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर ड्युटीवरील पोलिसांना घाम फुटला. संशयितांच्या शोधासाठी शहर परिसरात पहाटे चार वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली होती. पण सुगावा लागला नाही.


मारहाणीची चर्चा

अटकेतील दोन्ही संशयितांना पोलिसांनी बेदम चोप दिला. त्यामुळे एकजण बेशुद्ध पडला. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी पोलिसांनी दोघांनाही वाऱ्याला पोलिस ठाण्याच्या पायरीवर बसविले होते. त्यावेळी पोलिस पुन्हा मारतील, या भितीने दोघेही पळून गेल्याची चर्चा आहे.