What is the secret in this? | चिमूटभर माया : यातलं नेमकं सिक्रेट काय?

-शुभा प्रभू-साटम

एका सर्वेक्षणानुसार गणित आणि विज्ञान या दोन विषयांबद्दल एकूणच नावड आणि अनिच्छा दिसते. पण हे विषय आयुष्यभर आपली सोबत करतातच. शाळेत नाइलाजाने घोकलेले पाढे किंवा संयुगाची यादी रोजच्या आयुष्यात फार उपयोगी पडते. ५० रुपये किलो मटार असं म्हणताच पाव किलोचे किती? किंवा रद्दीचा भाव ३५ रुपये, १४ किलोचे किती? - पटकन उत्तर देता येतंय का? नाही. पण हे अंकगणित आपल्या आयुष्याचा भाग असतंच. जे गणिताचं तेच विज्ञानाचं.

तेलाचा उत्कलनबिंदू किती? किंवा उदासिनीकरण म्हणजे काय? हे शिकताना पाठ केलेलं नंतर आपण विसरून जातो. पण इडलीचं/डोशाचं पीठ भिजवताना मीठासोबत साखरपण घालावी किंवा उकळत्या दुधाचं दही लावू नये. दूध कोमटच हवं.लोखंडाच्या कढईतच भाज्या कराव्यात अशा अनेक गोष्टी आपण रोज करत असतो. पण त्यामागची शास्त्रीय बैठक किंवा सूत्र आपल्या लक्षातही येत नाही इतकं ते आपल्या अंगवळणी पडलेलं असतं. आपण अनेकदा म्हणतो की, अमुक एक पदार्थ खावा तर आईच्याच हातचा किंवा सासूबार्इंची साबुदाणा खिचडी अतुल्य. वहिनीच्या पुरणपोळ्या खुशखुशीत. तमुक मैत्रिणींचे घावन एकदम जाळीदार. असंख्य पदार्थ करण्यात कोणाची ना कोणाची हातोटी असते. तो पदार्थही असंख्य ठिकाणी केला जातो. पण मग त्याच व्यक्तीचा चांगला का होतो? तर त्या मागे असतं चोख प्रमाण आणि कृती अधिक अनुभव. थोडक्यात विज्ञान. माप भले चिमटीचं घ्या किंवा चमच्याचं, तर्कशुद्ध कृती असली की पदार्थ जमतोच..

असे जमलेले हातखंडा पदार्थ मग वारसाने पुढे चालतात. अनेक टिप्स परस्परांना दिल्या जातात. अनेकदा अपघाताने काहीतरी गोंधळ होतो, पण त्यातून वेगळाच पदार्थ जन्म घेतो अन् तो चक्क लोकप्रिय होतो.
उदाहरण द्यायचं तर पु.लं.चंच प्रसिद्ध चिरोट्याचं. मीठच घालायला विसरल्यानं पुस्तकी गृहिणीचा खाºया बिस्कीटाचा पोत बिघडला आणि त्यावर पिठीसाखर पेरून तिनं नव-याला बनवलं!..आता हा अपघाताने जो चिरोटा तयार झाला तो सध्या भारतीय पक्वान्नात मानाचं स्थान मिळवून आहे हे निर्विवाद...

जिलेबी, पुरणपोळी, थालीपीठ, पाणीपुरी, मोदक हे असले पदार्थ कसे आणि कुणाला सुचले असतील?
थोडक्यात आपलं स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा आहे. चुकत, वावरत वेडीवाकडी पोळी लाटण्यापासून ते फुलक्यांना बारीक कणीक आणि परोठ्यांना जाडसर कणीक हवी हे जेव्हा बरोबर उमगू लागतं तेव्हा ती व्यक्ती पाकशास्त्रज्ञ झाली असं म्हणता येतं.
आपण पाहणार आहोत अशा असंख्य लहान -मोठ्या क्लृप्त्या. गुपितंच. ती साधली, की हमखास आपल्या हाताला चव येणारच!

(खाद्यसंस्कृती आणि पाककला यांचा प्रदीर्घ अभ्यास असणाºया लेखिका मुक्त पत्रकार असून स्त्री मुक्ती चळवळीत कार्यरत आहेत. shubhaprabhusatam@gmail.com)


Web Title: What is the secret in this?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.