ठळक मुद्दे३१८ ग्रॅम वजनाच्या (३२ तोळे) सोन्याच्या ९१ अंगठ्या घेऊन कामगाराचे पलायन सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हामुजाहिद शेखविरुद्ध राज्यातील काही शहरात गुन्हेशोध घेण्याचे शहर पोलिसांना आव्हान

सांगली ,दि. ०४ :  येथील गावभागातील सुशांत सदाशिव भुर्के या सुवर्णकाराला कामगाराकडूनच सुमारे नऊ लाखाचा गंडा बसल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला. ३१८ ग्रॅम वजनाच्या (३२ तोळे) सोन्याच्या ९१ अंगठ्या घेऊन कामगाराने पलायन केले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित कामगार मुजाहिद शेख व त्याचा साथीदार रियाजुल मिदा (दोघे रा. पश्चिम बंगाल) यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुशांत भुर्के हे गावभागातील वीरभद्र मंदिरासमोर राहतात. घरातच त्यांचा दागिने बनविणे व पॉलिश करुन देण्याचा व्यवसाय आहे. त्यांना दागिने पॉलिश करण्यासाठी कामगाराची गरज होती. संशयित रियाजुल मिदा हा पूर्वी काही कारागीरांकडे कामाला होता. तो सध्या कोल्हापुरातील एका कारागीराकडे काम करीत होता. पण सांगलीतच राहायला होता. त्याने १५ आॅक्टोबर २०१७ रोजी मुजाहिद शेख यास भुर्के यांच्याकडे नेले. रियाजुल मिदा ओळखीचा असल्याने भुर्के यांनी शेखला कामावर ठेवले.

३१ आॅक्टोबरला दुपारी अडीच वाजता भुर्के यांनी शेखला ३३१८ ग्रॅम वजनाच्या ९१ सोन्याच्या अंगठ्या पॉलिश करण्यासाठी दिल्या होत्या. शेखने या अंगठ्या ताब्यात घेतल्या. पाच-दहा मिनिटे अंगठ्या पॉलिश करण्याचे नाटक केले. त्यानंतर गडबड असल्याचे भासवत या अंगठ्या कपाटात ठेवत असल्याचा दिखावा करीत,  सेठ, आया मै दो मिनट मे, असे म्हणून त्याने दुकानातून पोबारा केला. दुपारचे चार वाजले तरी शेख परत आला नाही, म्हणून भुर्के यांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला. परंतु मोबाईल बंद होता.

सायंकाळी सहापर्यंत भुके त्याची प्रतीक्षा करीत दुकानात बसले होते. मात्र तरीही तो आला नाही. शेवटी त्यांनी कपाटात अंगठ्या आहेत का नाही, याची पाहणी केली. पण कपाटाला कुलूप होते. भुर्के यांनी कुलूप तोडून पाहिले असता, त्यामध्ये अंगठ्या नव्हत्या. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. त्यांनी शेखचा साथीदार रियाजुल मिदा याच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. मात्र त्याचाही मोबाईल बंद होता. मग मात्र भुर्के यांनी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.

पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड यांचे पथक गेल्या दोन दिवसांपासून शेख व मिदाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. मिदा कोल्हापूर येथे काम करीत असलेल्या सुवर्ण कारागीराकडेही ते जाऊन आले. तरीही मिदा तसेच शेखचा सुगावा लागला नाही.


मुजाहिद शेखविरुद्ध राज्यातील काही शहरात गुन्हे

मुजाहिद शेख याने यापूर्वीही राज्यातील काही शहरात सुवर्ण कारागीरांकडे नोकरीच्या बहाण्याने काम करताना त्यांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मिदासोबत त्याने ठरवूनच भुर्के यांच्या दुकानातील दागिन्यांवर डल्ला मारल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरुद्ध कुठे गुन्हे दाखल आहेत का? याची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.


शोध घेण्याचे आव्हान

शेख व मिदा या दोघांचा शोध घेणे शहर पोलिसांना आव्हान बनले आहे. भुर्के यांनी शेखला कामाला घेताना त्याचा बायोडाटाही घेतला नाही. त्याचा फोटोही घेतला नाही. केवळ मोबाईल नंबर घेतला आहे. शेखचे नाव काय आहे, हेही त्यांना माहिती नव्हते. गेले दोन दिवस सराफ कट्टा, गावभाग परिसरात चौकशी करुन पोलिसांनी त्याचे नाव निष्पन्न केले आहे. या माहितीच्याआधारे पोलिस त्याचा शोध घेत आहेत. येत्या एक-दोन दिवसात तपासासाठी शहर पोलिसांचे पथक पश्चिम बंगालला रवाना होणार आहे.