What is love? Did we really know this? | प्रेम म्हणजे काय? हे आपल्याला खरंच कळलेलं असतं का?
प्रेम म्हणजे काय? हे आपल्याला खरंच कळलेलं असतं का?

-नयन पाटील

आता व्हॅलेण्टाइन्स डे येईल, अन पुन्हा प्रेमाचे वारे जोरात वाहू लागतील. प्रेम. बघितलं तर साधं, छोटासा शब्द, पण तरीही मनाच्या आभाळाला पुरून उरणारा. रोजच्या आयुष्यात प्रेम असतंच, कुटुंबावर, मैत्न-मैत्रिणींवर, अगदी सगळ्यांवर. पण तरीही प्रेम काय असतं, हा प्रश्न पडतोच. 

प्रेम व्यक्तीवर होतं की आत्म्यावर? 

हल्ली ना गोंधळ उडतोय. सगळीकडे, बी प्रॅक्टिकल म्हणत म्हणत प्रेम प्रॅक्टिकल म्हणून करून बघायला लागलीहेत लोकं. फक्त भेटीगाठी, गिफ्ट्स आणि क्षणिक आनंदासाठी तेवढय़ापुरती तेवढं प्रेम करू लागली आहेत लोकं. अशा प्रेमामध्ये दोघांपैकी कोणाचा तरी कधी कधी दोघांचाही ईगो आडवा येतोच. आणि पूर्वीचं नातं विसरून त्या दोन व्यक्ती त्याच नात्यासाठी नवीन माणूस शोधू लागतात. 

इतकं निष्ठुर आणि व्यवहारी झालंय का प्रेम?

काही यशस्वी जोड्या प्रेमीयुगुलांमधून जोडप्यामध्ये  बदलतात आणि बाकीचे कधी जात आडवी येते, तर कधी स्टेटस यात अडकून वेगळे होतात. तर काहींच्या बाबतीत मैत्नी की प्रेम हाच गुंता सुटता सुटत नाही. 

प्रेम सफल होणं म्हणजे नवरा -बायको होणं असतं का? याआधीच प्रेम ते सफल नसतं का? ते एखाद्या नात्यात रूपांतरित झालं नाही तर निष्फळ ठरतं का? आणि जात वैगेरे गोष्टी बघून केलं जावं इतकं ते संकुचित असतं का? 

‘तू ज्याला नीट ओळखतही नाहीस, त्याच्याशी  लग्न करशील का?’ यासारखी वाक्यं सर्रास आपण ऐकतो. नवरा-बायको म्हणजे शारीरिक संबंध का? शारीरिक संबंध आणि प्रेम यात अजूनही आपण गल्लत करतोच. लग्नसंबंधात मनाची समजूत घालून जोडीदारावर होणारं प्रेम हे प्रेम असतं का? जी व्यक्ती जन्माची सोबती तिच्याशी छोट्या छोट्या गोष्टींनी होणा-या  कडाक्याच्या भांडणात प्रेम नसतं का? पाहिल्या पाहिल्या प्रेमात पडणं म्हणजे काय असतं? अशा प्रेमात शरीराचं आकर्षण असतं की मनाचं? ठरवून केलेल्या लग्नात दोन व्यक्ती एकत्न आल्यानंतर समाजाच्या संमतीनं परिचयाचं ओळखीत रूपांतर होतं, अन कालांतरानं प्रेमात! म्हणजे  ही  व्यक्ती मिळाली म्हणून तिच्यावर केलं अशी ठरवून करायची गोष्ट असते का प्रेम? एखाद्या मुलीनं नाही म्हटलं तर तिच्यावर अँसिड अटॅक करून तिचं आयुष्य खडतर करणारं म्हणजे प्रेम असतं का?

माझ्या मते, प्रेम म्हणजे नष्ट न होणारी आभा असते. ज्या व्यक्तीवर प्रेम असतं तिचे दोष दिसत नाहीत असं नाही, उलट ते जाणवतात. पण ते दोष बघूनही, ते जखमेवरच्या खपलीसारखं अलगद, कुठलीही जिव्हारी न लागू देता बाजूला करणं म्हणजे खरं प्रेम असतं! प्रगतीसाठी बंधनापलीकडचं, मुक्त  असणारं प्रेम असतं! कधीही कुठेही संकट आलं, तर  मी आहेच हे हाक मारण्याआधी सांगून सिद्ध करणार प्रेम असतं! एकमेकांकडे बघता क्षणीच, झटकन फुलणारं हास्य म्हणजे प्रेम असतं! प्रेमात एखाद्यासाठी मरणं खूप सोपं असतं; पण जगाचे फटके, कडवट धडे सोसत राहून सावरत जगणं खूप कठीण असतं. आणि अशा कठीण जगण्यासाठी  जे बळ देतं ते प्रेमच असतं! कधीतरी आभासी सहवासापासून सुरू होणारं, सहवासाची अट नसणारं, सहवासापलीकडलं नातं म्हणजेही प्रेम असतं.

व्हॅलेण्टाइन्स डेच्या पार्श्वभूमीवर प्रेमाचा या सर्वांगानं विचार करून बघितला तर कदाचित प्रेमाच्या व्याप्तीचा आपल्याला अंदाज येऊ शकेल!

sakhi@lokmat.com


Web Title: What is love? Did we really know this?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.