-  डॉ. हरीष शेट्टी

  
लग्नाशिवाय मूल याविषयाला एक ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ आहे. असा निर्णय घेणाऱ्यांची एक विशिष्ट इमेज तयार होत असते. हा असा निर्णय फक्त स्टार व्हॅल्यू असलेले लोकच घेतात असं नाही तर सामान्य स्त्री पुरूषही लग्नाशिवाय मुलाचा पर्याय निवडताना दिसत आहेत. 
एकट्या बाईनं, एकट्या पुरूषानं, समलिंगी जोडप्यानं पालकत्त्वाची भूमिका स्विकारणं यात दचकून जाण्यासारखं काही नाही. याला चूक किंवा बरोबर असं काहीही म्हणता येत नाही. कारण या विषयातलं चूक आणि बरोबर परिस्थितीनुसारच ठरत असतं.मूल लहानाचं मोठं करताना वेगवेगळ्या टप्प्यावर पालकत्त्वाची निरनिराळी भूमिका असते ती मूल लहान असल्यापासून मोठं होईपर्यंत आई/ बाबा/पालक झालेल्यांना पार पाडता यायला हवी. 
मुलाला आई आणि बाबा असणं ही आदर्श पालकत्त्वाची व्याख्या. पण काळानुसार यात बदल करणं गरजेचं आहे. आणि बदलेली परिस्थिती हे सांगते की मुलाला आई आणि बाबा दोन्हीही हवेत हा निव्वळ गैरसमज आहे. मुलाला आई किंवा बाबा असं कोणीही चालतं. अट एकच : त्याला किंवा तिला मुलाच्या सर्व गरजा पूर्ण करता यायला हव्यात. त्याच्या किंवा तिच्या सान्निध्यात मुलाच्या सर्व मानवी हक्कांचं रक्षण व्हायला हवं. आर्थिक दृष्ट्या तो किंवा ती सक्षम असावी. आणि त्याचं किंवा तिचं मानसिक आरोग्य उत्तम असायला हवं. या अटी पार पाडता आल्या तर तो किंवा ती एकेरी पालकत्व स्विकारू शकतात. सुश्मिता सेननं एका मुलाखतीत म्हटलं होतं , ‘ प्रत्येक विवाहित माता ही मुलांची सिंगल पेरेंटच असते’. 
आताच्या जागतिकीकरण्याच्या परिस्थितीत तुम्ही जी पाहिजे ती वस्तू बाजारात विकत घेवू शकता. जागतिक बाजारपेठेत सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. तसंच मुलाच्या बाबतीतही झालय. मला मूल हवंय असं त्याला किंवा तिला वाटलं तर काही नियमांची पूर्तता केल्यास मूल मिळू शकतं. पारंपरिक पालकत्त्वात आई बाबा होताना स्त्री पुरूषामध्ये ती नैसर्गिक जाणीव तीवतेनं होते. त्या जाणीवेनं स्त्रीला मातृत्त्वाची आणि पुरूषाला पितृत्त्वाची गरज/जाणिव निर्माण होते.तशा भावना, रसायनं त्यांच्या शरीरात स्त्रवत असतात. मूल जन्माला आल्यानंतर आपसूकच त्या बाळाचं पालन पोषण करतान आई-बाबा दोन्हीही जीव ओतून आपल्या भूमिका पार पाडत असतात. 
पण ऐच्छिक एकेरी पालकत्त्वात मूल बाहेरून आणलं जातं. अशा परिस्थितीत त्यानं किंवा तिनं आपल्या मनातल्या बाळाविषयीच्या इच्छेचा शोध घ्यायला हवा. मनातल्या कोपऱ्यात दडलेली ती गरज मनाच्या पृष्ठभागावर आणायला हवी. ती तशी आली तरच पालकत्त्वाच्या सर्व भूमिका मनापासून पार पाडल्या जातील. एकेरी पालकत्त्व स्वीकारणाऱ्यांनी या विषयावर गांभीर्यानं समुपदेशन घेणं गरजेचं आहे. 
कुत्र्याचं पिल्लू घरात पाळायला आणतानाही ते आणण्याआधी घरातल्या मुलाचं समुपदेशन होणं गरजेचं असतं. आपल्याकडे कुत्तू हवा हे मुलाला वरवर वाटत असतं. पण या वरवर वाटण्यालाच भावना जोडणं, जबाबदाऱ्यांची जाणीव जोडणं महत्त्वाचं असतं. तेच काम समुपदेशन करतं. ते पिल्लू आणणं एवढचं काम नसून त्या पिल्लाला जीव लावणं, त्याची शी शू काढणं, त्याला खेळवणं, जपणं हे सर्व त्यात येतं हे मुलाला आणि त्या कुटुंबाला समजावून दिलं जातं. तसंच माणसाच्या बाबतीतही आहे. मूल हवंय असं वाटणं जितकं महत्त्वाचं तितकंच त्या मुलाच्या जबाबदारीची गांभीर्यानं जाणीव होणंही महत्त्वाचं. 
