why women's feel insecure and hesitate while sharing seat with men's? | शेजारच्या जागेवर पुरूष बसणार असेल तर महिलांच्या मनात कायम संकोच का असतो?
शेजारच्या जागेवर पुरूष बसणार असेल तर महिलांच्या मनात कायम संकोच का असतो?

-योगेश गायकवाड


बस, रेल्वे, मेट्रो, विमान अशा कुठल्याही प्रवासात कायद्यानं राखून ठेवलेली ‘लेडिज सीट’ आम्हाला मान्यच आहे. पण त्याव्यतिरिक्त ज्या कोणत्या सीटवर महिला बसते तिच्या शेजारची सीट आपोआप ‘महिला राखीव’ होऊन जाते. यावर मात्र तमाम (सभ्य) पुरुष जातीच्या वतीनं मी तीव्र आक्षेप घेत आहे. 

बस शिवाजीनगरहूनच भरून आलेली असते. आपण नाशिक फाट्याला चढतो आणि फक्त दोन सीट्स रिकाम्या असतात. एक अर्थातच सर्वात मागच्या रांगेतली आणि दुसरी मधली. मागे सुपातल्या दाण्यांसारखं उडत जाण्यापेक्षा मधल्या ‘त्या’ रिकाम्या सीटकडे आपण आकर्षित होतो. नशिबाला शाब्बास म्हणत पुढे झेपावतो तोच शेजारी बसलेल्या ‘लेडिज’ (मराठीत एका महिलेलापण आदरार्थी ‘लेडिज’ म्हणायचं असतं) आपल्या धारदार कटाक्षानं आपल्याला रोखतात. आणि जणू काही शेजारची ती सीट त्या घरूनच घेऊन आलेल्या आहेत अशा थाटात आपल्याला सांगतात, ‘‘मागे आहे ना एक सीट? ही लेडिज सीट आहे.’’ कशावरून? तर एक लेडिज बसलेल्या असताना त्यांच्या शेजारी एक तुच्छ पुरुष बसूच कसा शकतो?? बाईसाहेब जिथे बसतील त्याच्या शेजारची सीट ही आपोआप ‘महिला राखीव’ होऊन जाते. असा अलिखित नियम आहे. 

बसमध्ये शिरताना आपल्याला फक्त रिकामी सीट दिसलेली असते, हा ‘डबल धमाका’ आपल्याला नंतर दिसलेला असतो. त्या धक्क्यातून सावरत असतानाच मागून आलेली तरुण होस्टेलवाशीण टुणकन उडी मारून मागची सुपातली सीट पकडते. आत्ता?? आता तर ही एकच सीट रिकामी आहे त्यामुळे नाइलाजानं आपल्याला लेडिज मॅडम शेजारीच बसावं लागेल. आपण आशाळभूत नजरेनं त्यांच्या होकाराची वाट पाहात असतो आणि आख्खी बस आपल्या नाकावर लाल चोच आणि पाठीवरच्या सॅकमधून हिरवे पंख कधी निघतील याची वाट बघत असते. अखेर जास्तीची मेजॉरिटी होते आणि त्या लेडिज बाई मागे बसलेल्या त्या मुलीला शेजारी बसण्याचं आमंत्रण देतात आणि अत्यंत तो-यात आपल्याला मागे सुपात जायला सांगतात. तळपायाची आग (मधले सगळे अवयव ओलांडून) मस्तकात जाते. ‘स्त्रीदाक्षिण्य म्हणतात याला’’, शिवाजीनगरपासून बसून आलेला कोणीतरी पुटपुटतो. गर्दीत लपलेला असतो, नाहीतर ‘आपत्कालीन मार्गातून’ आधी बाहेर फेकला गेला असता. जन्माला आलेल्या प्रत्येक पुरुषाला या प्रसंगातून कधी न कधी जावंच लागतं.

मला सांगा यात पुरुषाची काय चूक?

ती सीट कायद्यानं महिलांसाठी राखून ठेवलेली नव्हती. बाईनं नजरेचा वार करेपर्यंत आपल्याला फक्त रिकामी सीटच दिसत होती. त्यामुळे आपलं मन साफ होतं. आपण बसमध्ये आधी चढलेलो असताना त्या हॉस्टेलवाशिणीला का म्हणून प्रिव्हिलेज सीट मिळावी??  एक मिनिटं ! लगेच ‘पुरुषाची जात वाईट, शेजारी बसू दिलं तर चान्स मारून स्पर्श करतात.. वगैरे कॅसेट सुरू करायची नाही.

