The crowd gathered to collect money in Sangli | सांगलीत बँकामध्ये पैसे काढण्यास गर्दी, दोन दिवसाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम
सांगलीत बँकामध्ये पैसे काढण्यास गर्दी, दोन दिवसाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम

ठळक मुद्देसांगलीत बँकामध्ये पैसे काढण्यास गर्दी, दोन दिवसाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणामएटीएम कार्ड बदलून देण्याच्या प्रक्रियेतही गोंधळ

सांगली : जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी, बँकामध्ये कालबाह्य झालेले एटीएम कार्ड बदलून देण्याचा प्रशासकीय गोंधळ सुरु झाल्याने शहरातील अनेक बँकासमोर पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या आहेत. दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप झाल्यामुळेही या गर्दीत भर पडली आहे.

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या सुचनेनुसार दि. ३१  डिसेंबर २0१८ पासून मॅग्नेटीक स्ट्रीप असलेले निळे एटीएम कार्ड व्यवहारातून बंद करण्यात आले आहे. नवीन ईएमव्ही चीप असलेले रुपे डेबिट एटीएम कार्ड बँकामध्ये बदलून देण्याची व्यवस्था केली आहे. पण अजूनही अनेक ग्राहकांना नवीन एटीएम कार्ड मिळालेली नाहीत.

बँकेत चौकशी केल्यानंतर पोस्टाने कार्ड घरी येईल, असे सांगितले जात आहे. ज्यांची कार्ड आली आहेत, त्यांना ती तातडीने बँकेतमधूनच बदलून दिली जात आहेत. ज्यांच्याकडे निळ्या रंगाची डेबीट कार्ड आहेत, त्यांना पंधरा दिवसात घरी पोस्टामार्फत मिळेल, असे सांगण्यात येते. १५ जानेवारीपर्यंत ग्राहकांना नवीन एटीम कार्ड मिळतील, असे दावा बँक अधिकाºयांनी केला आहे.

बहुतांश ग्राहकांना नवीन कार्ड मिळालेली नाहीत. जुने कार्ड कालबाह्य केल्याने त्याचा पैसे काढण्यास वापर होत नाही. यातच दोन दिवस बँक कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागला.

बँका बंद, एटीएम कार्ड कालबाह्य ठरविल्याने एटीएम कार्यालये ओस पडली होती. गुरुवारी बँका सुरु झाल्यानंतर चलनाद्वारे पैसे काढण्यास ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. राष्ट्रीयकृत बँका उघडण्यापूर्वीच ग्राहकांच्या रांगा लागलेल्या होत्या.

तीन तास रांगेत

राष्ट्रीयकृत बँकामध्ये नोकरदार, पेन्शनर्स यांची पैसे काढण्यास गर्दी झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. एटीएम कार्ड घेणाऱ्या ग्राहकांचीही यामध्ये भर पडली होती. ग्राहकांना तीन-तीन तास रांगेत उभा रहावे लागले. दुपारी अडीच वाजता जेवणाच्या सुट्टीनंतरही गर्दी कायम होती. एटीएम कार्डचा घोळ मिटेपर्यंत ही गर्दी अशीच राहण्याची शक्यता आहे.


Web Title: The crowd gathered to collect money in Sangli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.