भाजप, काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व गोंधळ... सांगली लोकसभा मतदारसंघ : कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 12:11 AM2019-02-26T00:11:56+5:302019-02-26T00:13:52+5:30

एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत समोर येत असताना, या दोन्ही पक्षांमधील गोंधळाची स्थिती जवळपास सारखीच दिसत आहे.

BJP, Congress pre-election rally ... Sangli Lok Sabha Constituency: Workers Paranoid | भाजप, काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व गोंधळ... सांगली लोकसभा मतदारसंघ : कार्यकर्ते संभ्रमात

भाजप, काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व गोंधळ... सांगली लोकसभा मतदारसंघ : कार्यकर्ते संभ्रमात

Next
ठळक मुद्देदोन्ही पक्षातील नेत्यांसमोर गटबाजीची डोकेदुखीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच दिसत आहेत.

अविनाश कोळी ।
सांगली : एकीकडे काँग्रेसमध्ये निर्माण झालेला उमेदवारीचा गोंधळ, तर पक्षांतर्गत गटबाजीने त्रासलेला भारतीय जनता पक्ष, यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये निवडणूकपूर्व संभ्रमावस्था दिसत आहे. प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून हे दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत समोर येत असताना, या दोन्ही पक्षांमधील गोंधळाची स्थिती जवळपास सारखीच दिसत आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघातील आघाडीची जागा काँग्रेसकडे असून, युती झाली असली तरी, ही जागा भाजपकडे आली आहे. त्यामुळे आघाडीतील राष्टवादी आणि युतीमधील शिवसेना हे पक्ष मित्रपक्षांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांना यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही. काँग्रेस व भाजपच्या राज्यातील नेत्यांनी सांगली लोकसभेसंदर्भात मुंबईत बैठका घेऊन तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र आदेशाप्रमाणे हालचाली होण्याऐवजी पक्षांतर्गत गोंधळ वाढत आहे.
काँग्रेसमधील उमेदवारीचा गोंधळ कायम आहे.

माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील आणि पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे दोनच इच्छुक उमेदवार उमेदवारीसाठी धडपडत आहेत. दुसरीकडे पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीतील सदस्यांकडून आ. विश्वजित कदम, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याकडेही उमेदवारीबद्दल विचारणा केली जात आहे. गटबाजीत विभागलेल्या काँग्रेससमोर उमेदवारीचा पेचप्रसंग उभा राहिला आहे. कोणालाही उमेदवारी दिली तरी, पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची चिंता वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याने, ते याबाबत सावधगिरीच्या भूमिकेत आहेत. काँग्रेसमधील उमेदवारीचा हा गोंधळ कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. उमेदवारी निश्चित नसताना निवडणुकीची तयारी करायची तरी कशी?, असा सवाल कार्यकर्ते उपस्थित करीत आहेत.

भाजपमध्ये खासदार संजयकाका पाटील यांची दावेदारी सर्वात मजबूत मानली जात असल्याने, त्यांच्यात उमेदवारीवरून कोणताही गोंधळ नाही. मात्र गटबाजीने पक्ष त्रस्त आहे. भाजपचे खासदार आणि काही आमदार एकमेकांशी संघर्ष करताना दिसून येत आहेत. खासदार-आमदारांमधील हा वाद पक्षासाठी सर्वात चिंतेचा विषय आहे. सभा, कार्यक्रमांमधूनही गटबाजीची झलक लोकांना पाहायला मिळत आहे. एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतरही पक्षाचे कार्यकर्ते अद्याप शांतच दिसत आहेत. दोन्ही पक्ष वेगवेगळ्या कारणांनी त्रस्त दिसत आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची चिन्हे असताना दोन्ही पक्षात शांतता आहे.

वरिष्ठांची हतबलता
काँग्रेस आणि भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीतील वरिष्ठ नेतेही पक्षांतर्गत वादावर तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहेत. त्यांची हतबलता या संघर्षाला अधिक बळ देताना दिसत आहे.

Web Title: BJP, Congress pre-election rally ... Sangli Lok Sabha Constituency: Workers Paranoid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.