मिरज तालुक्यात कृषी क्षेत्र घटले :- म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे चुकीचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 01:13 AM2019-05-16T01:13:28+5:302019-05-16T01:13:43+5:30

सदानंद औंधे । मिरज : उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील गावात पाणीटंचाई तीव्र आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तालुक्यातील काही ...

Agriculture sector declined in Miraj taluka: - Mistakes allocated water for M / S irrigation scheme | मिरज तालुक्यात कृषी क्षेत्र घटले :- म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे चुकीचे वाटप

मिरज तालुक्यात कृषी क्षेत्र घटले :- म्हैसाळ सिंचन योजनेच्या पाण्याचे चुकीचे वाटप

Next
ठळक मुद्देशेतीला पाणीटंचाईचा फटका

सदानंद औंधे ।
मिरज : उन्हाळ्यात मिरज पूर्व भागातील गावात पाणीटंचाई तीव्र आहे. म्हैसाळ योजना सुरू असतानाही तालुक्यातील काही गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पाणी टंचाईमुळे पिकांच्या लागवडीत घट झाली आहे. यामुळे यावर्षी कृषी उत्पादनात ५० टक्क्यांची घट होणार आहे. पूर्व भागातील अनेक गावांत पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

मिरज तालुक्यात ६४ गावे असून, यापैकी नदीकाठावरील गावे वगळता पूर्व भागातील सुमारे २५ गावांत पाण्याची समस्या आहे. म्हैसाळ योजना कार्यान्वित झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत मिरज पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. मात्र म्हैसाळचे अपूर्ण पोटकालवे व पाणी वाटपाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका शेतीला बसला आहे.

पाणी टंचाईमुळे खरीप हंगामात ५४ टक्के व रब्बी हंगामात ५३.६६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. पाण्याची कमतरता असल्याने लागवड झालेल्या क्षेत्रातील कृषी उत्पन्नातही घट होणार आहे. पश्चिम भागात नदीकाठच्या गावातील ऊस, सोयाबीन, भुईमूग, हरभरा, मका, मूग, उडीद या पिकांना पाणीटंचाईचा फटका बसलेला नाही. मात्र पूर्व भागात म्हैसाळ योजना सुरू असतानाही या गावात पीक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. अनेक गावात पिण्याचे पाणी आठ दिवसातून एकदा मिळत असल्याने त्याचा शेतीवर परिणाम झाला आहे.

रब्बी ज्वारीचे २३ हजार हेक्टर क्षेत्र असताना १६ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी व खरीप ज्वारीचे ३८५ हेक्टर क्षेत्र असताना केवळ ३८ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात ६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १० टक्के क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे ३१ हजार हेक्टर ऊस क्षेत्रापैकी ५ हजार ६०० हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. १३ हजार हेक्टर मक्याचे क्षेत्र असताना, ९ हजार हेक्टर पेरणी झाली आहे. याचप्रमाणे मूग, उडीद या कडधान्यांची ५२ टक्के व हरभऱ्याची २६ टक्के, भुईमुगाची ४४ टक्के, तर सोयाबीनची ४२ टक्के पेरणी झाली आहे.
यावर्षी तुरीचे क्षेत्र केवळ २२ टक्के आहे. पाणीटंचाईचा फळपिकांवर मोठा परिणाम झाला असून, खरीप हंगामात ५ हजार ४२६ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १७ हेक्टर क्षेत्रात लागवड झाल्याने फळांचे उत्पादन घटले आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सिंचनासाठी देण्यात येत आहे.

मात्र तांत्रिक बिघाडामुळे योजना महिनाभर बंद पडल्याने भोसे, कळंबी, पाटगाव, सांबरवाडी, गवळेवाडी परिसरासह कालव्याच्या क्षेत्रातील गावातील पिकांना फटका बसला आहे.

पोटकालव्यांतून अनियमित पाणी
तालुक्याच्या उत्तर भागात सोनी, भोसे, कळंबी, पाटगाव, सांबरवाडी, खरकटवाडी, कांचनपूर परिसरात म्हैसाळच्या पोटकालव्यांतून अनियमित पाणी मिळत असल्याने या परिसरातील शेतीवर परिणाम झाला आहे. म्हैसाळ योजनेच्या पोटकालव्यांची कामे अपूर्ण असल्याने सिंचनासाठी पाणी टंचाईची समस्या आहे. यावर्षी मिरज तालुक्यात अनेक गावांत पाणी टंचाईमुळे लागवडीत सरासरी ५० टक्के घट झाल्याने कृषी उत्पन्नातही मोठी घट होणार आहे.
मिरज तालुक्यात मका हेक्टरी २५ क्विंटल, भुईमूग ७ क्विंटल, मूग, उडीद हेक्टरी ६ क्विंटल व उसाचे हेक्टरी ८५ टन सरासरी उत्पादन होते. मात्र यावर्षी पाणी टंचाईमुळे हेक्टरी उत्पादनातही घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Agriculture sector declined in Miraj taluka: - Mistakes allocated water for M / S irrigation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.