Women's Day 2018 : story of anandibai joshi and rakhmabai raut | आनंदीबाई अन् रखमाबाई.. डॉक्टर होणाऱ्या नि प्रत्यक्ष डॉक्टरी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला!
आनंदीबाई अन् रखमाबाई.. डॉक्टर होणाऱ्या नि प्रत्यक्ष डॉक्टरी करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला!

- संकेत सातोपे

मुंबई : आधुनिकता आणि उदारमतवादाच्या रेट्यामुळे भारतीय स्त्रियांच्या पायांतील बेड्या किंचित मोकळ्या व्हायला सुरुवात झाली असतानाच्या काळात गरुड भरारी घेणाऱ्या दोघींची नावं कायम लक्षात राहतात. त्यातील एक नाव डॉ. आनंदीबाई जोशी आणि दुसरे डॉ. रखमाबाई राऊत! एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दोघींनी तत्कालीन समाजव्यवस्थेच्या स्त्रीविषयक गैरसमजुतींना छेद देत, आपापले कर्तृत्व सिद्ध केले. या दोघीही साधारण एकाच काळात एकाच क्षेत्रातील कर्तबगार महिला म्हणून नावारूपाला आल्या. त्यासाठी दोघींना समाजाच्या धारणांशी संघर्ष करावा लागला. या साम्यस्थळांबरोबरच दोघींच्या संघर्षात सूक्ष्मभेदही आहेत. आनंदीबाई यांना थेट तत्कालीन रुढींशी संघर्ष करावा लागला आणि त्यात त्यांच्यासोबत त्यांचे पती गोपाळराव पाठीशी उभे होते. पण रखमाबाईंचा संघर्ष रुढीबद्ध तत्कालीन कायद्याशीही झाला आणि त्यात त्यांचा सर्वांत मोठा झगडा थेट पतीशीच होता.

ठाण्याजवळच्या कल्याण येथील डॉ. आनंदीबाई यांचा विवाह तत्कालीन रितीप्रमाणे नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा तब्बल २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळराव जोशींशी लावून देण्यात आला. वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांच्यावर अकाली मातृत्व लादले गेले. त्यातून जन्माला आलेले मुलं काही दिवसांतच दगावले आणि वैद्यकीय शिक्षण घेण्याचे त्यांच्या मनाने घेतले. त्यामुळे अमेरिकेत एमडीच्या प्रबंधाचा त्यांचा विषयही भारतीय आर्य स्त्रीचे प्रसूतीशास्त्र हाच होता. या प्रवासासाठी लोकहितवादींसारख्या सुधारकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या गोपालरावांनी त्यांना प्रोत्साहित केले. मात्र या प्रवासात जाचक रुढींच्या बंधनाने आनंदीबाईंचा अवघ्या एकविशीत बळी घेतला. प्रकृतीने खचलेल्या आनंदीबाईंना अमेरिकेसारख्या देशाच्या हवामानाला मानवेल असा आहारबदल याच रुढीबद्धतेमुळे करता आला नाही. त्यामुळे क्षयाची बाधा होऊन त्या दगावल्या. भारतात आल्यावरही समुद्रलंघन करून आलेली महिला म्हणून अनेकांनी नाके मुरडली. यातून त्यांच्या उपचारांकडेही दुर्लक्ष झाले. आणि डॉक्टर म्हणून प्रत्यक्ष काम करू शकण्याआधीच त्या संपून गेल्या.

दुसरीकडे, रखमाबाई राऊत यांचा डॉक्टर असलेला सुधारणावादी सावत्र पिता त्यांना प्रोत्साहित करीत होता. त्यामुळे त्यांना संकुचित- सनातनी पतिकडे न जाण्याचा निर्णयही ठामपणे घेता आला. मात्र या निर्णयाविरोधात त्यांना केवळ सामाजिकच नव्हे, तर न्यायालयीन लढही द्यावा लागला. नांदण्यास तयार नसलेल्या रखमाबाईंवर त्यांचा पती दादाजी भिकाजी याने थेट न्यायालयात खटला भरला. हे प्रकरण प्रचंड सामाजिक उलथापालथ घडविणारे ठरले. विशेष म्हणजे यात लोकमान्य टिळकांसारख्या थोर नेत्यानेही रखमाबाईला टिच्चून विरोध केला. तरीही रखमाबाईंनी न डगमगता हा खंबीरपणे हा लढा दिला. नांदायला जाणे किंवा ६ महिन्यांचा कारावास असा निकाल न्यायालयाने देताच रखमाबाईंनी कारावासाची सिद्धता दाखवली, पण नवऱ्याकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर दोन हजार रुपयांची भरपाई पतीला दिल्यानंतर त्यांना या जाचक विवाहातून स्वतः सुटका करून घेता आली. आणि डॉक्टरीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली. इंग्लंडमध्ये डॉक्टरीची पदवी घेऊन, भारताच्या ओढीने त्या परतल्या आणि ९० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात अखेरपर्यंत त्या मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करीत राहिल्या. त्यांच्या लढ्यामुळे भारतात १८९१ साली पहिल्यांदाच लग्नासाठी किमान वय बंधनकारक करणारा कायदा अस्तित्वात आला. इथे विशेषतः नमूद करायला हवे की, पतीपासून विभक्त झाल्यानंतरही त्यांनी दुसरे लग्न केले नाही आणि पतीच्या निधनानंतर त्या विधवेच्या पोषखातच राहिल्या.

आज महिला दिनानिमित्त या दोन्ही दिग्गज महिलांना अभिवादन करतानाच, प्रत्येक महिलेतील स्त्रीत्वाचा आदर करण्यास प्रेरित होणे गरजेचे आहे. कारण शौर्य, धैर्य, पराक्रम, कर्तृत्व... अशा सगळ्या स्पृहणीय गोष्टी आपण नकळत 'पुरुषत्वा'शी आणि रडवेपणा, हळवेपणा, भित्रेपणा, अशा गोष्टी 'स्त्रित्वा'शी जोडतो. म्हणूनच 'खूब लढी 'मर्दानी' वो तो झाशिवाली रानी थी।, डॅशिंग आहे हा ती एकदम, एखाद्या पुरुषासारखी किंवा रडतोस काय पोरींसारखा; तुझ्यापेक्षा पोरी बऱ्या गाडी चालवतात', अशी वाक्य आपण सहज बोलून जातो. आज स्त्रीचा सन्मान होत असेल कदाचित, पण स्त्रित्वाचा अजून तितकासा नाही. कर्तृत्ववान स्त्रीला तिच्याही नकळत 'पुरुषी' गोटात ओढलं जातं आणि मग 'पुरुषत्वा'विना उद्धार नाही.. पुरुषत्वचं श्रेष्ठ हे बिंबवलं जातं. म्हणूनच बायकी वागणाऱ्या पुरुषांनाही हेटाळणी सहन करावी लागते आणि पुरुषी वागली की स्त्रीला विशेष किंमत दिली जाते. स्त्रित्व आणि पुरुषत्व यांच्यात  सामाजिक समता येत नाही, तोवर खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समता साधली जाणार नाही.
ही 'त्व' समता लवकरच साधली जावो, याच महिला दिनी शुभेच्छा!!


Web Title: Women's Day 2018 : story of anandibai joshi and rakhmabai raut
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.