लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : लग्नाच्या अक्षतांना केवळ दोन तास राहिले असतानाच, हृदयविकाराच्या झटक्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाइकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला.
सांगलीत खासगी बँकेत काम करणाºया रवींद्र पिसे या तरुणाचा विवाह कोल्हापूर येथील नात्यातीलच तरुणीबरोबर ठरला होता. शनिवारी सकाळी पावणेबारा वाजता लग्नाचा मुहूर्त होता. वधूसह वºहाडी मंडळींचे शुक्रवारीच आगमन झाले होते. गेले आठवडाभर पिसे कुटुंबियांची लग्नाच्या तयारीसाठी लगबग सुरू होती. शुक्रवारी टाकळी रस्त्यावरील मंगल कार्यालयात साखरपुडा व हळदी सभारंभ मित्र व नातेवाइकांच्या उपस्थितीत आनंदात पार पडला. टेलरकाम करणारे रवींद्रचे वडील, आई, विवाहित बहिणीसह वधूकडील मंडळी सर्वजण शनिवारी होणाºया शुभकार्यासाठी आनंदात होते.
श्निवारी सकाळी नऊच्या दरम्यान रवींद्रला अत्यवस्थ वाटू लागल्याने तो मंगल कार्यालयातून कोणालाही न सांगता घरी आला. घरी आल्यानंतर उलटी झाल्याने घरासमोरील खासगी डॉक्टरांनी तपासून त्याचा रक्तदाब कमी झाल्याने रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. रवींद्रची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने त्यास वॉन्लेस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी तीन तास अगोदर रवींद्रच्या अकस्मात मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाईकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. रवींद्रसोबत सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर आभाळच कोसळले. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरू होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. शुभकार्यासाठी जमलेल्या नातेवाईकांना रवींद्रवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
धावपळ लग्नाची आणि अंत्यसंस्काराची
एम. कॉम.पर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या रवींद्रला दोन वर्षांपूर्वी खासगी बँकेत नोकरी मिळाली. नोकरीनंतर सहा महिन्यांपूर्वी घर बांधून झाले. नोकरी व घराची व्यवस्था झाल्यानंतर रवींद्रचे लग्न जुळले. मात्र, लग्नापूर्वीच रवींद्रचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या तयारीसाठी धावपळ करणाºया मित्र व नातेवाइकांना अंत्यसंस्कारासाठी धावपळ करावी लागली. नवरदेवाच्या आकस्मिक मृत्यूने लग्नासाठी जमलेल्या नातेवाइकांना व वधूकडील मंडळींना मोठा धक्का बसला. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाºया वधूवर तर आभाळच कोसळले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.