The winning story of 'Mumbai Shrine' - that is what Dr. Manjiri Bhasra is saying about his tough endeavors. | ‘मुंबई श्री’ किताब जिंकणा -या डॉ मंजिरी भावसार सांगता आहेत त्यांच्या खडतर प्रयत्नांची गोष्ट.
‘मुंबई श्री’ किताब जिंकणा -या डॉ मंजिरी भावसार सांगता आहेत त्यांच्या खडतर प्रयत्नांची गोष्ट.

-डॉ. मंजिरी भावसार


मालेगावासारख्या छोट्या शहरात राहताना आयुष्याला एक चौकट होती. राहण्या-फिरण्यावर बरीच बंधनं होती. यात माझ्या मनातले विचार, इच्छा हेही एका मर्यादेतच व्यक्त व्हायचे. मला लहानपणापासून क्रिएटिव्ह काहीतरी करायची आवड होती. त्यात कलांमध्ये अधिक मन रमायचं. पण एका मर्यादेपलीकडे त्यातही फार काही करण्याची संधी मिळाली नाही. डॉक्टर व्हायचं ठरलं होतं. त्याप्रमाणे एकीकडे अभ्यास सुरू होता.
- आज मी व्यवसायानं होमिओपॅथी डॉक्टर आहे. पण माझी आवड ही फक्त अभ्यासाशी निगडित कधीच नव्हती. चौकटीबाहेरच्या शरीरसौष्ठव क्षेत्नात आल्यानंतर तर या गोष्टीची जाणीव मला प्रकर्षानं झाली.

तरुण वयात कलाविषयक जाणिवा पूर्ण करण्यासाठी धडपड करू लागले. प्रसंगी बंडखोरीचा मार्गही पत्करला; पण पदरी हवं तसं यश आलं नाही. मग मुंबईत आल्यानंतर नृत्य शिकले, अभिनयाचे धडे गिरवणं सुरू झालं. याशिवाय, अभिनय क्षेत्राची आवड जपण्यासाठी नाटक, लघुपट, माहितीपट आणि जाहिरात अशा निरनिराळ्या माध्यमांत काम करायचा अनुभव घेतला. मात्र  इतकं वेगवेगळ्या माध्यमांत काम करूनही मन समाधानी नव्हतं. काहीतरी वेगळं करण्याचा मार्ग सतत मला खुणावत होता. अर्थात त्या क्षणी ते ओळखणं  माझ्यासाठी सोपं नव्हतं.

मालेगाव दूर सारून आता सात वर्ष उलटली होती. लग्नानंतर मुंबईत आले. गाव खेड्यातलं साध-सोपं पठडीतलं जगणं आणि मुंबईतलं दगदगीच, पावलोपावली स्पर्धेच आयुष्य यात आतल्या आत घुसमटही झाली. या दोन्ही ठिकाणच्या संस्कृती- विचारसरणीत जमीन-अस्मानचा फरक होता. मनात अनेक स्वप्नं दडलेली होती. अनेक अपूर्ण राहिलेल्या इच्छा होत्या. त्याच्याच मदतीनं स्वत:चा नव्यानं शोध घेणंही सुरू होतं.

मुंबईत आल्यानंतर एका नव्या जगण्याचा शोध लागला. हे जगणं अनुभवण्यासाठी मी आतुर होते. मग माझा नवरा भूषणच्या साथीनं ते धाडस करायचं ठरवलं. पूर्वीपासूनच पती शरीरसौष्ठव क्षेत्नात असल्यानं त्याचा डाएट, वर्कआउट, स्पर्धांची तयारी हे सगळं मी पाहात, अनुभवत होते. अशातच अडीच वर्षांपूर्वी जिममध्ये एका इन्टेन्स डाएट आणि वर्कआउटला सुरुवात झाली आणि नवर्‍याच्या आग्रहामुळे मी त्यात सहभागी झाले होते. त्या 45 दिवसांच्या कार्यशाळेत सहभागी झालेल्या 15 मुलींपैकी माझ्या शरीरातील घडलेले बदल पाहून भूषणलाही आश्चर्य वाटलं. इतक्या कमी दिवसांत माझ्या शरीरात दिसू लागलेले अँब्स आणखीन वर्कआउटसाठी प्रेरणा देत होते. त्या दरम्यान भूषणनं या क्षेत्नात उतरण्याविषयी विचारलं आणि मग तिथूनच या क्षेत्रासाठीच्या प्रवासाला ख-या अर्थानं दिशा मिळाली.

