ठळक मुद्देधरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने स्वीकारले आहे

वारणावती : चांदोली धरणाचा जलविद्युत प्रकल्प बंद झाला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी कमी झाले असून, ठिकठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींनाही कमी प्रमाणात पाणी मिळत आहे.

शिराळा पश्चिम विभागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ एक मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्याचे धोरण पाटबंधारे विभागाने स्वीकारले आहे. सध्या पावसाने पूर्ण उघडिप दिल्याने पाणलोट क्षेत्रातून केवळ शंभर क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्यावर सुरू असलेला जलविद्युत प्रकल्प बंद करण्यात आला आहे. धरणातून कोणताही विसर्ग सुरू नसल्याने वारणा नदीचे पाणी कमी झाले आहे.

काही ठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. कमी पाणी असल्याने पाणी पुरवठा योजनांच्या मोटारींना पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी जिल्'ातील मणदूर, वारणावती, सोनवडे, आरळा, करूंगली, चरण या गावांसह शाहूवाडी तालुक्यातील नदीकाठच्या गावाता पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.