When will women be seen an opportunity of fruitful life in stage of an emptiness ? | पोकळीत रसरसून जगण्याची संधी असते ती स्त्रियांना कधी दिसणार?
पोकळीत रसरसून जगण्याची संधी असते ती स्त्रियांना कधी दिसणार?

डॉ. मृदुला बेळे

मुग्धा एक पन्नाशी उलटून गेलेली गृहिणी. एका साधारण आकाराच्या शहरात राहाणारी. तिचा एकुलता एक मुलगा, आलोक. नुकताच बी.ई. झाला. त्याला एक उत्तम नोकरी मिळाली. पण नोकरी होती कॅनडामध्ये. गेल्याच महिन्यात तो कॅनडाला निघून गेला. आलोकला उत्तम नोकरी मिळाल्याचा आनंद, त्याच्यासाठी जे जे शक्य होतं ते सगळं आपण केलं याची कृतार्थता, सगळं जरासं ओसरलं आणि मुग्धाची उलाघाल सुरू झाली.

आता करायचं काय? गेली कित्येक वर्षं तिचं आयुष्य आलोकच्या भोवती फिरत होतं. आलोकची शाळा-कॉलेज, त्याचा डबा, त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा, त्याचा अभ्यास, त्याचे कपडेलत्ते, त्याला काय काय आवडतं ते आठवून रोज तसा स्वयंपाक. हे सगळं म्हणजेच मुग्धाचं आयुष्य होतं. आलोक मोठय़ा कष्टानं, नवसा-सायासानं आणि अथक वैद्यकीय प्रयत्नांनी झाला होता तिला. त्यामुळे तो झाल्या झाल्या मुग्धानं आपली नोकरी सोडली. खरं तर उत्तम करिअर होतं तिचं. पण घरी बाळ सांभाळायला कुणी नव्हतं. त्यामुळे काहीही विचार न करता तिनं तेव्हा नोकरी सोडून दिली. नवरा पदोन्नतीच्या पायर्‍या भरभर चढत गेला. त्यामुळे आलोक मोठा झाल्यावर शक्य होतं तरी मुग्धानं काही परत नोकरी करण्याचा विचार केलाच नाही. ती घरात आणि आलोकमध्ये पूर्णपणे गुरफटून गेली. आणि ज्या आलोकला तिनं गेली बावीस वर्षं आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनवलं होतं तो अचानक एक दिवस असा लांब निघून गेला. आता सकाळपासून मुग्धासमोर आ वासून उभा असायचा तो रिकामा दिवस, खायला येणारी शांतता आणि एक भयाण पोकळी.
 

ही पोकळी आता मुग्धाला खायला उठू लागली. ‘‘ज्याच्यासाठी मी माझं आयुष्य वेचलं तो माझा आलोक असा कसा मला सोडून गेला’’ या शिवाय दुसरा विचारच तिच्या मनाला शिवे ना. तिच्या डोळ्याचं पाणीच खळे ना. नवरा नोकरीत आणि आलोक नव्या देशात जुळवून घेण्यात मग्न होता. मुग्धाला द्यायला फारसा वेळ नव्हता दोघांकडे. ती हळूहळू खचत चालली होती. तिला अन्न गोड लागे ना की झोप येई ना. आलोकचा फोन आला की ती ढसाढसा रडायला लागायची. त्यामुळे तोही हल्ली तिला फोन करायचं टाळू लागला. त्याचं मुग्धाला आणखीनच वाईट वाटू लागलं होतं. ती हळूहळू नैराश्याच्या गर्तेत रुतू लागली.

मुग्धा ज्यातून जात होती तो होता ‘एम्प्टी नेस्ट सिण्ड्रोम’. लेखातलं अल्बर्ट जॉर्जी नावाच्या एका कलाकाराचं हे ‘मेलॅन्कली’ नावाचं शिल्प पाहा. जिनिव्ह शहरात लेक जिनव्हच्या काठावर आहे हे. यात मुलं घरातून निघून गेल्यावर आईबापाना जे रिकामपण जाणवतं ते दाखवायचा त्यानं प्रयत्न केलाय. अत्यंत हताशपणे मान खाली घालून बसलेला एक माणूस आणि त्याच्या छाती आणि पोटाच्या भागात दाखवलेली पोकळी. जणू त्याच्या काळजाचा लचकाच कुणी तोडून नेलाय. मुलं असतातच आपल्या काळजाचा तुकडा. त्यातल्या त्यात मुग्धासारखी  लेकासाठी आयुष्य पणाला लावलेली आई असेल तर खूपच मोठा भाग असतात ते तिच्या आयुष्याचा.

पण मग अशा आईनं करायचं काय?

नंतर त्रास होईल म्हणून आधीपासूनच मुलात फार जीव गुंतवायचा नाही? असं एखादी आई करू शकते का? 

