You do- This belief and freedom make Vedangi Kulkarni to beacome fastest cylclist in Asia. | सायकलवर जगप्रदक्षिणा करण-या वेदांगीला तिच्या आई बाबांनी काय सांगितलं असेल?
सायकलवर जगप्रदक्षिणा करण-या वेदांगीला तिच्या आई बाबांनी काय सांगितलं असेल?

ठळक मुद्देसायकलने जगप्रदक्षिणा करणारी वेगवान आशियाई सायकलपटू वेदांगी कुलकर्णीच्या आई-वडिलांचा ‘प्रवास’

-अपर्णा कुलकर्णी

वेदांगीनं सायकलवरून जगप्रदक्षिणा पूर्ण केली, ऑस्ट्रेलियात पर्थमध्ये. 29 हजार किलोमीटरचा हा प्रवास पूर्ण झाला तेव्हा मी आणि तिचे बाबा तिच्यासोबत होतो. आपली मुलगी आशियातील सर्वात वेगवान सायकलपटू ठरली, तो क्षण आमच्यासाठी खूपच आनंददायी होता. वेदांगीच्या या मोहिमेत अनेक संकटं आली, जिवावर बेतणारे प्रसंग आले; पण ती शांत राहिली. न थांबता, मागे न फिरता जे ठरवलं ते तिनं पूर्ण केलं.
वय वर्षे 19 आणि 15 देश सायकलवर पालथे घालायचे, जगप्रदक्षिणा करायची हे सोपं नव्हतंच. हे दिव्य करायला तुम्ही तुमच्या मुलीला कशी परवानगी दिली असं अनेकजण विचारत. मात्र वेदांगीनं ठरवलं म्हणजे ती ही मोहीम पूर्ण करणार यावर आम्हा दोघांचा  पूर्ण विश्वास होता. हा विश्वास एका दिवसात निर्माण झाला नाही, ती लहान असल्यापासून तो होता.

वेदांगी स्वत:च्या आयुष्याचा स्वतंत्र विचार करते. तिची ध्येयं स्वत: ठरवते. जे ठरवलं आहे, ते कसं पूर्ण करणार, हे तिचं ती आखते. आम्ही पालक म्हणून तिच्यासोबत असतो. अगदी लहान असल्यापासून तिची शिकण्याची आणि एक पालक म्हणून तिला काही शिकवण्याची आमची हीच प्रक्रिया होती. आम्ही तुला हाताला धरून काहीही शिकवणार नाही. फक्त तुझ्यासोबत असू, जे करायचं, जे शिकायचं ते तुझं तू कर हे आम्ही तिला शब्दांतून नव्हे तर कृतीतून सांगत राहिलो. स्वावलंबन हा त्या वाटेवरचा पहिला धडा.  ‘कुठल्याही गोष्टीसाठी कुणावरही अवलंबून राहू नको. तू स्वत: कर. आधी बघ कसं करतात आणि मग तुझं तू कर’ हेच एक सूत्र. यामुळे वेदांगी फार लवकर स्वावलंबी झाली. स्वतंत्र विचार करायला शिकली. टीव्हीवर काय बघावं हे तिला आम्ही कधीच सांगितलं नाही. टीव्हीवरच्या कार्यक्रमांवर आम्ही तिघं मिळून चर्चा करायचो. या चर्चेतून चांगलं वाईट तिचं तिलाच समजत गेलं. अमुक वय आहे म्हणून अमुक पुस्तक वाच, असं म्हणून आयतं पुस्तक तिच्या हातात दिलं नाही.  पुस्तकांबाबत घरात बोलणं व्हायचंच, कुठल्या पुस्तकात काय आहे यावर चर्चा व्हायची. त्यातून तिची आवड, नजर तयार होत गेली. स्वत: निवडून वाचण्याच्या सवयीनं तिला वैविध्यपूर्ण वाचनाची सवय लागली. वेगवेगळी क्षेत्रं समजत गेली. समज येत गेली.

खूप पुढचं नियोजन केलं नाही. खिडक्या उघड्या ठेवल्या. वेदांगीची मतं, विचार ऐकून घ्यायला प्राधान्य दिलं. तिला काय वाटतं हे समजून घेतलं. कोणत्याही गोष्टीवर चटकन तिखट प्रतिक्रिया दिली नाही. तिचा विचार खोडून काढला नाही. त्यातून तिची अभिव्यक्ती खुलत गेली. तिला मोकळं वागण्याची सवय लागली.

वेदांगी मोठी होत होती, तिला तिचा अवकाशही मिळत होता. तिच्या स्पेसमध्ये लुडबूड करायची नाही हा नियम आम्ही दोघांनी पाळला. अगदी ती लहान असतानाही. वेदांगीला लहानपणापासून आपण एक स्वतंत्र व्यक्ती असल्याचा अनुभव घेता आला तो यामुळे. मात्र स्वातंत्र्य अनुभवताना जबाबदारीही असते याचं भानही तिला अगदी योग्य वेळी आलं. 

