- माधवी वागेश्वरी

ख्रिस्तोफर ग्रॅज्युएट होतो.
आपली सर्व कागदपत्रं फाडून टाकतो आणि जंगलात जातो. 
माणसांकडे पाठ आणि डोंगरदऱ्यांकडे तोंड करून बसतो. 
पण खरंच सापडते का त्याला हवी असलेली शांतता?

i also know how important it is in life not necessarily to be strong but to feel strong. To measure yourself at least once. To find yourself at least once in the most ancient of human conditions. Facing the blind deaf stone alone, with nothing to help you but your hands and your own head.

अवघं २४ वर्षांचं आयुष्य जगलेल्या ख्रिस्तोफरचं हे वाक्य. शहरी कलकलाट सोडून जंगलाच्या नीरव शांततेत विसावणारा ख्रिस्तोफर, शांततेसाठी भटकत राहणारा ख्रिस्तोफर, लहानपणी हवी ती मायेची ऊब न मिळाल्यानं प्रेमाकडे कायमची पाठ करून आणि नदी-डोंगरांकडे तोंड करून बसणारा ख्रिस्तोफर. तो म्हणतो, ‘काही माणसांच्या भाळी प्रेम लिहिलेलंच नसतं, मग ते निर्वात पोकळीत निघून जातात.’ ‘इन टू द वाइल्ड’ या सिनेमातील कितीतरी जण आज स्वत:चं नातं ख्रिस्तोफरशी सांगू शकतील. या सिनेमातील मुक्तपणाविषयी बोलणारी ती गाणी, ज्यांनी सिनेमा पाहिला ते विसरू शकलेले नाहीत. कधीच न विसरण्यासाठी एकदा तरी पाहावा असा हा सिनेमा आहे, ‘इन टू द वाइल्ड’. 
‘इन टू द वाइल्ड’ ही २००७ ची अमेरिकन फिल्म आहे. या फिल्मचं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती सेन पेन यांनी केली आहे. जॉन क्रकुर यांच्या १९९६ मधील ‘इन टू द वाइल्ड’ नावाच्या पुस्तकावर आधारित ही फिल्म आहे. १९९० च्या सुमारास ख्रिस्तोफरनं उत्तर अमेरिकेत जे जीवन व्यतीत केलं आणि अलास्काच्या पर्वतरांगांमध्ये आणि जंगलांमध्ये एकटा राहिला असताना त्याला जे अनुभव आले त्यावर हे पुस्तक आणि अर्थात सिनेमाही आधारित आहे. इमिले या अभिनेत्यानं यात ख्रिस्तोफरचं अप्रतिम काम केलं आहे. २००७ सालच्या रोम इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या सिनेमाचा प्रीमियर झाला होता. प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब आणि आॅस्कर पुरस्कारासाठी या सिनेमाला नामांकन मिळालं होतं. या सिनेमातील सर्व गाणी आजही अनेकजणांच्या ओठावर आहेत. त्यातील ‘गॅरीटेंड’ या गाण्यासाठी एडीला ‘गाण्यासाठीचं’ गोल्डन ग्लोब मिळालं होतं. उत्तम संकलन आणि उत्तम सहयक अभिनेता या दोन विभागात सिनेमाला आॅस्करसाठी नामांकन मिळालं होतं. सरधोपटपणे या सिनेमात कथा सांगितलेली नाही. ख्रिस्तोफरनं अलास्काच्या जंगलात एकट्यानं घालवलेला काळ, तेथे पोहोचण्यासाठी त्याला दोन वर्षं लागली; त्या दोन वर्षांचा प्रवास आणि त्याचं लहानपण, त्याचं घर, त्याचे पालक असं सगळं काही त्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या निवेदनातून सिनेमात समजत जातं. 
‘नॉन लिनियर’ पद्धतीनं यात पटकथा बांधलेली आहे. याचा अर्थ कथा सरळ पुढे जात नाही, तर कधी मागे कधी पुढे करून सांगितली जाते. पण हे तंत्र ‘केवळ वाटलं’ म्हणून किंवा ‘उगाच प्रयोग’ म्हणून येथे वापरलेलं नाही. ख्रिस्तोफर असा का झाला हे कळण्यासाठी, त्याच्या जीवनाबद्दलची धारणा कशी घडली हे समजण्यासाठी आणि त्याच्या त्या सर्व प्रवासाची त्याच्याबरोबर आपलीदेखील उत्सुकता वाढवण्यासाठी अतिशय कौशल्यानं हे तंत्र या सिनेमात वापरलं आहे. 
