- माधवी वागेश्वरी

बायका काय काय 
सहन करत जगतात.
इतकी कामं पूर्ण करायची असतात 
की मेल्यावरसुद्धा परतावं 
लागतं त्यासाठी. 
अकाली गेलेली एक आई
भूत होऊन परत येते
आणि परतल्यावर काय काय करते,
त्याची गोष्ट. 

आई गं, अशी काही कामं राहिली आहेत का तुझी जी तुला जिवंत असताना करता आली नसती?’ 
- हा प्रश्न एक मुलगी तिच्या आईच्या भुताला विचारते आहे. 
खरंच या सिनेमाच्या गोष्टीतील आईची अशी काही कामं राहिली आहेत जी मेल्यावरच पूर्ण होतील. ती कामं काय आहेत हे जेव्हा कळतं तेव्हा पोटात गोळा येतो. बायका काय काय सहन करत जगत राहतात. त्यांना इतकी कामं पूर्ण करायची असतात की मरणदेखील पुरं पडत नाही. काही प्रश्न मरणानंतर सुटतील असं जे वाटतं ते खरं असू शकतं, असं या सिनेमामुळं वाटतं. 
वोल्व्हर म्हणजे परत येणं. या सिनेमात आईला परत यावं लागतं. 
वोल्व्हर ही वर्ष २००६ ची १२१ मिनिटांची स्पॅनिश फिल्म आहे. तिचे दिग्दर्शक आहेत पेद्रो अलमेदोर. दृष्ट लागेल अशा कलाकारांचा ताफा या सिनेमाला लाभलेला आहे. पेनेलोप क्रूझ, कार्मेन मौरा, लोला ड्यूएनस, ब्लांका पोर्तीला आदी. या सगळ्याजणी म्हणजे स्पॅनिश फिल्म इंडस्ट्रीमधील फार महत्त्वाची नावं आहेत. या सिनेमात पेनेलोप क्रूझची अभिनय क्षमता तिच्या सौंदर्याला पार भेदून किती तरी मैल पुढे निघून गेली आहे. 
२००६ च्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या सर्वोच्च श्रेणीच्या ‘पाल्मे दे आॅर’ या बक्षिसासाठी हा सिनेमा स्पर्धेत होता. कान्समध्ये या सिनेमाला उत्कृष्ट पटकथा आणि उत्कृष्ट स्त्री कलाकार (यातील सहाजणींना विभागून) ही दोन बक्षिसं मिळाली होती. पेनेलोप क्रूझला २००६ च्या आॅस्करसाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळालं होतं. असं नामांकन मिळवणारी ती स्पेनमधली पहिली अभिनेत्री ठरली होती. निम्न मध्यमवर्गीय स्त्रियांच्या कुटुंबांची ही गोष्ट आहे. या सगळ्या कष्टकरी आहेत. सतत उष्ण वारे वाहणाऱ्या दक्षिण माद्रिदमधील एका गावात त्या राहतात. बाईचं लैंगिक जीवन, तिचं एकटेपण, तिचा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोन याबद्दल हा सिनेमा बोलतो.
रैमुंदा आणि सोले या दोघी बहिणी. रैमुंदा ठिकठिकाणी काम करून, कधी लोकांच्या जेवणाच्या आॅर्डर घेऊन घर चालवते. तिला १४ वर्षांची एक मुलगी आहे. तिचा नवरा काहीही काम करत नाही. घरी बसून बायकोच्या जिवावर बिअर पीत टीव्हीवर फुटबॉल मॅच पाहत बसतो. त्याची ‘नजर’ अजिबात चांगली नाही. सोले, घरीच ब्यूटिपार्लर चालवून पैसे कमवते. दोघी बहिणी सतत एकमेकांच्या मदतीला येतात. 