आठवी-नववीत असताना तिला फुटबॉल आवडू लागला. दहावीनंतर सायन्सला प्रवेश घेतला. आयआयटी करायचं होतं. पण ज्या कॉलेजला प्रवेश घेतला तिथे फुटबॉल प्रॅक्टिससाठी वेळ काढणं तिला कठीण वाटू लागलं तर तिनं थेट कॉलेजच बदललं.  गोव्यात गोल किपिंगचा ग्रास रूट लेव्हलचा कोर्स केला. फुटबॉल प्रशिक्षकाचा  ‘डी’  परवाना मिळवला.  पुढे परदेशात जाऊन तिला गोल किपिंगचंच शिक्षण घ्यायचं होतं तेवढय़ात तिची गाठ सायकलिंगशी पडली. फुटबॉल खेळताना सराव म्हणून ती सायकलिंग करत होती. सोबत तिचा एक मित्रही होता, तो  इंटरनॅशनल स्केटर होता. तोही मुख्य खेळाला आधारभूत म्हणूनच सायकलिंग करायचा. दोघंही खूप सायकलिंग करायचे. त्यातूनच तिला वेगवेगळ्या सायकल मोहिमांची माहिती मिळत गेली.

2016मध्ये वेदांगीने मनाली-खारदुंगला पास-लेह-द्रास या मार्गावर सायकल चालवली. सायकलिंगमधलं साहस तिचं तिलाच सापडलं. बारावीनंतर वेदांगी ‘बॉर्नमोथ’ या विद्यापीठात स्पोर्ट्स मॅनेजमेण्ट करायला   इंग्लंडला गेली. तिथे गेल्यावरही सायकलवरच्या साहस मोहिमा तिला स्वस्थ बसू देत नव्हत्या. पहिल्यांदा अपयश आलं, तरीही लंडन-एडिंबरा-लंडन हे 1440 किमीचं अंतर तिनं 18 तासात पूर्ण केलं.
इंग्लंडमधल्या ‘केण्डल फेस्टिव्हल’मध्ये  सायकलवर मोहिमा करणारी अनेक साहसी माणसं वेदांगीला भेटली. एव्हरेस्ट सात वेळा चढलेले 83 वर्षांचे गृहस्थ भेटले. तिथून परतल्यावर तिनं मध्यरात्री (भारतीय वेळेनुसार) अडीच वाजता बाबांना फोन केला. म्हणाली,   ‘बाबा मी सायकलवर जग प्रदक्षिणा करणार आहे ! - ऐकून आम्हाला फार आश्चर्य वाटलं नाही. उलट तिचे बाबा तिच्या नव्या साहसासाठी  तयार झाले.

मोहिमेपूर्वी ती भारतात आली होती. तिचे बाबा तिला एका भूगोलात डॉक्टरेट असलेल्या मित्राकडे घेऊन गेले. तिच्या सायकल मोहिमेच्या रूटमधल्या 15 देशांमधलं त्याकाळातलं भौगोलिक वातावरण काय असणार आहे याचा अंदाज घेतला. काही धोक्यांची तिला जाणीवही झाली, मात्र तरीही ती जगप्रदक्षिणा करणारच यावर ठाम होती. आमच्या विरोधाचा प्रश्नच नव्हता. तिनं तिचा निर्णय घेतला होता. संपूर्ण मोहिमेचा खर्च 65 लाख रुपये होता. एवढा पैसा, आता काय असं म्हणून आम्हीपण डगमगलो नाही.
ऑस्ट्रेलियातल्या पर्थपासून तिची मोहीम सुरू झाली. या मोहिमेत काही अंतरापर्यंत मी आणि तिचे बाबा अंतर राखून तिच्यासोबत होतो. पहिला टप्पा संपून वेदांगी न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर आम्ही भारतात परत आलो. लेक तिकडे एकटी सायकल चालवतेय, याची जाणीव होती; पण काळजी नाही वाटली कधी. ती निभावून नेईल याची आम्हाला खातरीच होती.  मोबाइलवरच्या ट्रॅकिंग अँपमुळे वेदांगी कुठल्या रूटवर सायकल चालवतेय हे आम्हाला कळत होतं. ती रोज व्हिडीओ कॉल करत होती. त्यामुळे तिला बघता यायचं,  मोहीम कशी चाललीय याचा अंदाज यायचा. 

पण एक घटना अशी घडली की एक आई म्हणून माझ्या मनात धडकी भरली.
एकदा वेदांगीचा फोन आला. व्हिडीओ कॉलवर ती मला निवांत बसलेली दिसली. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. काहीतरी घडलंय याचा अंदाज आला. मी खोदून खोदून विचारल्यावर शेवटी तिने सांगितलं. स्पेनमध्ये दरोडेखोरांनी गळ्याला चाकू लावून लूटमार केली होती. काळजीच वाटली. भीतीही. मी  इंग्लंडमध्ये तिच्या सर्व मित्रांना फोन केला. ती कशी आहे हे बघायला सांगितलं. पण माझ्या या काळजीमुळे वेदांगी मात्र दुखावली गेली. स्पष्टच म्हणाली, ‘तू माझ्या आयुष्यात लुडबूड करू नकोस !’  माझी काळजी तिला तिच्या स्वातंत्र्यात आडकाठी वाटत होती. मग मलाही राग आला. मुलीला आपली गरज नाही असं वाटून वाईटही वाटलं. नंतर मी तिला स्वत:हून फोन केला नाही. तिचा फोन आल्यावर रागही दाखवला नाही. तिच्या मोहिमेतले नाजूक टप्पे ओळखून वागायला मी शिकले होते. मागितल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही आणि मदत करायची नाही हेही ठरवलं होतं.