मे १९९० मध्ये युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएट झाल्यावर तो रूढीची वाट सोडून देतो. तो त्याची सगळी सरकारी कागदपत्रं फाडून टाकतो, क्रेडिट कार्ड्स कापून टाकतो, त्याचे पैसे एका संस्थेला दान देऊन टाकतो आणि आई- वडिलांनी त्याला गिफ्ट दिलेली कार घेऊन प्रवासाला निघतो. त्याच्या आईबाबांना आणि खूप जवळच्या असलेल्या बहिणीलादेखील काहीही सांगत नाही की तो कुठे चालला आहे. एका पूरग्रस्त भागात कार सोडून, स्वत:जवळचं जे काही उरले आहेत ते पैसे जाळून तो भटकायला निघतो. भटकण्यासाठी अलेक्झांडर सुपरट्रम्प नाव धारण करतो. आणि सुरू होतो त्याचा अलास्काला जायचा प्रवास. या प्रवासात त्याला भेटणारे लोक, एक हिप्पी जोडपं, हार्वेस्टिंग कंपनी चालवणारा एक माणूस अशी कितीतरी माणसं त्याला भेटत राहतात. लायसन्स नसताना कोलेरॅडो नदी त्यानं पार करून जाणं, मग त्याचं पुन्हा त्या हिप्पी जोडप्याला भेटणं, तिथली एक टीनेजर मुलगी त्याच्या प्रेमात पडते. पण तो तिला नकार देतो. त्याला अलास्का गाठायचं असतं. बस्स हेच त्याचं ध्येय असतं! 
अलास्काच्या दिशेनं प्रवास करताना त्याला कॅलिफोर्नियाला एक आजोबा भेटतात. या आजोबांनी एका अपघातात आपलं संपूर्ण कुटुंब गमावलेलं आहे, ते अमेरिकेच्या आर्मीत होते आता निवृत्त झालेले आहेत आणि एकटेदेखील. आता फावल्या वेळात ते लेदर वर्कर म्हणून काम करतात. जेवढा वेळ ख्रिस्तोफर त्यांच्या जवळ असतो तेव्हा ते त्याला लेदर वर्क शिकवतात. याचा फार चांगला उपयोग सिनेमात केला आहे. ख्रिस्तोफरचं झिजत जाणारं शरीर त्या लेदरच्या बेल्टवरून कळतं. 
त्याला काहीच बांधून ठेवत नाही. ना त्या ‘कोवळ्या मुलीचं शरीर’ ना त्या आजोबांनी डोळ्यात पाणी आणून केलेलं ‘मी तुला नातू म्हणून दत्तक घेऊ का?’ हे आर्जव. ते सगळं मागे सोडून तो पुढे जात राहतो. 
अलास्काला पोहोचल्यावर त्याला एक खटारा बस सापडते. तिला तो ‘मॅजिक बस’ म्हणतो. त्यातच पूर्णपणे जंगली पद्धतीनं जगतो. प्राणी मारून खातो, पुस्तकं वाचत बसतो, डायरी लिहितो आणि निसर्गाच्या सान्निध्यात राहतो. अलास्काला चार महिन्यांनंतर जेव्हा त्याच्या जवळचा अन्नसाठा संपू लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की निसर्गसुद्धा माणसांसारखाच क्रूर आहे. भुकेच्या नादात तो एक विषारी वनस्पतीची पानं खातो. आजारी पडतो. तो इतका झिजलेला असतो की त्याला एक पाऊल पुढे टाकणं केवळ अशक्य होतं. तो डायरीत लिहितो, true happiness can only be found when shared with others.आणि तो मरतो. 
पण त्या ख्रिस्तोफरला म्हणावंसं वाटतं तो जो काही खरोखरीचा आनंद सापडणार आहे तो शेअर करायला कोणी तरी पाहिजे. याचा अर्थ इथे परावलंबन आलं. जिथे परावलंबीपण आहे तिथे दु:ख, अशांतता, असुरक्षितता आलीच. मेख अशी आहे की आपल्याला प्रेम हवं आहे पण आपलं प्रेम आसक्तीचं आहे. आपण प्रेमात दुसऱ्याला मोकळं सोडू शकत नाही इथेच आपलं घोडं अडतं आहे. त्या घोड्याला उधळू देता आलं पाहिजे. मनमुक्तपणे बागडू देता आलं पाहिजे. त्याच्या डोळ्यावर झापडं बांधता कामा नये. ते जर करता आलं तर मग अलास्काच्या जंगलात जा किंवा शहरी गोंगाटात राहा आपण मोकळे असू. मुद्दा आपले पाश, मग ते काटेरी असो किंवा सुखावणारे, सैलसर करून मुक्त होण्याचा आहे.
दुसरं काय?