- राजीव तांबे

मुलांना सुटी लागली की 
घरांमध्ये दोन प्रकारचे वारे वाहू लागतात.
पालक वारे आणि मूल वारे.
एका प्रकारच्या वाऱ्याला सतत काळजी..
यांना बिझी कसं ठेवणार?
कुठं अडकवणार?
डोक्याचा ताप कसा कमी करणार?
दुसऱ्या प्रकारच्या वाऱ्यात..
मुलांना सुटी ही पालकांना संधी वाटते,
 मुलांच्या कलानं घेत घेत
ते आनंदी घर सुटी साजरी करतं.
तुमच्या घरात कोणतं वारं वाहतंय? 

सुटीची चाहूल लागू लागली की घरात दोन प्रकारचे वारे वाहू लागतात. एक, अरे बापरे! आता दिवसभर ही घरात असणार. आता यांना बिझी कसं काय ठेवायचं?
दोन- व्वॉव! या सुटीत काहीतरी वेगळीच धमाल करूया.
यातलं ‘पालक वारं’ कुठलं आणि ‘मूल वारं’ कुठलं हे तुम्ही ओळखलंच असेल.
‘सुटीत करायचं काय?’ असा प्रश्न अनेक पालकांना पडतो आणि मग मुलाची इच्छा असो वा नसो त्याला कुठल्यातरी शिबिरात किंवा छंदवर्गात डांबून ठेवलं जातं. ते पालक मुलांवर विश्वास ठेवायला कचरतात तेच पालक असा आततायी निर्णय घेऊ शकतात.
आपलं मूल ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आपल्या मुलाच्या आशा, आकांक्षा किंवा त्याच्या आवडीनिवडी या आपल्यापेक्षा वेगळ्या असू शकतात. म्हणूनच आपण कुठलीही कृती करू तेव्हा त्यातून आपल्या मुलाचा आत्मगौरव आपणच राखला पाहिजे व त्याचा आत्मसन्मान जपला पाहिजे.
सुटी ही एक संधी आहे, मुलांना वेगवेगळ्या माध्यमांची ओळख करून देण्याची, नवनवीन गोष्टी शिकण्यास त्यांना प्रवृत्त करण्याची. पण सक्तीने शिकविण्याची नव्हे.
विनोबांनी म्हटलं आहे, ‘शाळा घरात गेली पाहिजे आणि घर शाळेत आले पाहिजे.’ मुलांच्या शिकण्यासाठी आपण हेच सूत्ररूपात वापरणार आहोत.
मुलांना चाळीस दिवस सुटी आहे असं समजून मुलांसाठी कुठल्या वेगवेगळ्या उपक्रमांची आखणी करणं शक्य आहे ते पाहूया.
पण एक लक्षात ठेवा, यासाठी आपणही मुलांना आपला थोडा वेळ द्यायला हवा आणि तोही न चिडचिडता. हे सगळे उपक्रम मुलांना शिकविण्यासाठी नाहीत तर त्यांना त्यातून काही नवं शिकायला मिळावं म्हणून आहेत. मुलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होऊ देत. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्यांना प्रयत्न करू दे. यासाठी त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेऊ दे.
आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकतो हा विश्वासही त्यांच्या मनात रुजू दे. 
तुमच्या मुलांना नवीन चुका करण्याची संधी तर द्याच, पण चुकांतून शिकण्याची उमेदही त्यांच्या मनात चेतवा. पण कृपया, तुमच्या इच्छेखातर व तुम्ही ठरवलं आहे तेच तुमच्या मुलांना ‘शिकविण्याचा प्रयत्न’ करू नका किंबहुना तसा अट्टाहासही करू नका.
तर मग करायचं काय?
मी ३२ गोष्टी इथं सुचवतो आहे, ४० दिवस सुटी आहे असं मानून. अर्थात यातूनच तुम्हाला आणखी शंभर गोष्टी सुचतील याची मला पूर्ण खात्री आहे. करू न पाहा..
कळावे.
मुलांवर लोभ असावा हीच एक विनंती.

सुटीतल्या ३२ गमती
१) आपण स्वयंपाकघरापासून सुरुवात करूया. स्वयंपाकघरात मिसळण्याचा डबा असतो. यातील प्रत्येक पदार्थाचे नाव मुलांना माहीत असू शकते पण ते कधी व का वापरायचे याची त्यांना ओळख करून द्यायला हवी. उदा. फोडणी करताना मोहरी व जिरे कधी घालायचे? का? भाजी शिजताना तिखट घालायचे? की शिजल्यावर? की त्याआधीच? फोडणीचे प्रकार किती? तडका म्हणजे काय?
२) कोणकोणत्या पदार्थांसाठी फोडणी करताना हळद वापरतात? का? ताकाची कढी करताना फोडणीसाठी हळद वापरून व एकदा न वापरता केली तर चवीत काय फरक पडतो?
