- मुक्ता चैतन्य

आपण काहीही सांगू आणि मुलं ते खरं मानतील हा काळ गेला. आईबाप शेंड्या लावतायत अशी शंका आली तर मुलांच्या हाताशी गूगल आहेच. आपल्या मुलांच्या आयुष्यातला ‘स्क्रीन टाइम’ बराच मोठा आहे. असू शकतो. मुलांच्या आयुष्यातून स्क्रीन काढून टाकता येणं शक्य नाही; मग काय करायचं?
आई जरा फोन दे..’  आॅफिसचं काम संपवून जरा पाय पसरून बसावं तर मुलीकडून फर्मान. ‘कशाला?’ ‘दे गं!!’ मी आपला मुकाट फोन तिला दिला. पाच मिनिटांनी बाईसाहेब समोर हजर. शिस्तीत फोन मला परत केला. मला अर्थातच आश्चर्याचा धक्का. असं कसं शक्य आहे. हातात मिळालेला फोन पाच मिनिटात परत. मी पुन्हा मुकाट फोन घेतला आणि त्यात काहीतरी बघू लागले. बाईसाहेब शेजारीच उभ्या. तिला काहीतरी सांगायचं होतं हे माहीत असूनही मी स्वत:हून काहीच विचारलं नाही. बात फोनची असणार हेही लक्षात आलं होतं. मग तिनेच सुरुवात केली.
‘आई, मी तुला तो खेळ घेऊया म्हटलं होतं...’
 
 
बाजारात रोज नवीन खेळ येत असतात. मुलांना किती घेणार? यावेळी मी तिला सांगितल होतं की तो खेळ आपल्या जवळच्या दुकानांमध्ये आलेला नाही. पुढच्या महिन्यात घेऊ. तर विषय त्या खेळापाशी आला. ‘तो नाहीये आपल्या जवळच्या दुकानात.. आपलं बोलणं झालंय...’ खेळ खरेदीचा विषय टाळण्यासाठी मी आपली जुनीच री ओढली. तशी तिच्या डोळ्यात एकाएकी चमक आली. मला कळेना हा काय प्रकार आहे? ‘आई मी गूगल केलं होतं. आपल्या जवळच ते दुकान नाहीये का, तिथे गेम आहे. तुला दाखवू का? त्यांनी गेमचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. दुकान सकाळी दहा ते रात्री आठ उघडं असतं. म्हणजे आता असेल, चल ना...जाऊया !!’ मी काहीही न बोलता फक्त तिच्याकडे बघत बसले. माझी पावणेदहा वर्षांची मुलगी, गूगल करून कुठल्या दुकानात तिला हवा असलेला खेळ उपलब्ध आहे हे शोधून मला सांगत होती. मी पावणेदहा वर्षांची होते तेव्हा काय करत होते बरं! एक बावळट प्रश्न मनाला शिवून गेला. ‘आई चल ना !’ - माझी तंद्री तोडत ती पुन्हा म्हणाली. ‘वा, तू शोधून काढलंस!! उत्तम. पण आता जायला नको. खेळ घ्यायला आपण पुढच्याच महिन्यात जायचंय. हवं तर बुक करून ठेवू, पण घ्यायचा पुढच्याच महिन्यात.’ पालक असल्याचा हुकुमाचा एक्का बाहेर काढून मी तिला सांगितलं. बुक करून ठेवू ही कल्पना आवडल्यामुळे फारशी वादावादी न होता विषय संपला. 
पण माझ्या डोक्यात मात्र चालू राहिला. मुलं जन्माला आली की लगेच त्यांच्या आयुष्यात वेगवेगळे स्क्रीन येतात. हल्ली तर पहिला स्क्रीन जन्माच्या काही क्षणांनंतर लगेच येतो. तो असतो मोबाइलचा. 
 
