- यशोदा वाकणकर


शिक्षित आणि अशिक्षित हे दोन शब्द आपण वेगवेगळ्या तऱ्हेनं वापरत असतो. पहिला सरळ अर्थ म्हणजे शिकलेला तो सुशिक्षित आणि न शिकलेला तो अशिक्षित. अनेकदा आपण ‘सुसंस्कृत’ या अर्थानं सुशिक्षित हा शब्द वापरतो आणि ‘असंस्कृत’ या अर्थानं अशिक्षित वापरतो. ‘आपल्यासारख्या सुशिक्षितांमध्ये...’ किंवा ‘एवढा अशिक्षितपणा करू नकोस...’ किंवा ‘डिग्री झाली तरी किती अशिक्षित आहेस रे तू...’ वगैरे. 
या दोन्ही शब्दांच्या विविध छटा आणि वृत्तीसुद्धा आपल्याला इतरत्र दिसत असतात. शिक्षणाचा जरा जास्तच अहंकार असलेली सुशिक्षित माणसं दिसतात, तशीच पूर्ण अशिक्षित असूनही एक खूप सुंदर उपजतच शहाणपण असलेली माणसंही दिसतात! अशी माणसं ही अनुभवांनी अधिक समंजस झालेली दिसतात. 
आपण मध्यमवर्गीय, सुस्थितीतली माणसं, भरपूर शिकलेले असतो. आणि मनात एकीकडे आपल्याला त्याचा अभिमानसुद्धा असतो. कुठेतरी आपल्याला न समजणारी अहंकाराची छटासुद्धा असते. आपल्यातल्या काही स्त्रिया या शिक्षणाचा चांगला वापर करून नोकऱ्या करतात, तर काहीजणी नाही करत. ज्याला आपण आजकालच्या मराठीत ‘हाउस वाइफ’ म्हणतो. 
हे मनात यायचं कारण म्हणजे आजकाल आपल्याला अजिबातच न शिकलेली माणसं तशी कमी दिसतात. माणसं थोडीतरी शिकलेली असतात. दहावी झालेल्या कामवाल्या बायका असतात. चौथीपर्यंत शिकलेले भाजीवाले असतात. आठवीपर्यंत शिकलेले रिक्षावाले असतात. पण अगदी पूर्ण अंगठा छाप माणसं आजच्या जमान्यात शहरांमध्ये तितकी सहज मिळत नाहीत. 
नवीन घरी राहायला यायच्या आधी आम्ही तीन महिन्यांपुरते एका घरात राहत होतो. तेव्हा मिळालेली तात्पुरती कामवाली बाई होती राधा. लग्न झालेली, तिशीची, आणि सात-आठ वर्षांची दोन मुलं असलेली राधा. नवरा वॉचमन. त्यावर्षी मराठवाड्यात दुष्काळ होता, म्हणून शेतमजुरी सोडून पुण्याला कामासाठी आलेलं कुटुंब. राधाला मी म्हणाले, ‘एखाद्या दिवशी मला लवकर जावं लागलं, तर तुझ्यासाठी चिठ्ठी ठेवून जात जाईन. काय कामं करायची ते लिहून ठेवीन.’ राधा हसली आणि म्हणाली, ‘ताई, मला लिहिता वाचता येत नाही.’ मी चकित झाले. कारण माझी याआधीची बाई दहावी झालेली होती आणि ती काम झालं की थोडावेळ पेपर वाचत चहा घेत बसायचीसुद्धा. राधाला एक अक्षरही वाचता येत नव्हतं. राधाचं काम सुरू झालं. ती अतिशय समंजस, कामसू आणि हसरी होती. पण तिला अजिबातच लिहिता-वाचता येत नाही, हा भुंगा काही माझ्या मनातून जाईना! मनात यायचं, आपण सकाळी पेपर वाचतो, बाहेर पाट्या वाचतो, स्टेशनवरचे बोर्ड वाचतो, बसवरचे नंबर्स वाचतो आणि नोकऱ्याही करतो. पण आपण हे सगळं गृहीत धरत असतो. राधासारखी बाई काय करणार?
