जत : चकनहळ्ळीत सशस्त्र दरोडा; मारहाणीत पाच जखमी दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 08:46 PM2018-09-20T20:46:19+5:302018-09-20T21:09:38+5:30

अचकनहळ्ळी (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर आठ दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत लोखंडी सळई, गज व काठीने बेदम मारहाण केली.

Ajna: Armed robbery in Chakanahalite; Five wounded Lakhas of Lakhpat with five wounded | जत : चकनहळ्ळीत सशस्त्र दरोडा; मारहाणीत पाच जखमी दीड लाखाचा ऐवज लंपास

जत : चकनहळ्ळीत सशस्त्र दरोडा; मारहाणीत पाच जखमी दीड लाखाचा ऐवज लंपास

Next
ठळक मुद्देपरिसरात घबराट

जत : अचकनहळ्ळी (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर दिलीप तुकाराम शिंदे यांच्या घरावर आठ दरोडेखोरांच्या टोळीने बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला. कुटुंबास जिवे मारण्याची धमकी देत लोखंडी सळई, गज व काठीने बेदम मारहाण केली. यामध्ये शिंदे यांच्यासह पाच जखमी झाले आहेत. टोळीने घरातील सोन्याचे दागिने व रोकड असा एक लाख साठ हजारांचा ऐवज लंपास केला. दरोड्याच्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचकनहळ्ळीपासून वायफळ रस्त्यावर एक किलोमीटरवर सोलनकर वस्ती आहे. या वस्तीपासून हाकेच्या अंतरावर दिलीप शिंदे यांचे शेत आहे. शेतातच त्यांनी घर बांधले आहे. आई, वडील, पत्नी व मुलासमवेत ते राहतात. बुधवारी रात्री हे कुटुंब जेवण करून झोपी गेले. मध्यरात्री दीड वाजता घराचा दरवाजा कोणीतरी ठोठावला. शिंदे झोपेतून जागे झाले. एवढ्या रात्री कोण आले आहे, म्हणून त्यांनी दरवाजा उघडला. तेवढ्यात आठजणांची टोळी त्यांना मारहाण करीत घरात घुसली. शिंदे यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच, टोळीने त्यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला केला. ते आरडाओरड करू लागताच घरातील लोक उठले.

सिंधूताई शिंदे, शालन शिंदे, दत्तात्रय शिंदे, तुकाराम शिंदे यांच्यावरही हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर, छातीवर, पाठीवर, मानेवर बेदम मारहाण केली. सिंधूताई शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, मोहन माळ, कर्णफुले असे ६३ ग्रॅम दागिने काढून घेतले. कपाट उघडून त्यातील साहित्य विस्कटले. लॉकरमधील चार हजाराची रोकडही लंपास केली.

टोळीचा अर्धा तास धुमाकूळ सुरू होता. घरात आणखी काही मिळते का, याचा त्यांनी शोध घेतला. पण दागिने व रोकडशिवाय त्यांना काहीच मिळाले नाही. सव्वादोन वाजता ही टोळी निघून गेली. त्यानंतर शिंदे यांनी मुलाच्या मोबाईलवरून काही ग्रामस्थांशी संपर्क साधून याची माहिती दिली. ग्रामस्थांनी शिंदे यांच्या घराकडे धाव घेतली. चोरटे वायफळ रस्त्याच्यादिशेने गेल्याचे समजताच ग्रामस्थांनी हातात काठ्या घेऊन शोध सुरू ठेवला. तेवढ्यात जत पोलिसांचे पथक दाखल झाले. ग्रामस्थ व पोलिसांनी स्वतंत्रपणे या टोळीचा पहाटेपर्यंत शोध घेण्यात आला. जत तालुक्यात येणाऱ्या मार्गावर नाकाबंदीही करण्यात आली होती. हल्ल्यात जखमी झालेल्या शिंदे कुटुंबावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. शिंदे यांची फिर्याद घेऊन दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.


‘एलसीबी’चे पथक दाखल
टोळीतील सदस्य २५ ते ३० वयोगटातील होते. ते एकमेकांशी हिंदी व मराठीत बोलत होते. ही टोळी कर्नाटकातील असावी, असा संशय आहे. त्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शिंदे यांच्याकडून पुन्हा घटनाक्रम जाणून घेऊन तपासाला दिशा दिली आहे.

सर्वांना खोलीत कोंडले
दहशत निर्माण करण्यासाठी दरोडेखोरांनी सर्वांना एका खोलीत कोंडले होते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथक आले होते. परंतु घरापासून अचकनहळ्ळी ते वायफळ या रस्त्यापर्यंत जाऊन श्वानपथक तेथेच घुटमळत राहिले. त्यांना निश्चित दिशा समजू शकली नाही.


अचकनहळ्ळी (ता. जत) येथील सोलनकर वस्तीवर दिलीप शिंदे यांच्या याच घरावर दरोडेखोरांनी बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकला.

Web Title: Ajna: Armed robbery in Chakanahalite; Five wounded Lakhas of Lakhpat with five wounded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.