शरीराला विशिष्ट प्रकारे घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागली.  त्यात आहारावर नियंत्रण ठेवावं लागलं. याखेरीज मानसिक स्वास्थ्यावरही काम करण्यासाठी ध्यान, योगासनं सातत्यानं करावी लागली. सुरुवातीला रोजच्या रोज हे सर्व करणं खूप अवघड गेलं. या काळात डाएट सांभाळणं खूप अवघड होतं. एकतर मला गोड खूप आवडायचं; पण त्यावर बंधनं आली. मुंबईत राहून फास्ट फूडचीही सवय झाली होती, ती सवय सोडायलाही खूप जड गेलं. 

माझा डाएट प्लॅन म्हणजे केवळ वजन कमी करणं नव्हतं तर पिळदार शरीर बनवणं हा त्यामागील उद्देश होता. प्रशिक्षणाच्या खडतर काळात भूषण अनेक शरीरसौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी मलाही सोबत नेत असे. त्यामुळे तेथील वातावरण, तिथल्या महिलांचं बिकिनीमध्ये वावरणं, आजूबाजूच्या लोकांच्या नजरा, त्या महिलांची तयारी - सादरीकरण या सगळ्या गोष्टींचं मी बारकाईनं निरीक्षण करत होते.

अखेरीस नाशिक-मालेगावच्या या पंजाबी ड्रेस आणि साडीमध्ये वावरणा-या मुलीला पहिल्यांदा बिकिनीमध्ये स्टेजवर जायची वेळ आलीच. माहरेच्यांचा संपूर्ण विरोध होता.  सासरच्यांनी विचार करूनच निर्णय घे अशी भूमिका घेतलेली होती. त्यामुळे त्या क्षणाला प्रचंड भीती, तणाव, संकोच अशा सगळ्याच भावनांनी मनात गर्दी केली होती. आपल्या आजूबाजूला असणा-या स्पर्धकांच्या चेहर्‍यावरील आत्मविश्वास आणि  माझं तिथं असणं यात तफावत होती. पण मग तो क्षण आला.

.. माझ्या हातात फक्त 60 सेकंद होते. ती वेळ फक्त माझी होती. आणि ती मी जगले. त्या 60 सेकंदांत  जगाची पर्वा न करता बिनधास्तपणे सादरीकरण केलं, त्यावेळेस स्टेजवरून खाली येण्यापूर्वी मनानं शरीरसौष्ठव क्षेत्राकरिता हिरवा कंदिल दाखवला होता. याच वेगळेपणाच्या चौकटी-पल्याडच्या जगण्याच्या शोधात तर मी होते. ते त्या 60 सेकंदांत मला उमगत गेलं. 

पिळदार देहयष्टी कमावलेल्या स्त्रीकडे पाहणारा समाजाचा दृष्टिकोन मागासलेला आहे याची जाणीवही पावलोपावली झाली. यात केवळ पुरुषच होते असं नव्हे तर टीका     करणा-या , मला बघून कुजबुजणा-या, नावं ठेवणा-या स्त्रियाही आघाडीवर होत्या. 
‘बाई असून स्नायू दिसतात.’   
‘ही बाई कशी पुरुषी दिसते’, 
‘एका मुलाची आई असून, असं वागणं 
बरं दिसतं का?’  
- अशा असंख्य टीका-टिपण्यांना, दोष देणा -या नजरांना रात्रंदिवस सामोरं जावं लागलं. पण या सगळ्या खरं तर अशक्यप्राय प्रवासात पतीनं खंबीरपणे साथ दिली आणि  मी माझं असणं स्वीकारलं. माझं माझ्या शरीरावर प्रेमं होतं. त्यामुळे असल्या नजरा असो वा शब्द याचा कुठलाही परिणाम माझ्या निश्चयावर  होऊ द्यायचा नाही असं मी ठरवलं आणि माझे प्रयत्न सुरू ठेवले. वेगळ्या धाटणीच्या या शरीरसौष्ठव क्षेत्नात आता मी स्थिरावतेय.  

