- अजित जोशी

स्त्रीनं हिशेब आपल्या ताब्यात ठेवणं फारच महत्त्वाचं आहे. कारण त्यातून तिला घराच्या सगळ्या कारभाराचं आकलन येतं. नवराच काय पण मोठी झाल्यावर मुलंही हिशेब सांभाळणाऱ्या स्त्रीची सहजासहजी उपेक्षा करू शकत नाहीत. तिच्या मताला किंमत येते. घरच्या पुरुषाला आदर वाटतो. मुलगी शिकली की जशी प्रगती होते, तशीच बाईनं पैशाच्या गोष्टी शिकल्या की संसाराची गाडी जोरात पळू लागते.

रमा दुपारी ३ ला इमारतीत शिरली ती थोड्या साशंकतेनंच. आॅफिसमधल्या नीतानं ‘अगं तू जाऊन तर बघ, हा बाबा जरा वेगळाच आहे’, असा फारच आग्रह केलेला होता म्हणून, नाहीतर तशी तिला काही फार मोठी समस्या नव्हती. गेले काही महिने पैसे फारच कमी पडत होते. मंथएण्डला तर फारच तंगी व्हायची. तशात घरात दुरुस्ती काम निघालं तर पर्सनल लोन घ्यावं लागलं बँकेतून. पैसाच टिकत नव्हता तिच्याकडचा. तेव्हा नीतानं चक्क एका स्वामीजीकडे जायला सांगितलं. 


तसा स्वामीजींचा हा आश्रम अगदी वेगळा होता. म्हणजे एखादं आलिशान मंदिर किंवा काही एकरांवर पसरलेल्या कुट्या याऐवजी इथे एका मोठ्ठ्या फिक्कट गुलाबी इमारतीत चकचकीत आॅफिस होतं. आत मऊ उबदार खुर्च्या आणि एक स्वच्छ टेबल असलेलं स्वामीजींचं केबिन होतं. यांना नक्की काय सांगावं या विचारात रमा होती, तेवढ्यात स्वामीजी आले, तेही चक्क सुटाबुटात!


‘असं आहे स्वामीजी (त्यांना स्वामी म्हणतानाही रमा थोडी अडखळलीच), माझी नोकरी आहे एका कंपनीत मार्केटिंगची आणि ओमकारपण चांगल्या पोस्टवर आहे आयटीत. पण घरात पैसा म्हणून टिकत नाही. तशात आम्ही आता चान्स घेणार आहोत. मग तर मुलाच्या डॉक्टरपासून त्याचं शिक्षण, क्लासेस, खेळण्यापर्यंत भरपूर खर्च वाढतील. तेव्हा कसं मॅनेज करावं ही चिंताच आहे!’ 
‘हं... असं आहे, की तुम्ही लक्ष्मीमातेची मन:पूर्वक पूजा करायला हवी, तर सगळे प्रश्न सुटतील’ - स्वामीजी मिस्कीलपणे म्हणाले. ‘आं, म्हणजे काय आता तुम्ही एखादी पूजा करायला की अंगारा लावायला सांगणारे?’ - रमानंही थोडं वैतागूनच विचारलं. 

‘छे, अहो लक्ष्मीमाता काय कोणत्या राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत का की त्यांच्या नावाची होर्डिंग लावावी तशी पूजा घातली की खूश होईल. आणि अंगारा लावून संपत्ती मिळत असेल तर सरकार नोटा छापायच्या ऐवजी, जाळायलाच नाही का सुरू करणार?’‘म्हणजे?’ - रमाला जरा कुतहूल वाटलं. ‘म्हणजे असं की, लक्ष्मीमातेला प्रसन्न करायचं तर तिचं मन जाणा, तिचा विचार करा, तिला सांभाळा, तिला वाढवायचा हुशारीनं प्रयत्न करा!’


‘ते सगळं ठीक आहे, पण तिचं मन जाणायचं म्हणजे काय?’ - रमानं थोड्याशा उपरोधानंच विचारलं.
‘लक्ष्मीमातेला जाणायचं तर त्याचे दोन मंत्र देतो. एक ‘धनाचा हिशेब हीच पूजा’. आणि दुसरा मंत्र म्हणजे, ‘माझं घर, माझे पैसे’. 
‘आता हे मंत्र मी काय १०८ वेळेला जपू का?’ - रमा पुरती वैतागली होती. 
‘१०८ वेळा नाही काही. पहिला मंत्र रोज रात्री एकदा म्हणा. पण तो नुसता म्हणायचं नाही, बरोबर अजून एक काम करायचं. रात्री हा मंत्र म्हटल्यानंतर दिवसभराचा हिशेब लिहायचा. हिशेब म्हणजे आज दिवसभरात काय काय खर्च केला, ते लिहून ठेवायचं. प्रत्येक खर्चाचे तपशील लिहायचे. प्रवास केला असेल तर कुठून कुठे? कपडे घेतले असतील तर कोणत्या ब्रँडचे अन् कितीचे, जेवायला बाहेर गेला असाल तर मुख्य पदार्थसुद्धा लिहायचे त्याच्या रेटसह.’


‘आणि दुसरा मंत्र?’ - आता मात्र रमाला जरा ‘इसमे कुछ दम है’ असं वाटायला लागलं होतं.
‘हां दुसरा मंत्र आठवड्यातून एकदा म्हणा. दर रविवारी, तुमच्या नवऱ्याला सोबत बसवून. पण या मंत्रासोबतही एक साधना आहे. हा मंत्र म्हटला की त्याच्यासोबत यादी करा की आपल्याकडे काय मालमत्ता आहे, गुंतवणूक कुठे आहे, कोणत्या बँकांमध्ये खाती आहेत, शेअर्स, म्युच्युअल फंड यात काही गुंतवणूक आहे का, विमा काढलाय का, कर्जं कोणती चालू आहेत, आपल्या घराचं काय मूल्य आहे आणि अशा अनेक गोष्टी. दर आठवड्याला करायला घेतलंत की आपोआप लक्षात येईल काय काय लिहायचं ते...! आताच्या घडीला तुम्हाला किती गोष्टी माहीत आहेत यातल्या?’
‘नाही म्हणजे ते सगळं इन्व्हेस्टमेंट वगैरेचं नवराच पाहतो’ - रमा थोडी वरमूनच म्हणाली.
‘अहो असं कसं चालेल? एवढ्या शिकल्यासवरलेल्या तुम्ही, पण संसारातल्या लक्ष्मीमातेची काही माहितीच नाही. हे काय बरोबर नाही. शेवटी काय आहे, स्त्रीनं हिशेब आपल्या ताब्यात ठेवणं फारच महत्त्वाचं आहे. कारण त्यातून तिला घराच्या सगळ्या कारभाराचं आकलन येतं. नवराच काय पण मोठी झाल्यावर मुलंही तिची सहजासहजी उपेक्षा करू शकत नाहीत. तिच्या मताला किंमत 
येते. घरच्या पुरुषाला तिचा आदर वाटतो. मुलगी शिकली की जशी प्रगती होते तशीच बाईनं पैशाच्या गोष्टी शिकल्या की संसाराची गाडी जोरात पळू 
लागते.’ रमाला स्वामीजींचा सल्ला खूपच आवडला आणि पटलाही. ‘करून तर पाहू काय म्हणतात ते’ असा विचार करतच रमानं स्वामीजींचा निरोप घेतला.

(लेखक चार्टड अकाऊन्टंट असून मॅनेजमेंट कॉलेजमध्ये अध्यापक आहेत dhanmandira@gmail.com )