सगळे पुरुष तसे नसतात.

त्यांनापण तुमच्यासारखं लवकरात लवकर नाशिक गाठायचं असतं. त्याच्याकडेपण टाइमपासला त्याचा त्याचा फोन असतो. तरीपण बायका फक्त चेहरा बघून सरसकट सर्व पुरुषांना वापिलिपी कशा काय समजू शकता? 

प्रवासाचं सोडा, परवा एकटाच सिनेमाला गेलो तर तिथेपण तेच. राष्ट्रगीत संपल्यावर सगळ्यांचे पाय तुडवत तीन महिला (अंधारात वयं दिसली नाहीत) आल्या आणि शेजारी बसल्या. गप समोरचा सिनेमा बघावा ना? पण नाही ! आधी शेजारी कोण बसलंय हे बघण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट. आणि मग ती ललना, मदनाची पुतळी बघते तर काय?  (एको) शेजारी चक्क एक तुच्छ पुरुष? लगेच त्यांनी पलीकडे बसलेल्या माझ्यासारख्याच स्वच्छ भावनेनं सिनेमा बघायला आलेल्या एका आजोबांना ‘काइंडली अँडजस्ट’ म्हणत माझ्या शेजारी बसवलं.थिएटरच्या अंधारात माझा अवतारही न बघता तिला का वाटलं की मी सिनेमा सोडून तिला गुदगुल्या करत बसीन?? बरं चला, उगाच ‘पुरुषाची परीक्षा कशाला घ्या’ म्हणून तिनं सुरक्षा म्हणून अँडजस्टमेण्ट केली असेल असं जरी मानलं तरी हा सज्जन पुरुषांवर अन्यायच आहे. आणि ‘अ.भा. मनात पाप नसलेले पुरुष’ संघटनेतर्फे मी असल्या तमाम लेडिजचा निषेध करतो. 
या निमित्तानं मला या लेडिज लोकांना मनापासून विचारावंसं वाटतं, की खरंच तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी सातत्यानं पुरुषांचे असे अनुभव येतात का हो? की ‘पुरुषाच्या जातीपासून सावधान’ असं तुमचं

‘अपब्रिंगीग’ केलेलं असतं म्हणून? की तुम्हाला काही अडचण नसते; पण समाज, घरचे काय म्हणतील याचा विचार तुमच्या अबोध मनामध्ये असतो? तुम्हाला कधीच वाटत नाही का की प्रवासात आपल्या शेजारच्या सीटवर मस्त एखादा पुरुष यावा.  

दोघांच्या मध्ये आपली पर्स खुपसून का होईना; पण सहज गप्पा मारत प्रवास छान व्हावा? एक पुरुष म्हणून मी अधिकारानं सांगतो की, हो आमच्या मनात असे लड्ड नेहमीच फुटतात. तसे तुम्हा बायकांच्या मनात फुटतच नाहीत का? की फुटायच्या आधीच तुम्हाला ते लाडू चेपून टाकावे लागतात? काय हरकत आहे अनोळखी पुरुषाच्या शेजारी बसून दोन तास सिनेमा बघितला तर? एखाद्याला डायलॉगला एकमेकांकडे बघून दाद दिली तर?? काय हरकत आहे सहप्रवासी पुरुष असला तर? एसटीच्या ढाब्यावरच्या जेवणाला दोघांनी मिळून शिव्या दिल्या तर? सगळ्याच पुरुषांना काही त्या जबरदस्तीच्या स्पर्शाची गंमत वाटत नाही.

तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे की, प्रवासात भेटणा-या अनोळखी पुरुषाला शत्रू  न मानता दोन घटकांचा सहप्रवासी मानावा.

पण मला माहितीये, तुम्हाला मनातून जरी हे पटत असलं तरी तुम्ही तसं अजिबात करणार नाही. कारण तुम्ही जरा बरं बोललात तर आमचे जातभाई बाकी एकदम जंटलमनसारखं वागतील; पण बसमधून उतरता उतरता हळूच तुमचा मोबाइल नंबर मागतील..

(लेखक सामाजिक विषयांवरील फिल्ममेकर आहेत.) 

yogmh15@gmail.com


Web Title: why women's feel insecure and hesitate while sharing seat with men's?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.