राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 03:28 PM2019-05-10T15:28:26+5:302019-05-10T15:35:47+5:30

१९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.

Atpadi taluka at the political window after interrogation | राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

राजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र

googlenewsNext
ठळक मुद्देराजकीय पटलावर आटपाडी तालुका अखेर दखलपात्र सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित

अविनाश बाड

आटपाडी : १९९४ मध्ये विधानसभा निवडणुकीत जसा राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या पाठीशी ठामपणे आटपाडी तालुका उभा राहिला, अगदी तसाच प्रतिसाद या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांना तालुक्याने दिला. ही निवडणूक आटपाडीची अस्मिता जागृत करणारी ठरली. आता यापुढे तरी राजकीयदृष्ट्या आटपाडीला अदखलपात्र समजण्याची घोडचूक जिल्ह्यातील नेत्यांनी करू नये, असा इशाराच यानिमित्ताने मिळाला आहे.

राजेंद्रअण्णा देशमुख आणि अण्णासाहेब लेंगरे वगळता आजपर्यंत तालुक्यातून विधानसभेवर कोणीच गेलेले नाही. ५७ वर्षांत अमरसिंह देशमुख यांनी एकदा अल्पकाळासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. हे अपवाद वगळता तालुक्यातील नेतृत्वाला सत्तेत संधी मिळत नसल्याने तालुका विकासापासून वंचित राहिला.

आटपाडी तालुका यापूर्वी लोकसभेच्या पंढरपूर मतदारसंघाला जोडला होता, तेव्हा खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा, अशी परिस्थिती होती. खासदार रामदास आठवले यांच्या कालावधित तालुक्यात अधुनमधून दौरे व्हायचे. त्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात आटपाडीचा समावेश झाला. प्रतीक पाटील आणि संजयकाका पाटील यांना संधी मिळाली.

पण आटपाडीतील कोणत्याच नेत्याने लोकसभा निवडणुकीत उमेदवारी करून जिल्ह्याचे लक्ष यापूर्वी कधीच वेधून घेतलेले नाही. यावेळी मात्र वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली. आधी भाजपला एकतर्फी वाटणारी निवडणूक नंतर नंतर कमळाला डेंजर झोनकडे घेऊन गेली.

निवडणुकीचा निकाल काय लागायचा तो लागेल. पण त्याबाबत सध्या तरी ठामपणे, छातीठोकपणे सांगणाऱ्या राजकीय निरीक्षकांची वानवाच आहे. जिल्हा ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीने आटपाडीचे राजकीय महत्त्व अधोरेखित केले. पडळकरांच्या उमेदवारीमुळे भाजपसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची जिल्ह्यातील नेत्यांना मनधरणी करावी लागली. त्यांचे राजकीय महत्त्व वाढले. या तापलेल्या राजकीय वातावरणाचा येत्या विधानसभा निवडणुकीत कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.

वंचित आघाडीची मोट अशीच कायम राहिली, तर येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात अनेक मतदारसंघात त्याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीतून विधानसभा निवडणुकीत कोण निवडणूक लढविणार, कोण जिंकणार, कोणामुळे मतांचे विभाजन होऊन प्रस्थापित उमेदवाराला धूळ चारणार, याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत.

विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीची सूत्रे प्रथमच काही प्रमाणात का असेनात, पण आटपाडी तालुक्यातून हलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे झाले तर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात आटपाडी तालुक्याचे वेगळे स्थान निर्माण होईल यात शंका नाही.

Web Title: Atpadi taluka at the political window after interrogation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.