मग मी तिला एक वही-पेन्सिल भेट दिली. रोज काम झाल्यावर दहा मिनिटं मी तिला शिकवू लागले. तिला आधी मी तिचं नाव लिहायला शिकवलं. ते गिरवायला लावलं आणि घरी सराव करायला सांगितला. दुसऱ्या दिवशी तिनं मला ‘राधा’ हे नाव लिहून दाखवलं. स्वत:चं नाव लिहिता आल्याचा आनंद राधाच्या चेहऱ्यावर मावत नव्हता. असं करत करत मी तिला घरच्या सर्वांची नावं लिहायला शिकवली. आम्ही जागा बदलायची वेळ आली, तेव्हा मी राधाच्या मुलांना बोलावून घेऊन सांगितलं, की तुमच्या आईला पुढे शिकवा! मुलं आधी लाजून हसली, पण मग तयार झाली. 
नवीन घरी आल्यावर चित्रच पालटलं! आमच्याकडे काम करू लागलेली पंचविशीची मुलगी ‘बीए इन हिस्टरी’ झालेली! या पदवीवर कुठे नोकरी मिळत नाही आणि नवऱ्यानं सोडून दिलं म्हणून घरकाम करणारी. या मुलीचा चेहरा सतत दुर्मुखलेला. ‘हे काय माझ्या नशिबी आलंय’, या पद्धतीचा. तिला कामाविषयी काही सांगितलं तर चेहरा अजूनच वाईट व्हायचा. आणि शेवटी ती काम तिच्याच पद्धतीनं करायची. 
मी एपिलेप्सी म्हणजेच फीट येणाऱ्या माणसांसाठी स्वमदत गटात आणि हॉस्पिटलमधे काम करते. एकदा एक एपिलेप्सीचा त्रास असलेली तिशीची बाई अ‍ॅडमिट होती. तिच्याशी बोलायला गेले असताना मी तिची माहिती विचारत होते. माहितीतून कळलं की तिचं लग्न झालंय, आणि तिला दोन मुलं आहेत. मी विचारलं, ‘काय वयाची मुलं आहेत?’ तर मी म्हणाली, ‘मुलांची वयं माहीत नाही मॅडम. मला लिहिता-वाचता येत नाही आणि आकडे पण येत नाहीत. त्यामुळे मला माहीत नाही. पण घरची माणसं मुलांची वयं दहा-बारा असं काहीतरी सांगतात.’ तिच्या समुपदेशनाच्या शेवटी मी तिच्या लिहिण्या-वाचण्याचा विषय काढला. तिला म्हटलं, ‘चल, तुला तुझं नाव लिहायला शिकवते. ते गिरवून सराव कर छान.’ तर ती पटकन म्हणाली, ‘मला नाही शिकायचं लिहाय-वाचायाला!’
आजूबाजूला ही जी सुशिक्षित-अशिक्षितांची गजबज सुरू असते, त्यावरून मनात विचार येतो, की हे शब्द माणसाने निर्माण तरी कशाला केले आहेत? आणि त्याविषयीचे समाजाच्या मनातले ठोकताळे तरी कसे निर्माण झाले? उत्साहानं शिकणारी राधा असते, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असतो. पण त्याच वेळी शिक्षणाला नाही म्हणणाऱ्या व्यक्ती पण असतात, ज्यांच्यामुळे आपल्याला यातना होतात, पण त्यांना होत नाहीत. जास्त शिक्षण झालेल्या पण नोकरी न मिळणाऱ्या व्यक्ती असतात आणि त्याच वेळी इंग्लिश-विंग्लिश सिनेमासारख्या चाळिशीत उत्साहानं शिकणाऱ्या मध्यमवर्गीय बायकासुद्धा असतात. सकारात्मक आणि नकारात्मक दोन्हीही ऊर्जा तितक्याच जोशात असतात. 
सभोवतालची ही गजबज अनुभवत असताना मनात सुरू होते भूप रागाचे आलाप. म्हटलं तर घनगंभीर, म्हटलं तर आनंदी. आपण त्याकडे जसे पाहू तसे दिसणारे.

(भटकंती, गायन, लेखन आणि वाचनाची आवड असलेल्या लेखिका पुण्यात ‘एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप’ चालवतात )

yashoda.wakankar@gmail.com