३) भाज्यांचे मुख्य चार प्रकार आपण वापरतो. फळभाजी, फुलभाजी, पालेभाजी व कंदमुळे. हे प्रकार मुलांना ओळखता येतात का? त्याचा एखादा तक्ता तयार करता येईल का? त्या तक्त्यात कोणकोणत्या प्रकारची माहिती भरता येईल?
४) वेगवेगळ्या फळांच्या बिया जमवा. त्या साफ करून ठेवा. त्याचं वर्गीकरण करा. पावसाळ्यात सहलीला जाल तेव्हा या बिया डोंगरावर रुजवण्याचा प्रयत्न करा.

५) मुलांसोबत गप्पा मारत भाजी निवडणं, भाजी चिरणं सहज शक्य आहे. गप्पा मारताना हळूहळू मुलांनाही भाजी निवडण्यासाठी/चिरण्यासाठी सहभागी करून घेता येईल. आई/बाबासोबत हा अनुभव घेताना त्यांनाही आनंद होईल.
६) आई/बाबांच्या मदतीने ‘आमच्या रेसिपी’ नावाचे छोटे रेसिपी पॉकेट बुक तयार करावे. त्याचप्रमाणे काका/काकू किंवा मामा/मामी यांच्या मदतीने ‘मामाज् रेसिपी बुक’ किंवा ‘अंकल्स रेसिपी’ अशी पुस्तकांची मालिका पण तयार करता येईल.
७) घरातला फ्रीज स्वच्छ करणं, त्यातील शेल्फची रचना बदलून पाहणे. (अशावेळी घरातल्या मोठ्या माणसांची मदत अपेक्षित आहे. मदत याचा अर्थ सहवास, सहभाग नव्हे.)
८) घरातील कुठल्याही कामाबद्दल घृणा किंवा तिटकारा वाटणं योग्य नाही. श्रममूल्य व श्रमानंद याची जाणीव असणं गरजेचं आहे. एखाद दिवशी आई/बाबांसोबत घरातील भांडी घासण्याचा/कपडे धुण्याचा अनुभवसुद्धा मुलांनी घ्यायला हवा.
९) थोडेफार सामान इकडे तिकडे हलवून स्वयंपाकघरातील किंवा घरातील रचना बदलता येईल का याबाबत चर्चा करता येईल. ही रचना बदलण्याअगोदर ज्या वस्तू सरकवायच्या असतील त्यांची मापं घ्यावी लागतील. मुलांच्या सल्ल्यानुसार रचना एकवेळ बदलून पाहायला हरकत नाही.
१०) सर्वांनी मिळून सर्वांचे कपड्यांचे, पुस्तकांचे खण आवरणं.
११) खण आवरत असताना बटण लावणं, हुक लावणं, कपडा शिवणं, टीप घालणं यासाठी मुलांची मदत घ्यावी.
१२) एखाद्या संध्याकाळी मुलांना साडीच्या दुकानात घेऊन जाता येईल. तेथील निरनिराळ्या साड्या, त्यांचे रंग, काठ, पोत, डिझाइन्स, याची मुलांना ओळख करून द्या.
१३) आपल्या घरापासून स्टेशनपर्यंत/ घरापासून शाळेपर्यंत/ घरापासून एस.टी. डेपोपर्यंत चालत जाण्यास उपयुक्त ठरेल असा नकाशा काढणं. वाटेत बँक, लोहमार्ग, देऊळ, मशीद, चर्च, मेडिकलचं दुकान, हातपंप अशा आणि इतर गोष्टी असू शकतात. यासाठी विशिष्ट खुणांचा वापर करणं. शक्य असल्यास प्रमाणित स्केलचा वापर करणे. (पावलांनी अंतर मोजणे. पन्नास पावले म्हणजे एक सें.मी. या पद्धतीने स्केल घेऊन नकाशा काढणे.)
१४) आपल्याला पत्त्यांचे वेगवेगळे खेळ येत असतात. आजी-आजोबांच्या किंवा इतर कुणाच्या मदतीनेसुद्धा मुलांना पत्त्यांचे नवनवीन खेळ शिकवावेत. बदाम सात, गुलाम चोर, नॉट अ‍ॅट होम, लॅडीज, झब्बूचे वेगवेगळे प्रकार, मुंबरी, मेंढीकोट, तीनशे चार, पाच तीन दोन, सात आठ इ.
१५) बाजारातून नुसते खेळ विकत आणून ते मुलांसमोर टाकले (म्हणजे गुरांसमोर चारा टाकतात तसे) तर मुलं अशा खेळांशी फार वेळ खेळत नाहीत. आपणाला मुलांसोबत खेळावे लागते. वेळप्रसंगी हरावे लागते. तेव्हाच आवडीने मुलं त्या खेळाशी खेळू लागतात. उनो, स्पेलो फन, ब्रेनव्हिटा, चायनीज टॅनग्राम असे काही खेळ चांगले आहेत.
