- वैद्य विनय वेलणकर

21 व्या शतकामध्ये संपूर्ण जगानं विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये भरपूृर प्रगती केली आहे. मंगळयान मोहीमसुद्धा यशस्वी केली. रिमोट कंट्रोलद्वारे हजारो मैल दूर अंतरावरील उपग्रहाद्वारे अनेक गोष्टी साध्य केल्या. आरोग्य क्षेत्रामध्ये रोबोटेक शस्त्रक्रिया सुरू झाल्या. तंत्रज्ञानाद्वारे विविध अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सोप्या झाल्या. किडनी, यकृत, हृदय इ. महत्त्वाचे अवयव प्रत्यारोपण सहजसाध्य झाले. परंतु एकंदरीत आरोग्यसेवेची किंमत दिवसेंदिवस वाढत असून, सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर होत चालली आहे. कालांतराने माणूस मरण स्वीकारेल परंतु डॉक्टरची पायरी चढणार नाही अशी बिकट स्थिती येऊ घातली आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे. 


हे वैद्यकीय आक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणात झालं आहे की आपल्याला आपले पारंपरिक उपचार, घरगुती औषधं, आजीबाईचा बटवा या सर्वांचा आता विसर पडत चालला आहे. मुळात घरात आजी नाही आणि जेथे आजी आहे तिला पारंपरिक औषधांचं ज्ञान उपलब्ध नाही. त्यामुळे किरकोळ औषधांसाठीसुद्धा सामान्य माणूस डॉक्टरकडे धावतो आहे आणि चार आण्याच्या वस्तूसाठी चारशे रुपये खर्च करतो आहे. 


सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या अनेक विकारांवर घरामध्ये उपलब्ध होऊ शकणाऱ्या पदार्थांद्वारे योग्य उपचार करता येतात आणि ते प्रभावी ठरतात. अनेक वेळा हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करूनही उपयोग होऊ शकत नाही, विकारांना आराम मिळत नाही तेथे पारंपरिक घरगुती उपचारांनी चांगला लाभ होतो. अशा ज्ञानाचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न या लेखमालेतून आपण करणार आहोत. 

अतिसार
आयुष्यात कधीही जुलाब झाले नाहीत किंवा पोट बिघडले नाही अशी व्यक्ती शोधूनही मिळणार नाही. प्रत्येकाला केव्हातरी अशा प्रकारचा त्रास झालेला असतो. विशेषत: घरात लहान मुलं असली की हा अनुभव अनेकवेळा येतो. प्राय: लहान मुलं वा मोठी व्यक्ती कोणासही दिवसातून एक ते दोन वेळा मलप्रवृत्ती होते. ती बांधून होते. यापेक्षा जास्त वेळा आणि पातळ संडासला होेणे याला अतिसार असे म्हणतात. आयुर्वेदात त्याची व्याख्याच गुदेन् बहुद्रव सरणं अतिसारं अर्थात गुदमार्गाद्वारे वारंवार आणि पातळ मलप्रवृत्ती होते, त्यास अतिसार म्हणतात. 

अतिसार का होतो? 
वेगवेगळ्या कारणांनी हा विकार होतो. यामध्ये बाह्य जंतुसंसर्ग असतो आणि बऱ्याच वेळा शारीरिक घडामोडींमुळेसुद्धा जुलाब होतात. उदा. उन्हाळ्यात थंड पदार्थ, शीतपेयं सेवन केले जातात, प्रवासात बाहेरील पदार्थ खाण्यात येतात. लग्न समारंभात विविध पदार्थ, पाण्यानं, दुग्धजन्य पदार्थ, पचण्यास जड पदार्थ इ. अनेक कारणांनी अतिसार वा जुलाब होतात. लहान मुलं प्राय: दुधावर असतात त्यामुळे अनेकांना दूध पचत नाही म्हणून जुलाब होतात. बऱ्याच वेळा अजीर्ण झाल्यामुळे जुलाब होतात. 

सुंठ, जायफळ, डाळींब आणि बेल
१. पाण्यासारखे पातळ जुलाब झाले तर ते थांबविण्यासाठी घरगुती प्रयत्न लगेच सुरू करता येतात. आणि त्या उपायांनी लगेच आरामही पडतो. 
२. घरामध्ये उपलब्ध असणारे जुलाबांवरील प्रभावी औषध म्हणजे सुंठ. लहान मूल असेल तर सुंठ पाण्यात उगाळून ते चाटण दिवसातून दोन-तीन वेळा द्यावं. मूल वयानं थोडं मोठं असल्यास सुंठीचं चूर्ण, तूप आणि साखर यांचं चाटण दिल्यास जुलाब थांबतात. 
३. वारंवार जुलाब किंवा आव होण्याची सवय अनेकांना असते. अशांना सुंठीची कढी करून देण्याची पद्धत आपल्याकडे होती. जुलाबाचं प्रमाण जास्त असल्यास सुंठ आणि जायफळ एकत्र उगाळून दिल्यास त्वरित उपयोग होतो.
४. वारंवार पोट बिघडण्याची सवय असल्यास सकाळी दोन लिटर पाणी उकळून ठेवावं आणि ते उकळताना त्यात चिमूटभर सुंठीचं चूर्ण टाकावं यामुळेही जुलाबाची तक्रार कमी होते.
५. पाण्यासारखे पातळ जुलाब होत असल्यास अत्यंत प्रभावी घरगुती इलाज म्हणजे डाळिंबाची सालं. आपण घरात डाळींब आणून ती खाऊन सालं टाकून देतो. ती सालं टाकून न देता वाळवून ठेवल्यास त्याचा प्रभावी वापर होतो. लहान बालक असेल तर डाळिंबाची साल उगाळून अर्धा चमचा २-३ वेळा दिल्यास तत्काळ जुलाब थांबतात. अनेक अ‍ॅण्टिबायोटिक देऊन न थांबलेले जुलाब केवळ डाळिंबाच्या सालीनं थांबतात असा अनुभव आहे. 
६. व्यक्ती वयानं मोठी असल्यास सुंठ आणि डाळींब साल यांचा काढा करून घ्यावा. जुलाबावर त्वरित आराम पडतो.
७. सहज उपलब्ध होणारे घरगुती औषध म्हणजे बेल. पूजेमध्ये नित्य वापरतात असणाऱ्या बेलाच्या पानांचा रस वा त्यांचं चूर्ण किंवा बेलपानापासून बनवलेला बेलमुरब्बा हीसुद्धा जुलाबावरील प्रभावी औषधी आहेत.

 

(लेखक ख्यातनाम आयुर्वेदाचार्य आहेत. vd.velankar@gmail.com)