4000 किलोमीटरचा एक टप्पा ती भारतातून पूर्ण करणार होती. दिल्लीला तिला घ्यायला जायचं होतं. आम्ही दोघंही तयार झालो. मी स्वत: गाडी चालवत आम्ही दिल्लीला पोहोचलो. एरवी ती पहिल्यांदा तिच्या बाबांना भेटते. पण त्या दिवशी आधी मला भेटली. भेटताक्षणीच घट्ट मिठीच मारली. मनातल्या कितीतरी गोष्टी त्या एका कृतीनं गळून पडल्या. वेदांगी खूप थकलेली होती. कॅनडातल्या प्रवासात जंगलात वणवा पेटला होता. वणव्याचा धूर रस्त्यावर येत होता. त्या धुराचा तिच्या फुप्फुसांवर परिणाम झाला होता. पुढे आम्ही बंगलोर, चेन्नई, कोलकत्ता या मोहिमेत तिच्यासोबत अंतर राखून प्रवास करत होतो. तिला आमच्या आधाराची गरज नव्हती. पण आम्हाला ती नजरेसमोर हवी होती. तिच्या आसपास राहायचं होतं. ती आमची हौस. ती मात्र तिचं व्यवस्थित निभावून नेत होती. अगदी खाण्या-पिण्यासाठीही तिची व्यवस्था तीच करत होती. आम्ही फक्त तिच्या एखाद्या थांब्यावर तिच्यासोबत चहा-कॉफी घेत होतो. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तिला भेटत होतो. तिच्या साहसी मोहिमेचे साक्षीदार होत होतो. वेदांगीनं या सायकल मोहिमेत वाट्याला आलेल्या संघर्षाच्या खुणा कधीच चेहे-यावर दाखवल्या नाहीत. आम्हीही वेळ, पैसा यासाठी करावी लागणार्‍या धडपडीचा, तडजोडीचा ताण चेह-यावर कधी दिसू दिला नाही. साधारण सहा महिने आम्ही दुसरं कुठलंही काम केलं नाही. आता आम्ही नव्यानं आमच्या कामाला लागलो आहोत. नवं रूटीन लागतं आहे..
ख-या अर्थानं तिच्यासोबत आमचीही जगप्रदक्षिणाच पूर्ण झाली आहे !

 

...........

 

ठरवलं ते पूर्ण कर !
आपल्या मुलीला हसत-खेळत मोठं करायचं एवढंच माझं स्वप्न होतं. ते पूर्ण होण्यासाठी तसं वातावरण मी आणि अपर्णानं नेहेमी घरात ठेवलं. सायकलवरच्या जगप्रदक्षिणेत वादळ, वणवा, लूटमार, अस्वलं मागे लागणं असे कितीतरी प्रसंग वेदांगीच्या वाट्याला आले जे पालक म्हणून आम्हाला हादरवणारेच होते. पण आम्ही स्थिर/शांत राहिलो. थांब, माघार घे असं तिला कधीच म्हटलं नाही. पेडलिंग करत राहा एवढंच तिला सांगत होतो. लेक सायकलवर अनोळखी जगात जातेय याचं टेन्शन आलं नाही. कारण जगात वाईट माणसं असतात तशी चांगली माणसंही असतात यावर आमचा विश्वास होता.  

- विवेक कुलकर्णी
(वेदांगीचे वडील)

एकटीनं केलं, जमलं !

आईबाबा ट्रेकिंग करायचे. त्यामुळे अगदी तिसरी चौथीपासूनच मीही ट्रेकिंग करू लागले. घरातल्या घरात मी आणि आई जिम्नॅस्टिकचीही प्रॅक्टिस करायचो. घरातच दोन टोकांवर दोरी बांधून रोपवरून रिव्हर क्रॉसिंगची प्रॅक्टिसही मी आईबाबांबरोबर केली होती. या संपूर्ण मोहिमेत मला आधार द्यायला माझे आईबाबा होते. एका फोन कॉलवर ते मदत करू शकणार होते. मानसिक पातळीवर याचा मला खूप फायदा झाला.  पण तरीही मला हे सर्व एकटीनं करायचं होतं. एकटीनं जमू शकतं यावर विश्वास होता. त्यामुळे वाटेत आलेल्या कोणत्याही अडचणींचा मी बाऊ केला नाही. मी थांबले नाही आणि माझ्या आईबाबांनीही मला थांबवलं नाही.

- वेदांगी कुलकर्णी

(मुलाखत आणि शब्दांकन : माधुरी पेठकर)

sakhi@lokmat.com


Web Title: You do- This belief and freedom make Vedangi Kulkarni to beacome fastest cylclist in Asia.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.