Why parents getting panic when thier kids suffer from small health problem? | लहान मुलांचं दुखणं खुपणं आणि आई बाबांची पंचाईत.
लहान मुलांचं दुखणं खुपणं आणि आई बाबांची पंचाईत.

-मुकेश माचकर


प्रसंग पहिला

नुकत्याच जन्मलेल्या बाळाला स्वच्छ करून, गुंडाळून आईच्या कुशीत आणून ठेवलं गेलं. सकाळच्या कोवळ्या सोनेरी उन्हात त्या छोटुशा परीचं सगळं अंग सोनेरी दिसत होतं. फक्त पाठीवर एक मोहरीच्या दाण्यापेक्षा थोडा मोठा ओरखडा होता.  आपल्या लेकीच्या कोडकौतुकात मग्न असलेल्या आई-बाबांना तो दिसलाही नाही.

चार दिवसांनी तिचं रडं वाढलं. ती प्रचंड वेदनांनी रडते आहे, असं वाटायचं. पोटभरून दूध प्यायल्यानंतरही ते रडं थांबत नव्हतं. पाचव्या-सहाव्या दिवशी तिला अंघोळ घालायला येणार्‍या मावशींनी सांगितलं, तिच्या पाठीवर पुळी आहे, लाल झालंय, तिथे हात लावला की ती रडते. ताबडतोब बालरोगतज्ज्ञाकडे नेल्यावर त्याने हे इन्फेक्शन आहे, अँडमिट करू या असं सांगितलं. तीन बाय सात फुटाच्या ‘रूम’मध्ये आईबरोबर बाळ ‘अँडमिट’ झालं. 

अख्खी रात्र सलाइन लावण्यापलीकडे कसलाही उपचार डॉक्टरनं केला नाही. रात्री बाळाचं रडं थांबलं नाही.. सकाळी तिची त्वचा फिकुटलेली आणि  पिवळसर दिसत होती. तिच्या चेहर्‍यावरचं सगळं तेज गेलं होतं. 

सकाळच्या राउण्डला आल्यावर डॉक्टरनं ‘अरे बापरे, हिची परिस्थिती तर फारच बिघडली, पाठीचं ऑपरेशन करायला लागेल,’ असं सांगून अंग आणि एका दिवसाच्या ‘उपचारां’चे पाच हजार रुपये काढून घेतले आणि अखेर बाळ एका मोठय़ा हॉस्पिटलच्या एनआयसीयूमध्ये दाखल झालं. 

तोवर बाळाचं इन्फेक्शन सगळ्या शरीरात पसरलं होतं. विशिष्ट वयापर्यंत बाळांना कोणतंही इन्फेक्शन झालं तर ते सगळ्या शरीरात पसरतं, ही माहिती आई-बाबांना त्या हॉस्पिटलात मिळाली. ते मेंदूत गेलं नसेल ना, याच्या चाचण्या सुरू झाल्या आणि 48 तास बाळ क्रिटिकल आहे असं समजा, असं सांगितलं गेलं. 

आज त्या मुलीच्या पाठीवर त्या भयंकर कालखंडाची खुण आहे. ऑपरेशनच्या छोट्या कटच्या व्रणाच्या स्वरूपात.

प्रसंग दुसरा

हीच चळवळी बालिका एक दिवस पलंगावरून खाली फरशीवर पडली. खरं तर यात विशेष काहीच नाही. कारण या बालिकेला कुणी त्या वयात छंद विचारला असता, तर तिनं पलंगावरून खाली आपट्या खाणं, अशी नोंद केली असती. 
एरव्ही धप्पकन आवाज यायचा, टेंगूळ यायचं, ती थोडावेळ रडायची; पण मडकं  एकदम पक्कं असल्यामुळे त्यापलीकडे काही व्हायचं नाही. यावेळी मात्न तिचा डोळा भप्प सुजला आणि त्याखाली काळा चट्टा उमटला. 
आई-वडील घाबरले. ताबडतोब बालरोगतज्ज्ञाकडे घेऊन गेले.

त्यांच्याकडे नंबर येण्याच्या आधी बसल्या बसल्याच सूज ओसरत होती. पण, रिस्क कोण घेणार? डॉक्टरनं तपासून तिला काहीच विशेष झालेलं नाही, हे सांगितलं. मुलं लहानपणी अशी पडतातच. ती पडल्यानंतर त्यांना चक्कर आली, फ्रॅक्चर झालं किंवा उलट्या होत असल्या तर ताबडतोब डॉक्टर गाठायचा, अन्यथा नाही, असं ज्ञान त्यानं दिलं आणि एक औषध लिहून दिलं.

हा प्रसंग आई-वडिलांच्या खास लक्षात राहणारा होता. कारण, डॉक्टरकडे रिक्षानं जाण्या-येण्याचे झाले होते साठ रुपये, डॉक्टरनं फी घेतली होती पाचशे रुपये आणि औषध होतं चौदा रुपयांचं. तेही गरज भासल्यास द्यायचं होतं. ती गरज भासलीच नाही. प्रश्न निव्वळ पैशांचा नाही. 