तीन वर्षांपूर्वी घराला आग लागून त्यातच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. उष्ण वारे वाहत असल्यानं आग लागण्याची घटना त्या गावात सामान्य समजली जाते. लोकं अकाली मरतात म्हणून त्यांची भुतं आपल्याला भेटायला येतात अशी अंधश्रद्धादेखील गावात आहे. वयस्कर आणि आजारी असलेल्या पॉला नावाच्या मावशीला भेटायला त्या दोघी बहिणी येतात. तिथेच त्यांची भेट आॅगस्टीनाशी होते. ही त्यांची जुनी शेजारीण. तिला दाट शंका आहे की रैमुंदा आणि सोलेची मरण पावलेली आई अर्थात तिचं भूत पॉलाची काळजी घेतं. पुढे मावशी वारल्यावर आईचं भूत सरळ सोलेच्या, म्हणजेच तिच्या मुलीच्या घरी राहायला येतं. 
पण खरंतर ते भूत नाही, तर आई जिवंत आहे. हे गुपित जेव्हा कळतं तेव्हा तिच्या भूत असण्यातच सगळ्यांची भलाई असते. तिचं भूतपण लपवण्यासाठी मग या बायकांची धावपळ सुरू होते. 
यात रैमुंदा आणि तिच्या आईच्या नात्याची वीण फार विचित्र आहे. रैमुंदा वयात आल्यावर गप्प होऊन गेली, तिचा आणि आईचा अबोला झाला. तो सुटण्यासाठी आईला भूत व्हावं लागलं. ते पाहून वाटतं, जिवंत असताना आपल्याला काय कौतुक असतं या अबोल्याचं कुणास ठाऊक? रागानं असो किंवा दु:खानं असो, या धरलेल्या अबोल्यानं काहीही साध्य होत नाही हे कळायला मरून बघायचं की काय? आपल्या पोरींना माया देऊन आईचं भूत कॅन्सर झालेल्या आॅगस्टीनाची काळजी घ्यायला निघून जातं. आॅगस्टीनाला अजूनही वाटतं ते भूत आहे, तिचा तो भ्रम तसाच ठेवून आई तिची प्रेमानं काळजी घेते आणि आपल्या पोरींना लपूनछपून भेटत राहते. 
एका मृत्यूचं गूढ, रैमुंदाच्या मुलीच्या जन्माचं रहस्य, त्या बायकांची जगण्याची धडपड याची मोट इतकी सुरेख पद्धतीने पेद्रो यांनी बांधली आहे की त्याला तोड नाही. त्यांच्या नजरेतून बाईला बघणं म्हणजे ‘बाई’ म्हणून समृद्ध होणं आहे. भाळी लिहिलेल्या दुर्दैवाला हसून कसं सामोरं जायचं हे या दिग्दर्शकाकडून शिकण्यासारखं आहे. त्यांच्या सिनेमातील स्त्रिया कधीही परिस्थितीसमोर पिचून जात नाहीत, गलितगात्र होत नाहीत. त्या एकमेकींचे हात घट्ट धरून परिस्थितीला तोंड देत राहतात. अगदी आपल्यासारख्या जिवंत हाडा-मांसाच्या सख्ख्या मैत्रिणी वाटतात. बाई समजून घेण्याचा इतका प्रामाणिक प्रयत्न फार कमी ठिकाणी पाहायला मिळतो. 
पेद्रो अलमेदोर हे जागतिक सिनेमातील, युरोपमधील अत्यंत महत्त्वाचे दिग्दर्शक आहेत. ‘सिनेमाची सुरुवात कशी करायची’, ‘त्याचा किती विचार करायचा असतो’ हे त्यांचा सिनेमा शिकवतो. 
याही सिनेमाची सुरुवात तुम्ही पाहाच. ती पाहून नाही तुम्ही पूर्ण सिनेमा पाहिला तर ते म्हणतात ना, ‘स्वत:चं नाव नाही सांगणार पुन्हा’ असं हे सगळं प्रकरण आहे.