What should be done by woman for increasing the sustainability of money? | पैसा टिकावा- वाढावा म्हणून घरच्या लक्ष्मीनं काय करायला हवं?
पैसा टिकावा- वाढावा म्हणून घरच्या लक्ष्मीनं काय करायला हवं?


-पी. व्ही. सुब्रमण्यम

ऐन दिवाळीत, त्यात उद्या लक्ष्मीपूजन. अशावेळी घरच्या लक्ष्मीचं कौतुक करायचं, की तिला दोष द्यायचा? कौतुक करता येईलच; पण मी जरा बायकांना दोषही देणार आहे, कान धरायला हवा असं वाटलं तिथं धरणारही आहे. कारण ते आवश्यक आहे.

होतं काय, अवतीभोवती मी अनेक पुरुष पाहतो जे अनेकदा ऐपतीपेक्षा जास्त पैसे उधळताना दिसतात. पैसा येतो कसा, जातो कसा काही कळतच नाही म्हणतात. मला अनेकदा भेटायला, सल्ले विचारायला पुरुषच येतात. त्यात काहींना ‘व्यसनं’ त्यावर ‘सोशल’ म्हणत लाइफस्टाइल खर्च होतो तो वेगळाच. आणि हे सगळं होत असताना घराची धुरा सांभाळणा-या बाईला काही माहितीच नसतं. ती मेटाकुटीला येते. मोठं संकट येतं तेव्हा हातात पैसे नसतात. लोकांना वाटतं यांना काय कमी आहे, प्रत्यक्षात बॅँकांमध्ये खडखडाट आहे हे घरातल्या कर्त्या बाईलाच माहिती असतं. किंवा मग पैसे असतात; पण ते कुठं गुंतवलेत, आपल्या नेमक्या गरजा काय हे ना बाईला माहिती असतं ना ती कधी नव-याला विचारते. त्यामुळे आता नव्या वर्षांत या जुन्या सवयी मोडा आणि नवर्‍याला काही प्रश्न विचारा, काही गोष्टी अगदी नियमित आणि हट्टानं करायलाच लावा, तरच तुमच्या घरचं बजेट हे उत्तम चालेल आणि लक्ष्मी तुमच्या घरातही नांदेल. सुखानं !

महिलांना काय करता येईल?

 * मुलांच्या शिक्षणासाठी ऐपतीप्रमाणं 2 ते 20 हजार रुपये एसआयपी दर महिन्याला सुरू कराच, असा नव-याला आग्रह करता येईल.

*  खासगी नोक-याचा असुरक्षित काळ आहे. तेव्हा दर महिन्याला एक विशिष्ट रक्कम नियमित तुमच्या रिटायरमेण्टसाठी एसआयपीमध्ये टाकायची सक्ती करता येईल.

 * काहीही झालं तरी नव-याला कुणाच्याही कर्जासाठी गॅरेण्टर राहू द्यायचं नाही.आपले दागिने गहाण टाकायचे नाहीत.
 

* ऋण काढून सण करायचे नाहीत, त्यामुळे उधार-उसनवार करून बडेजावकी करायची नाही.

* मोठय़ा सहलींना जायचं नाही, सहलींसाठी पैसा कुठून आला, नव-यानं कुठून आणला हे माहिती असल्याशिवाय तर जायचंच नाही.
 

* समजा काही संकट आलं तर त्यासाठी आपण काही पैसे राखून ठेवतोय का, हे पहायचं.

*  लोक काही का करेनात, किती का पैसा खर्च करेनात, आपण त्यांनी सरी घातली म्हणून दोरीनं गळफास घ्यायचा नाही.

*  न-याचे मित्र म्हणतात, नातेवाईक सांगतात म्हणून खर्च वाढवून ठेवायचे नाहीत.

*  ऐपत नसताना मोठी घरं, त्यासाठी कर्ज, डोक्यावर कर्जाचे हप्ते हे सारं करायचं नाही, करू द्यायचं नाही.

पैशाला प्रश्न विचारा, उत्तरं मागा.

*  एकदा नव-याशी शांतपणे बोला. त्याला विचारा कुठं काय काय गुंतवलं आहेस, कर्ज कुठकुठले आहेत ते सांग. (लगेच तो खरं सांगेल असं नाही, त्याला ते आवडेलच असंही नाही. पण न रागावता, नीट समजावून सांगा. शांतपणे विचारा, तो सांगेल, नंतर सांगेल; पण सांगेल.) 
 

* त्या सगळ्यांची यादी करा. म्हणजे आमदानी किती, कर्ज किती, गृहकर्ज, कार लोन, पर्सनल लोन, कुणाकडून उधार घेतलेले, घरगुती आवश्यक खर्च किती, क्रेडिट कार्डवर किती पैसा जातात, प्रवास, मुलांचं शिक्षण, आजारपणं, अत्यावश्यक खर्च. या सगळ्यांची यादी करा. त्यातही अत्यावश्यक खर्च नेमके कोणते याची एक उतरत्या क्रमानं यादी करा.
 * आता नव-याला ती यादी दाखवा, म्हणावं ही एवढीच यादी की यात काही सुटलंय. आवश्यक असेल तर सीएकडूनही खातरजमा करून घ्या. विचारा प्रश्न.

*  आता तुम्ही म्हणाल काहीही सांगताय, यानं तर भांडण होईल. नवरा चिडेल. चिडू द्या. तुम्ही शांत रहा. अंधारात संकटं येण्यापेक्षा पैशाची सोंग न आणता तयार राहा. तुमचा हेतू चांगला असेल तर त्याला या गोष्टीचं महत्त्व कळेल.
 नॉमिनी म्हणून आवश्यक त्या कागदपत्रांवर तुमचं नाव आहे का, हे तपासून घ्या.
 

* छानछोकी, अनावश्यक खर्च, मैत्रिणींची बरोबरी म्हणून केले जाणारे खर्च तुमचेही असतील तर तेही नव-याला सांगा, आणि तातडीनं थांबवा.
 

* मुलांना आपल्या घरातले हिशेब दाखवा, त्यांना गृहखर्चाचा अंदाज द्या. आपल्या आर्थिक ऐपतीचा अंदाज द्या. आरसा दाखवा.

*  कर्ज घ्यायचीच वेळ आली तर नातेवाइकांडून घ्या, त्यांना न चुकता आणि नियमित व्याज द्या. असे नातेवाईक जे बॅँकेत पैसे साठवतात. त्यात दोघांचा फायदा आहे त्यांना बॅँकेपेक्षा जास्त व्याज मिळेल आणि पर्सनल लोक 22 टक्केनी फेडण्यापेक्षा तुम्हाला स्वस्त कर्ज मिळेल. पण ते वेळच्या वेळी फेडा, नाहीतर नातेसंबंध बिघडतात.

*   मेडिकल इन्श्युरन्स अत्यावश्यक आहेत तो करून घ्या.

*  पैशासंदर्भात नवर्‍याशी खरं बोला. तोही तुमच्याशी खरं बोलेल असं पहा. त्यातून पैशानं पैसा वाढेल.
 लक्ष्मी आपल्या घरी येतेच; पण तिला आपल्या घरी राहावंसं वाटेल म्हणून आपण काही प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी खर्च कमी, गुंतवणूक जास्त आणि हिशेब चोख असा मंत्र या लक्ष्मीपूजनाला शिकून घ्या.

तुम्हीच लक्ष्मी आहात, तुमच्या घरच्या!

( लेखक आर्थिक सल्लागार आहेत.)

sakhi@lokmat .com


Web Title: What should be done by woman for increasing the sustainability of money?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.