प्रश्न लहान मुलांना वाढवताना, खासकरून घरात कोणी मोठं माणूस नसताना वाढवताना होणार्‍या पंचाईतीचा आहे. 
आपल्याला आपल्या बाळाविषयी, त्याच्या आरोग्याविषयी शून्य माहिती असते आणि अर्थातच अमाप, अगदी आपला जीव ओवाळून टाकण्याइतकं प्रेम असतं. अज्ञान आणि प्रेम हे कुणाकडूनही लुटलं जाण्यासाठी फारच डेडली कॉम्बिनेशन आहे. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी लोक टपलेले असतातच.

पण, बाळाचे आईबाप म्हणून आपण इतकं अज्ञानी असलं पाहिजे, असा काही नियम नाहीये.
अगदी लहान बाळाला नेहमीपेक्षा जास्तवेळा अगदी एकदोन वेळा शी झाली तरी आई-वडील टेन्शनमध्ये येतात आणि लगेच डॉक्टर गाठतात. बरं डॉक्टर म्हणजे साधा डॉक्टर नव्हे, तर स्पेशालिस्टच. 

बरं ते डॉक्टरही बहुतेकवेळा अगदी चांगल्या मनानं आई-वडिलांना सांगतात की बाळ सुरुवातीच्या टप्प्यात फक्त दूध पितं आणि शी करतं, तेव्हा त्यात काही बिचकण्यासारखं नाही, होऊ दे डायपरवर खर्च, असं सांगूनही आई-वडील उठून डॉक्टरकडे धावतातच. 

तीच गत तापाची. ताप आलाय म्हणजे आत फायटिंग सुरू आहे, हे आई-वडिलांनाही माहिती असतं. ताप ठरावीक आकड्याच्या पलीकडे गेला तरच तो गंभीर असतो, हेही डॉक्टर सांगतात. काही बेसिक औषधं देतात. चांगले डॉक्टर मुलांच्या आई-वडिलांना मुलांच्या आजारांचा अनावश्यक बाऊ न करायला शिकवतात. ताप, सर्दी, खोकला, किरकोळ जखमा, टेंगळं हे सगळं होतच असतं, तो मुलांच्या वाढीचा भाग आहे. त्यामुळे घरात एक प्रथमोपचारपेटी ठेवा. तापमापक ठेवा. अमुक बेसिक औषधं घरी ठेवा, अमुक झालं तर तमुक द्या, तमुक झालं तर अमुक द्या. त्यातूनही नाही बरं वाटलं तर इथे आणा, असं डॉक्टर सांगतात. काही घरगुती उपायही डॉक्टर सांगतात. 

पण, आपल्याकडे हटकून एक प्रकार दिसतो. डॉक्टर ज्या गोष्टींना, त्या मुलांसाठी घातक किंवा काहीच उपयोग नसलेल्या आहेत म्हणून करू नका असं सांगतात, त्या सगळ्या गोष्टी हटकून केल्या जातात. 
अनावश्यक किंवा चुकीचे घरगुती उपाय करत राहून मुलाची तब्येत आणखी बिघडवली जाते आणि जिथे साधं हिंगाचं पाणी, जि-याचं पाणी, ओवा वगैरे घरातल्या नेहमीच्या वस्तूंनी बरा होण्यासारखा आजार असतो, तिथे मुलाला डॉक्टरकडे नेलं जातं.

लहान मुलांच्या शरीराच्या दुरुस्तीचा वेग प्रचंड असतो. मोठेपणी ज्या आजारांमधून बरं होणं अशक्यप्राय वाटतं, त्या आजारांमधून मुलं सहीसलामत बाहेर पडतात, हे आई-वडिलांनी लक्षात घ्यायचं असतं.
शिवाय इम्युनिटी किंवा प्रतिकारक्षमता विकसित होण्याचाही भाग असतो. 

मुलं काही आयुष्यभर इन्क्युबेटरसारख्या निर्जंतुक घरांमध्ये राहणार नसतात. त्यांना बाहेर पडायचं असतं, खेळायचं असतं, पडायचं-धडपडायचं असतं, गाडीवरचं खायचं असतं, कुठलं कुठलं पाणी प्यायचं असतं. 
त्या सगळ्या प्रवासात छोटे छोटे आजार होणार असतातच.  

त्यामुळे चांगल्या डॉक्टरला गाठून बाळाच्या आरोग्याबद्दल सजग होणं हा बाळाच्या संगोपनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तो शिकून घ्यायलाच हवा.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि ‘कुटुंबवत्सल’ गृहस्थ असून, दोन मुलींचा बाबा आहे.)

sakhi@lokmat.com


Web Title: Why parents getting panic when thier kids suffer from small health problem?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.