एकल पालकत्त्वाची भूमिका स्वीकारणारे समाजाच्या दृष्टीनं विशेष बनतात. हे ठीक. पण म्हणून त्या पालकांनी त्याच विशेषांच्या भूमिकेत वावरणं चुकीचं. कारण त्या भूमिकेत राहिलं तर मूळ पालकत्त्वाकडे दुर्लक्ष होण्याची भीती असते. आणि आपण जीवनात काहीतरी विशेष केलं फक्त हीच हवा डोक्यात राहाते. एकेरी पालकत्त्व स्वीकारणाऱ्यांनी या विशेष भूमिकेतून बाहेर पडून सामान्यांच्या पातळीवर येणं गरजेचं असतं तरच मुलांच संगोपनं इतर सामान्य मुलांप्रमाणे होवू शकतं. 
मुलांना वाढताना आईच्या ममत्वाप्रमाणे बाबांचा कणखरपणाही हवा असतो. पण म्हणून मुलांना आई आणि बाबा दोन्हीही हवेत असं नाही. खरंतर प्रत्येक स्त्रीमध्ये ममत्त्व असतं तसा पुरूषांसारखा कणखरपणाही असतो. आणि प्रत्येक पुरूषामध्ये कणखरपणा जसा असतो तसं ममत्त्वही दडलेलं असतं. त्यामुळे त्यानं किंवा तिनं एकेरी पालकत्त्व स्वीकारलेलं असलं तरी मुलाचं संगोपन करताना त्या मुलाला ममत्त्व आणि कणखरपणा दोन्हीही अनुभवायला मिळेल याची काळजी घ्यावी. 
एकेरी पालकत्त्वातून मूल वाढवताना त्या मुलाला नाती कळणं महत्त्वाचं. मुलाचं सामाजिकीकरण होणंही महत्त्वाचं. त्या मुलाला सर्व नाती अनुभवायला मिळाली पाहिजे ही जबाबदारी शेवटी पालकांचीच असते. नाहीतर मुलांच्या मनात कायम एक रिकामी जागा राहाते. जी केवळ एखादी गोष्ट अनुभवायला न मिळाल्यानं निर्माण होणारी पोकळी असते. एकेरी पालकत्त्व जबाबदारीनं पेलताना आपल्या मुलांच्या आयुष्यात अशा निरर्थक पोकळ्या राहणार नाही याची काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. 
आयव्हीएफ, सरोगसी असे विज्ञानानं उपलब्ध करून दिलेले पर्याय स्वीकारून पालक होणाऱ्यांनी त्या इवल्याशा बाळासाठी सर्व काही करणं अपेक्षित आहे. बाळांच्या आजारपणात एरवी आई बाबांना करावी लागणारी जागरणं ही या एकेरी पालकांनाही लागू आहेतच. 
मूल मोठं होत जातं तसं त्याला आपण कोण, कुठले असे प्रश्न पडतात. या प्रश्नांची उत्तरं देताना आई बाबांना पार खापर पणजोबांपर्यंत सांगावं लागतं. पण जेव्हा मुल दत्तक घेतलेलं असतं तेव्हा भविष्यात त्याला/ तिलाही असे प्रश्न पडतील तेव्हा काय सांगावं याचा विचार पालकांनी योग्य वेळीच करून ठेवायला हवा. मुलांना आपल्या इतिहासाविषयीही ममत्व असतं, त्यांना ते अनुभवायला मिळायलाचं हवं. 
मुलांच्या गरजा, त्यांचे हक्क, त्यांच्या भावना, जाणीवा जपणारं संगोपन करू शकणार असाल, त्यांना आर्थिक, सामाजिक, मानसिक सुरक्षा पुरवता येणार असेल तर मग स्त्रीनं, पुरूषानं, दोन स्त्रियांनी अथवा दोन पुरूषांनी मुलाचं पालकत्त्वं स्विकारणं यात काहीच वावगं नाही. 
आजच्या काळात बदलाला महत्त्व आहे. आपल्या अवतीभवतीची प्रत्येक गोष्ट बदलत आहे. आणि म्हणूनच जिवंतपणा आहे, चैतन्य आहे. तेच पालकत्वाच्याबाबतीतही घडतय. सर्वच गोष्टींमध्ये आव्हानं असतात. तशी या एकेरी पालकत्त्वातही आहेत. आव्हानं आहेत म्हणून कोणी थांबत नाही. एकेरी पालकत्त्वात आव्हानं आहे, म्हणून ते स्वीकारायचं नाही असं घडत नाहीये. आणि म्हणूनच एकेरी पालकत्त्वाची आव्हानं स्वीकारणारी माणसं अवती भवती दिसतात. त्यांच्या अशा भूमिकेमुळे जसे प्रश्न निर्माण होतात तशी उत्तरंही सापडताना दिसतात.

(लेखक प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)