१६) विज्ञानाचे सोपे प्रयोग समजावून सांगणारी अनेक मराठी व इंग्रजी पुस्तके आता उपलब्ध आहेत. त्यातील सोपे प्रयोग मुलं स्वत:हून करू शकतील.
१७) घराजवळच्या बँकेत मुलाच्या नावानं खातं सुरूकरता येतं. त्यासाठी मोठ्या माणसांनी त्याच्या सोबत बँकेत जावं. खाते उघडण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया मुलांनीच पार पाडावी. अगदी आवश्यकच असेल अशा ठिकाणी पालकांनी मुलांना मदत करावी. मुलांनी आपल्या खाऊच्या पैशातून प्रत्येक महिन्याला थोडीफार बचत करावी.
१८) गावातील प्रत्येक दुकानाची पाटी ही वेगळी असते. म्हणजे त्यावरील अक्षरलेखन, रंगसंगती, आकार, त्यावरील चित्रे इ. याचे मुलांनी काळजीपूर्वक निरीक्षण करावे. त्याप्रमाणे वर्तमानपत्रातील जाहिराती, लेखांची शीर्षके पण काळजीपूर्वक पाहावीत. विशिष्ट वस्तूंचा किंवा गोष्टींचा अर्थ शब्दातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच सुलेखन. मुलांनी एक सुलेखन वही तयार करावी. त्या वहीत प्राणी, पक्षी, फळे, फुले, निरनिराळ्या वस्तू यांची नावे वेगवेगळ्या पद्धतीने लिहावीत. 
१९) गाजर, मुळा, काकडी, टोमॅटो किंवा बीट यांची कोशिंबीर करणं मुलांना जमू शकतं. मुलांनी केलेली कोशिंबीर पालक आनंदाने खातील.
२०) एखाद्या संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी मिळून भेळ तयार करावी. कुणी कुठलं काम करायचं याचं नियोजन मुलांनी करावे.
२१) ‘चटकदार भेळेची रंगीत तालीम’ झाल्यावर पालकांनी मुलांच्या मित्रांना घरी बोलवावं व त्यांना भेळ खिलवावी.
२२) मुलांना गोष्टींची पुस्तके किंवा वर्तमानपत्रातील वेगळ्या बातम्या, पुरवणीमधील एखादा लेख वाचून दाखवा.
२३) सुटीत खाल्लेल्या फळांच्या बिया जमवा, सुटी संपल्यावर पावसाळ्यातल्या पहिल्या रविवारी मुलांसोबत गावाबाहेर जा. मुलांच्या मदतीने छोटे-छोटे खड्डे खणून बिया त्यात पसरून टाका.
२४) आपल्या नातेवाइकांकडून, शेजाऱ्यांकडून, जिथून मिळतील तिथूून बिया गोळा करा. मुलांच्या मदतीने ‘बी बँक’ तयार करा.
२५) एका रविवारी घरातल्या सर्वांनी ‘आपले कपडे आपण धुवायचे असं ठरवा. मुलांसोबत पाण्यात थोडा दंगा पण करा.
२६) महिन्यातून एक दिवस मुलाने आईसोबत स्वयंपाकघरात स्वयपाक करावा.
२७) मुलांकडे काही कल्पना असू शकतात. मुलांच्या मदतीने घराला वेगळा चेहरा द्या.
२८) नातेवाईक व ओळखीचे यांचे पत्ते व फोन नंबर असणाऱ्या दोन वेगवेगळ्या वह्या मुलांच्या मदतीने तयार करा. या वहीत मुलांच्या मित्रांचे पत्ते व फोन नंबर असतील याची काळजी घ्या.
२९) आपल्या परिसरात काही विशेष मुलं असतात. अंध, दिव्यांग मुलं असतात. त्यांच्याशी गप्पा मारणं, त्यांना पुस्तकं वाचून दाखवणं किंवा त्यांना बागेत घेऊन जाणं असं करता येईल.
३०) मुलांनी आणि पालकांनी मिळून एक गट तयार करावा. या गटानं मिळून एखाद्या रविवारी गावातील बाग स्वच्छ करावी. किंवा नगर वाचनालयातील पुस्तके आवरून साफ करून द्यावीत.
३१) मुलांच्या वहीतील कोरे कागद फाडून घ्यावेत. मुलांच्या मदतीने हे कागद शिवून त्याची वही करावी. रफ वही म्हणून ही वापरता येते.
३२) घरी येणाऱ्या निमंत्रण पत्रिका किंवा काही जाहिराती जमवाव्यात. हे पाठकोरे कागद एका आकारात कापावेत. वरच्या बाजूने शिवावेत किंवा स्टेपल करावेत. पटकन काही लिहिण्यासाठी या पॅडचा चांगला उपयोग होतो.
यादी आणखी पण वाढविता येईल, पण त्यासाठी मुलांची सुटी वाढविता येणे शक्य नसल्याने आता इथेच थांबावे म्हणतो.