- अर्थातच नाही ! पण तिचं चुकतं हे की आपलं मूल हा आपल्या आयुष्याचा एक  महत्त्वाचा भाग आहे इथवर ती थांबत नाही तर त्या मुलालाच ती आपलं आयुष्य बनवते. आणि इथंच तिच्या भावविश्वाची गाडी घसरायला लागते. गल्लत होते ती इथंच !
मूल जन्माला येतं आणि ती आई पूर्णपणे त्याच्यात दंग होऊन जाते. ते झोपेल तेव्हाच तीही विर्शांती घेते, आपल्या दुधावर त्याचं पोषण नीट व्हावं म्हणून खाण्यापिण्याची काळजी घ्यायला लागते. हळूहळू बाळ वर्षाचं होतं आणि एक दिवस बाळाचे डॉक्टर सांगतात, ‘‘आता हळूहळू अंगावर पाजणं बंद करा. त्रास देईल थोडं बाळ; पण सवय करा. आता त्याला तुमचं दूध पुरत नाहीये, बाकी अजून पोषक अन्न द्यायला हवं’’, हे ऐकून ती आई सैरभैर होते. त्यात बाळाला त्नास होईल ही काळजी असतेच असते. पण माझं आता काय होईल हाही विचार असतो. ‘‘मी माझं दूध पाजून बाळाला वाढवतेय’’ हा विचार तिच्या आईपणाला अत्यंत सुखावणारा असतो. आणि तेच आता बंद करायचं असतं. बाळाचं अंगावर दूध पिणं बंद करण्याला इंग्रजीत एक छान शब्द आहे ‘‘विनिंग’’.  

तर कितीही त्रासदायक असलं तर ते आई आणि बाळ दोघांच्याही हिताचंच असतं. बाळाला इतर पोषण मिळावं म्हणून बाळासाठी  आणि बाळानं आईचा सगळा जीवनरस शोषून घेऊ नये म्हणून आईसाठी. इथून पुढच्या आई म्हणून असलेल्या तिच्या आयुष्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विनिंगला तिला सामोरं जावं लागणार असतं, त्याचीच जणू ही तयारी. मूल आपलं आपण कपडे घालायला लागतं तेव्हा, स्वत:च्या हातानं जेवायला लागतं तेव्हा, एकटं शाळेत जाऊ लागतं तेव्हा. हळूहळू त्याची आईची गरज कमी होत असते. आणि ते होणं गरजेचंच असतं. आणखी थोडं मोठं झाल्यावर शिकायला परगावी जाणं, नोकरीनिमित्त परदेशात जाणं, मुलीनं लग्न करून सासरी जाणं, मुलानं लग्न झाल्यावर वेगळा संसार थाटणं हे सगळं एक प्रकारचं ‘विनिंग’च तर असतं आईसाठी, नाही का? आणि ते मुलांच्याच नाही तर आपल्याही हिताचं आहे हे आईनं समजून घ्यायला हवं. 

सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गोष्टीसाठी स्वत:ला तयार करायला हवं. फारच कमी वेळा अशा घटना अचानकपणे घडतात. इतर वेळेला शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी मुलाला/मुलीला घर सोडून जावं लागणार याचा अंदाज असतोच. आणि बहुतेक वेळेला अशा वेळी मुलं बाहेर पडतात ती कायमची. ती आता पूर्वीसारखी सतत तुमच्याबरोबर राहाणार नसतात. आणि ते होणं त्यांच्या कल्याणासाठी गरजेचंच असतं. अशा वेळी त्या घटनेतून जरा स्वत:ला बाहेर काढून पाहावं आणि फक्त आपल्या लाडक्यांच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करावा. त्याचं/तिचं एक नवं आयुष्य सुरू होतंय या विचारानं त्याच्यासाठी खूश व्हावं ! शिवाय आयुष्यात रोजच्या धबडग्यामुळे करायच्या राहून गेलेल्या अनेक गोष्टी आठवाव्यात. आणि त्या करायचे मनसुबे सुरू करावेत. जोपासायचे राहून गेलेले छंद, करायचे राहून गेलेले उद्योग, राहून गेलेली मजा हे सगळं करायचे बेत आखणं सुरू करावं. शिवाय ‘‘माझ्यासारखं दु:ख कुणाला कसं होईल, मी आई आहे त्याची’’ असं सतत म्हणत स्वत:चं दु:ख कुरवाळणं बंद करावं. मुलाच्या बाबांना, घरात सतत असतील तर आजीआजोबांनाही दु:ख होतंच की. तसंच आपल्याला झालेलं दु:ख आहे, फार काही वेगळं नाही, हे सांगावं सतत स्वत:ला.

म्हणून आपल्या मुग्धानं आता काय करावं माहितीये? आलोक गेलाय त्याकडे सरळ एक नवी संधी म्हणून पाहावं. राहून गेलेल्या गोष्टी नव्यानं करण्याची, दुरावलेली नाती परत सांधण्याची, मैत्रिणींबरोबर मजा करण्याची, शक्य असेल तर स्वत:चा कुठला व्यवसाय सुरू करण्याची, इच्छा असेल तर काही सामाजिक कार्य करण्याची आणि आपल्या मुलाच्या बाबांशी परत एकदा ‘‘आपला नवरा’’ म्हणून संवाद साधण्याची, आपली सेकंड इनिंग सुरू करण्याची सुवर्ण संधी साधावी. आपल्या या दुस-या नव्या जन्मात जरा मोकळा श्वास घ्यावा स्वत:साठी, असं केलं तर दु:ख लांब पळून जाईल. आणि हा मोकळ्या हवेतला श्वास फुफ्फुसात भरून घेताना ती परत एकदा तरुण व्हायला लागेल ! परत एकदा जीवनरसानं रसरसेल. दूरदेशातून मुग्धाचा आलोक तिला फोन करेल तेव्हा तिचा हा आनंद त्यालाही समजेल आणि आपल्या आयुष्याची वाटचाल करायला तोही निर्धास्त होईल.

(शिकण्या-शिकवण्यात रमणा-या लेखिका प्राध्यापक आहेत.) 

mrudulabele@gmail.com


Web Title: When will women be seen an opportunity of fruitful life in stage of an emptiness ?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.