 
नवजात बाळाचे फोटो काढून किंवा त्याच्याबरोबर सेल्फी काढून ते सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्याचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे डोळे उघडून आजूबाजूचं जग बघण्याआधी त्यांना कॅमेऱ्यात बघावं लागतं. तिथून घरी पोचत नाहीत तर टीव्हीचा स्क्र ीन समोर येतो. त्यापाठोपाठ जसजशी ती वाढत जातात, स्क्रीनशी असणारं त्यांचं नातंही विकसित व्हायला लागतं. हल्लीच्या मुलांना मोबाइल कसा वापरायचा हे शिकवावं लागत नाही. हा गुण घेऊनच ते जन्माला येतात बहुधा. त्यामुळे जरा बसायला लागत नाहीत तो त्यांच्या हातात येणारे मोबाइल ते अत्यंत सहज रीतीनं वापरायला लागतात. ९-१० ते १३ या प्रीटीन वयातल्या मुलांची स्क्रीनशी प्रचंड दोस्ती आहे. या वयोगटातील मुलांच्या आयुष्यात मोबाइल, टॅब, टीव्ही, लॅपटॉप, डेस्कटॉप, कॅमेरा, सिनेमाचा मोठा पडदा असे अगणित स्क्रीन्स येतात. या सगळ्या स्क्रीन्सच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत प्रचंड माहिती पोचत असते. ही माहिती पालक म्हणून आपण फिल्टर करू शकतो असा आपला भ्रम आहे. कारण येणाऱ्या माहितीमधलं मुलं काय उचलतील आणि त्यातून त्यांना कशाचे प्रश्न निर्माण होतील याचा काहीच अंदाज आपण बांधू शकत नाही. त्यामुळे स्क्रीन दोस्ती आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे, मुलांच्या व्यक्त होण्याच्या पद्धतींकडे लक्ष ठेवणं इतकंच काय ते आपल्या हातात आज उरलं आहे. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याची तयारी करावी लागणार आहे. कारण एक प्रश्न विचारून झाला की विषय संपला अशी भानगड हल्ली नसते. एकातून हजारो प्रश्न निर्माण होतात आणि त्या सगळ्यांची उत्तरं द्यावी लागतात. या दोस्तीमुळे त्यांना शेंड्या लावता येत नाहीत. आपण काहीही सांगू आणि मुलं ते खरं मानतील हा काळ गेला. आईबाप शेंड्या लावतायेत अशी त्यांना शंका आली तर त्यांच्या हाताशी गूगल आहेच. 
आपल्या मुलांच्या आयुष्यातला ‘स्क्रीन टाइम’ बराच मोठा आहे. असू शकतो. पालक म्हणून या ‘स्क्रीन टाइम’चा विचार आपण करणं अत्यावश्यक आहे. हा ‘स्क्रीन टाइम’ कशासाठी, किती विभागाला गेला आहे याकडेही लक्ष पुरवायला हवं. ९-१० ते १३ या वयोगटातल्या मुलांच्या आयुष्यातून स्क्रीन काढून टाकता येणार नाही. तो काढून टाकूही नये. 
 
 
पालकांची कितीही इच्छा असली तरी तो जाणार नाही. त्यानं जाण्याची गरजही नाही. पण त्या ‘स्क्रीन टाइम’वर लक्ष ठेवणं मात्र नितांत गरजेचं आहे. प्रीटीन मुलांच्या आयुष्यात निर्माण झालेल्या या ‘स्क्रीन टाइम’मुळे या मुलाचं विश्व, त्यांचे एक्स्प्रेशन बदललं आहे का, या ‘स्क्रीन टाइम’चे फायदे-तोटे कोणते, ते कसे हाताळायचे या सगळ्याची चर्चा आपण या नव्या सदरातून करणार आहोत. 
उद्या तुमच्या घरातल्या मुलांनी ‘आय नीड माय ‘स्क्रीन टाइम’ असलं काही म्हटलं तर भांबावून जाऊ नका! त्यापेक्षा या नव्या बदलाला सामोरं जाण्यासाठी तयार व्हा. 
गेट रेडी!

(लेखिका मुक्त पत्रकार आणि समाजमाध्यमांच्या अभ्यासक आहेत. muktaachaitanya@gmail.com)