This is your home, this is my home | ये तेरा घर,ये मेरा घर : स्वप्नातलं घर वास्तवात ‘मांडताना’च्या रंग, रचना आणि पोतांचा विचार
ये तेरा घर,ये मेरा घर : स्वप्नातलं घर वास्तवात ‘मांडताना’च्या रंग, रचना आणि पोतांचा विचार

- स्नेहल जोशी 

तेरा घर ये मेरा घर, किसी को देखना हो गर,
तो पहले आ के मांग ले, तेरी नजर मेरी नजर...

गुलजारजींनी लिहिलेल्या या ओळी आपल्या ‘घर’ नावाच्या स्वप्नाला अगदी चपखल बसणाºया आहेत. खरंच, आपलं घर हा आपल्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय. दिवसभर धावपळ करून प्रत्येकाला विसावा देणारं, आपले चांगले-वाईट स्वभाव-सवयी सामावून घेणारं, कुटुंबातल्या सगळ्यांच्या तºहा जपणारं आणि अधूनमधून पै-पाहुण्यांनाही आपलंसं वाटणारं असं घर. अर्थात यात आरामाच्या कल्पना प्रत्येकाच्या अगदी भिन्न असतात. एका घरात राहणाºया चार लोकांच्यासुद्धा. रात्री जेवण झाल्यावर आजी-आजोबांना जरा टीव्हीङ्कबघायचा असतो तर बाबांना पेपर वाचायचा असतो, मुलाला आईकडून गोष्ट ऐकायची असते आणि काकाला म्युझिक ऐकायचं असतं. पण या सगळ्यांना स्वत:चा कोपरा मिळाला की मग सगळ्यांनाच ते घर आपलंसं वाटतं.

आपल्या जीवनशैलीचं आणि आपल्या घराचं खूप घट्ट नातं आहे. स्त्रिया शिकून नोकरी करायला लागल्या. त्यामुळे स्वयंपाक करायचा वेळ कमी झाला. जमिनीवर बसून स्वयंपाक करायच्या ऐवजी उभ्या-उभ्या करण्यात सोय वाटू लागली. त्याचबरोबर सगळ्या वस्तू हाताच्या टप्प्यात ठेवता याव्यात यासाठी स्वयंपाकघर लहान आणि नेटकं झालं. मोड्यूलर किचन हे याच जीवनशैलीचं प्रतीक आहे. ज्या काळात दूरदर्शन हे एकच चॅनल दिसायचं तेव्हा संपूर्ण कुटुंब टीव्हीङ्कबघायला एकत्र बसत असे आणि म्हणून टीव्हीङ्कहा लिव्हिंग रूममध्ये असायचा. आता निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम दाखवणारे खूप चॅनल्स आहेत. कुटुंबातला प्रत्येकजण एकाच वेळी आपल्याला हवा तो चॅनल बघतो. त्यासाठी लिव्हिंग रूममधला टीव्ही प्रत्येकाच्या बेडरूममध्ये गेला. थोडक्यात, बदलत्या जीवनशैलीप्रमाणे गरजा बदलतात आणि त्याचबरोबर घरंसुद्धा बदलत जातात.

आजकाल आपण सगळे, कामानिमित्त किंवा सहल म्हणूनही खूप प्रवास करतो. वेगवेगळ्या ठिकाणी जातो, आपल्यापेक्षा वेगळी घरं, वस्तू पाहतो आणि प्रभावित होतो. त्याचप्रमाणे सिनेमामधली, टीव्हीवरच्या मालिकांमधली घरं बघतो. त्यातला एखादा लेदरचा सोफा आपल्याला खूप भावतो आणि आपण तसाच सोफा आपल्या घरासाठी निवडतो. मग होतं काय, थंडीमध्ये हा सोफा गार पडतो आणि उन्हाळ्यात आपल्याला त्यावर बसून खूप घाम येतो.

म्हणजेच जीवनशैली प्रमाणेच आपण राहतो तिथलं स्थानिक हवामान घराची रचना करताना लक्षात घायला हवं. तापमानाबरोबर उजेड आणि वारा याचं व्यवस्थित नियोजन केलं की घर प्रसन्न वाटतं. सध्याच्या काळात प्रत्येकाला जमीन घेऊन घर बांधणं शक्य नसतं. अपार्टमेण्टमधलं घर घेताना काही तडजोडी कराव्या लागतात. तरीही खोलीची दिशा, तिथे असणारा उजेड आणि वारा लक्षात घेऊन तिचा वापर कशासाठी करावा हे ठरवता येतं. खोल्यांत सामानाची रचना करताना, रंग-पोत निवडतानासुद्धा सूक्ष्म हवामानाचा विचार करणं गरजेचं आहे.

बांधकाम - सजावटीचं तंत्रज्ञान आणि सामग्री यांचेही अनेक पर्याय उपलब्ध असतात. एकाच वस्तूचे, दिसायला सारखे पण किमतीनुसार बदलत्या दर्जाचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध होतात. काहीवेळेला यातलं काय निवडावं, असा प्रश्न पडतो. त्यात आर्थिकदृष्ट्या निर्णय घेणं सोपं असतं. पण इतर काही मुद्देही विचार करण्यासारखे असतात. आपण घेत असलेल्या एखाद्या वस्तूचा वापर कोण आणि कसा करणार आहे? किती काळासाठी ती आपण वापरणार आहोत. उदाहरणार्थ : खुर्ची - ती कोणासाठी आहे? लहान मुलांची असेल तर वाढती उंची लक्षात घेता ती २-३ वर्षं वापरणार की ५-६? मोठ्यांसाठी असल्यास २०-२५ वर्षं टिकावी अशी अपेक्षा आहे का? जेवणासाठी वापरणार की अभ्यासासाठी की आरामासाठी? यावरून आपण ती एका वेळेस अर्धा तास, १-२ तास की ४ तास वापरणार हे लक्षात येईल. कारण या तीनही कामांसाठी लागणाºया सोयी वेगळ्या आहेत. त्यात अपेक्षित अनुभव वेगळे आहेत. आणि त्यामुळे त्या खुर्चीचं मटेरिअल आणि त्याचा दर्जा बदलत जातो. जेवणाची खुर्ची कडक चालू शकते. खर्च कमी करायचा असेल तर त्यावर कुशन नसेल तरी चालतं. ती लाकडी किंवा धातूचीसुध्दा चालेल. पण आराम खुर्चीचा अनुभव खूप वेगळा आहे. तिच्यावर मऊ गादी हवी. तिचं मापपण ऐसपैस असावं.
छोटी गोष्ट. पण या सगळ्या गणितांमध्ये घर सजवताना दिसण्यापेक्षा घराच्या अनुभवाला महत्त्व द्यायला हवं. आपली जीवनशैली, हवामान आणि उपलब्ध पर्याय या सगळ्यांकडे जरा लक्ष दिलं की घर खुलवता येतं. अगदी छोटे छोटे बदल करूनसुद्धा घर सोयीस्कर, देखणं आणि नेटकं करता येतं.
हे सगळं कसं करायचं याविषयी या लेखमालेत थोड्या गप्पा करू आणि काही नमूनेही पाहू!

(लेखिका आर्किटेक्ट आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत. snehal@designnonstop.in)
 


Web Title: This is your home, this is my home
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.