कुपवाड रुग्णालयाबाबत प्रसंगी याचिका ; मंजूर जागेतच रुग्णालय : शरद पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:28 PM2019-05-16T23:28:14+5:302019-05-16T23:31:45+5:30

सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी जागेत उभारण्याचा अट्टाहास सुरू आहे. सत्ताधाऱ्यांपुढे महापालिकेचे प्रशासनही हतबल झाले आहे. ...

 Appeal on Kupwara Hospital; Hospital in sanctioned place: Sharad Patil | कुपवाड रुग्णालयाबाबत प्रसंगी याचिका ; मंजूर जागेतच रुग्णालय : शरद पाटील

कुपवाड रुग्णालयाबाबत प्रसंगी याचिका ; मंजूर जागेतच रुग्णालय : शरद पाटील

Next
ठळक मुद्देप्रशासनाने कुपवाड गावठाणात जागा घ्यावी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ.

सांगली : कुपवाड येथील प्रस्तावित मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल खासगी जागेत उभारण्याचा अट्टाहास सुरू आहे. सत्ताधाऱ्यांपुढे महापालिकेचे प्रशासनही हतबल झाले आहे. खासगी जागा घेण्यामागे मोठे अर्थकारण असून, मंजूर जागेतच हे रुग्णालय झाले पाहिजे. अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत दिला.
प्रा. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी उपायुक्त मौसमी बर्डे-चौगुले यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले की, कुपवाड रुग्णालयासाठी महापालिकेच्या मालकीची वारणाली येथील स. नं. १९१ / अ / १+२ ही जागा निश्चित करण्यात आली. तसा महासभेचा ठरावही झाला. शासनानेही या प्रस्तावाला मंजुरी देऊन पाच कोटीचा निधी दिला. त्यामुळे या जागेवरच रुग्णालय उभारण्याची जबाबदारी आयुक्तांची आहे. पण प्रशासनाने आता दुसºयाच जागेचा पर्याय समोर आणला आहे. नवीन जागेचा अट्टाहास कशासाठी धरला जात आहे? असा सवालही त्यांनी केला. गत सत्ताधाऱ्यांच्या काळात रुग्णालय मंजूर झाले, तेव्हाच काम सुरू झाले असते तर हा वादच निर्माण झाला नसता. त्यामुळे या वादाला गत सत्ताधारीही तितकेच दोषी आहेत.

दुसºया जागेवर रुग्णालय उभारण्यास महापालिकेने परवानगी दिल्याचे जाहीर निवेदनात म्हटले आहे. हेही चुकीचे आहे. खासगी जागेवर परवानगी कधी, कोणी दिली? याचा खुलासा आयुक्तांनी करावा. ही जागा कुपवाड गावठाणापासून लांब आहे. खासगी जागेकडे जाण्यास रस्ता नाही. शिवाय औद्योगिक वसाहतीलगत जागा असल्याने प्रदूषणाचा प्रश्न आहेच. त्यात खासगी जागेसाठी महापालिकेला पैसे मोजावे लागतील. टीडीआरचा पर्याय असला तरी, तोही अप्रत्यक्षरित्या महापालिकेवर बोजाच आहे. ही खासगी जागा खरेदीमागे मोठे अर्थकारण आहे.

प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही मंडळी हा उपद््व्याप करीत आहेत. त्यात प्रशासनही हतबल झाल्याचे दिसते. या खासगी जागेला कुपवाडच्या जनतेचा विरोध आहे. रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या व महापालिकेच्या मालकीच्या वारणालीतील जागेतच हे रुग्णालय उभारावे, अशी आमची मागणी आहे. तसे न झाल्यास याप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक विष्णू माने, शशिकांत गायकवाड, प्रकाश पाटील, मोहनसिंग रजपूत, रमेश सायमोते, सचिन जमदाडे, दादासाहेब पाटील, श्रीकांत धोतरे, संदीप पाटील, वंदना मोरे, वैशाली कवलापूरकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

धुळगाव योजनेचे व्हॉल्व्ह अखेर दुरुस्त
सांगली : धुळगाव योजनेच्या सांबरवाडी हद्दीतील जलवाहिनीचे व्हॉल्व्ह बंद करण्याचे काम महापालिकेने गुरुवारी हाती घेतले. त्यामुळे पाणी चोरीचा प्रकार रोखण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अमित शिंदे, अजितसिंह डुबल यांनी दिली. ते म्हणाले की, शेरीनाल्याचे पाणी नियमितपणे द्या, अन्यथा पाणीच नको, अशी भूमिका घेत धुळगावच्या योजनेबद्दल आंदोलनाची सुरुवात केलेली होती. याबाबत महापालिका आयुक्तांसोबत ग्रामस्थांची बैठक पार पडली. बैठकीत ग्रामस्थांनी योजनेतील त्रुटी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्या. आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी योजनेच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी अधिकाºयांना सूचना दिल्या होत्या.

या योजनेच्या पाईपलाईनला सांबरवाडी येथील कालव्यामध्ये असणारे व्हॉल्व्ह उघडून पाण्याची चोरी होत होती. त्या ठिकाणी असणारा व्हॉल्व्ह बंद करून धुळगाव हद्दीमध्ये असणारा व्हॉल्व्ह उघडण्यात यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार महापालिका अधिकाºयांनी पाहणी करून सांबरवाडी येथील कालव्यामधील व्हॉल्व्ह महापालिकेकडून बंद करण्यात आला व धुळगाव हद्दीतील व्हॉल्व्ह उघडण्यात आला. यामुळे योजनेच्या पाण्याची चोरी रोखली जाणार आहे. यावेळी भास्कर डुबल, दामाजी डुबल, डॉ. विनोद डुबल, सागर डुबल, अमर जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रशासनाची कृती : बेकायदेशीर
वारणालीतील जागेत रुग्णालय बांधण्यास शासनाने मान्यता दिली असताना, दुसºया जागेचा पर्याय समोर आणण्यात आला. आयुक्तांनी यासंदर्भात जाहीर निवेदन देऊन सूचना व हरकती मागविल्या. ही कृतीच कायद्याच्या चौकटीबाहेरील आहे. प्रशासनाने कुपवाड गावठाणात जागा घ्यावी, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. पण कुपवाडपासून लांब खासगी जागेला आमचा विरोध असल्याचेही प्रा. पाटील यांनी सांगितले.

कुपवाडच्या प्रस्तावित रुग्णालयाच्या जागेप्रश्नी माजी आमदार प्रा. शरद पाटील यांनी गुरुवारी उपायुक्त मौसमी बर्डे यांना निवेदन दिले. नगरसेवक विष्णू माने, शशिकांत गायकवाड, प्रकाश पाटील आदी यावेळी उपस्थित होते. दुसºया छायाचित्रात धुळगाव येथे योजनेच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले.

Web Title:  Appeal on Kupwara Hospital; Hospital in sanctioned place: Sharad Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.