जग काय म्हणेल याची आता मला भीती वाटत नाही. 

2017मध्ये  ‘शेरू क्लासिक’ स्पर्धेत ‘भारत र्शी’चा सन्मान मिळाला, त्यानंतर पुण्यात गेल्या वर्षी झालेल्या ‘आशियाई अजिंक्यपद शरीरसौष्ठव’ स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं. मग आत्मविश्वासात वाढ झाल्यानं थेट सातासमुद्रापार थायलंड येथे आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत जागतिक पातळीवर पाचवा क्रमांक पटकावला. 

एकामागोमाग मिळालेल्या या यशानं  घरच्यांचा विरोध मावळला. आता माहेरचे आणि सासरचे सर्वजण मला पाठिंबा देत आहेत. सासरच्यांनी तर माझं हे यश साजरं करण्यासाठी खास सन्मान सोहळाही आयोजित केला होता. कुटुंबीयांमध्ये झालेला हा बदल मला आणखी प्रेरणा देणारा होता. नुकताच मिळालेला मुंबई श्रीचा किताब हीसुद्धा माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेसाठी प्रवेशिका न आल्यानं स्पर्धा रद्द झाली होती.  मात्न यंदा हाच किताब मिळाल्यानं मला खूप आनंद झालाय.
देशासाठी सुवर्णपदक आणणं एवढंच आता माझं लक्ष आहे. त्यासाठी मेहनत घेणं सुरूच आहे. पण त्या दरम्यानच्या प्रवासात माझ्यासारख्या अनेक जणींना या क्षेत्रात येण्यासाठी  मला प्रेरितही करायचं आहे !

-----------------------------------------------------------------

प्रत्येकीचं शरीर निराळं,
त्याचा स्वभावही वेगळाच
!
1. गेल्या काही वर्षात आपल्याकडच्या मुलींना वजन कमी करण्याचं खुळ लागलं आहे, मात्र  या नादात करण्यात येणारे क्रॅ श डाएट, केवळ ग्रीन टी वा लेमन टी पिऊन दिवस काढणे किंवा इंटरनेटवरच्या गोष्टी आंधळेपणाने स्वीकारणं ही शरीराशी केलेली हेळसांड आहे.

2. या उलट आपल्याकडे असलेल्या आहाराचा समप्रमाणात सेवन करणं, स्वत:च्या शरीराला आहे तसं स्वीकारून योग्य तो बदल घडवणं गरजेच आहे.

3. प्रत्येकाच शरीर वेगळं, त्याप्रमाणे त्याचा मेंटेनन्स वेगळा असतो. त्यामुळे आपल्या शरीराचा अभ्यास करून ते नेमकं काय स्वीकारतंय, काय नाकारतंय हे समजून घेतलं पाहिजे.

4. योग्य प्रमाणात आहार, योगा, ध्यानधारणा, आप्तेष्टांशी गप्पा, जिम या सर्व गोष्टींचा समतोल राखला की आपोआप वजन कमी होण्यास मदत होते, शिवाय फिट राहण्यासाठी हा योग्य मंत्र  आहे.

शब्दांकन-  स्नेहा मोरे
संदर्भ सहाय्य - प्रसाद लाड


Web Title:  The winning story of 'Mumbai Shrine' - that is what Dr. Manjiri Bhasra is saying about his tough endeavors.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.