- अतुल कहाते
सौदी अरेबियानं ‘सोफिया’ या ‘स्त्रीलिंगी’ यंत्रमानवाला नागरिकत्व देण्याची घोषणा केल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. माणूस आणि यंत्रमानव यांच्यामधले फरक पुसट होत चालले असताना सौदी अरेबियानं एकीकडे स्त्रियांना दुय्यम वागणूक देण्याचं आपलं जुनाट धोरण कायम राखताना सोफियाला पायघड्या घालून आपल्या देशात कशाला मिरवू द्यायचं, असा प्रश्न अनेक जणांनी उपस्थित केला आहे.
स्त्रियांना सौदी अरेबियामध्ये बुरखा घालून वावरावं लागतं. अगदी अलीकडे स्त्रिया फुटबॉलचे सामने स्टेडियममध्ये जाऊन बघणं, वाहन चालवणं अशा अगदी सर्वसामान्य गोष्टी करू शकतील अशी धोरणं सौदी अरेबियानं जाहीर केली आहेत. यामागे तेलाचं सौदी साम्राज्य अनेक कारणांनी धोक्यात येण्याचा मुद्दाही आहेच. कधी नव्हे ते सौदी अरेबियाला आर्थिक प्रश्न, बेकारी अशा समस्या भेडसावण्याची दाट चिन्हं दिसायला लागली आहेत. साहजिकच सौदी राजवटीच्या विरोधातलं मत चळवळींमध्ये बदलू नये यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
याचाच एक भाग म्हणजे स्त्रियांना दिली जाणारी विषम वागणूक बदलून त्यांना जरा मानाचं स्थान देणं हा असू शकतो.
सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना बुरख्याच्या पडद्या आड वावरावं लागतं, या पार्श्वभूमीवर या सोफियाची चर्चा करताना ट्विटरवर काही जणांनी खवचटपणे ‘या सोफियाचा बुरखा कुठे आहे?’ असा सौदी राजवटीला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला आहे. दुस-या एका स्त्रीनं ‘फक्त विदेशी आणि यंत्रमानव प्रकारच्याच स्त्रीला सौदी अरेबियामध्ये पूर्ण स्वातंत्र्य दिलं जातं’ असं म्हटलं आहे.
सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना मिळणारी वागणूक हा गंभीर विषय आहेच. त्यांच्या सामाजिक वर्तनाचं नियमन करणारे कायदे मोडले तर स्त्रियांना चाबकाच्या फटक्यांसह दंड, तुरुंगवास अशा भयानक शिक्षांना तोंड द्यावं लागतं.
एकीकडे अमेरिकेच्या साथीनं कट्टरवादी देशांशी सौदी अरेबिया लढतो खरा; पण दुसरीकडे आपल्या देशात अतिकट्टर आणि पूर्णपणे कालबाह्य झालेली स्त्रीद्वेष्टी धोरणं मात्र तो राबवतो. सोफियाच्या आगमनामुळे सौदी अरेबियाची नेमकी हीच पंचाईत झाली आहे. अचानकपणे सौदी अरेबिया उदारमतवादी झाला असल्याचा मुखवटा धारण करत असल्याविषयी आता जगभरात आश्चर्ययुक्त चर्चा सुरू झाली आहे.
सौदी अरेबियाला आधुनिक तंत्रज्ञानाचं महत्त्व ठाऊक आहे. आपण आता फक्त तेलाच्या जोरावर इतर देशांकडून आपल्याला हवं ते मिळवू शकणार नाही हे सौदी राजवटीला कळून चुकलं आहे. साहजिकच रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यासारख्या तंत्रज्ञानाचा आपण फक्त स्वीकार करून
भागणार नाही, तर हे तंत्रज्ञान सौदी अरेबियामध्ये विकसित व्हावं यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा आधुनिक तंत्रज्ञानाचं काम सौदी भूमीवर हाती घेण्यासाठी किती कंपन्या उत्सुक असतील याची सौदी राजवटीला खात्री नाही.
जगभरातल्या उत्तमोत्तम कंपन्यांनी सौदी अरेबियामध्ये या तंत्रज्ञानाच्या निमित्तानं गुंतवणूक करावी; तसंच आपल्या प्रतिमेतही बदल घडावेत अशा दुहेरी हेतूनं सौदी अरेबियानं सोफियाला नागरिकत्व देण्यासंबंधीचा काहीसा संभ्रमात टाकणारा निर्णय जाहीर केला असावा.
सौदी अरेबियानं स्त्रियांवर नुसती बंधनं घातलेली आहेत असं नाही; तर त्यांना पुरुषांच्या आधाराविना जगणं शक्य नसतं, त्यांना बंधनात अडकवणं गरजेचं असतं अशा संकल्पनांवर आधारित असलेली धोरणं हा देश राबवतो.
उदाहरणार्थ- कुठल्याही स्त्रीला पासपोर्ट मिळावा का, तिला इतर देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असावी का, तिचं लग्न कधी आणि कुणाशी व्हावं हे सगळे निर्णय पुरुषच घेतात.
सौदी अरेबियामध्ये एकट्या राहणाºया स्त्रीनं स्वतंत्रपणे एखादी नोकरी शोधावी किंवा भाड्यानं मिळणाºया घरात एकट्यानं राहावं अशा गोष्टी जवळपास अशक्य आहेत. आजच्या जगात हास्यास्पद वाटाव्यात अशा या गोष्टी सगळ्यांना खटकत असूनही सौदी अरेबिया त्याविषयी काहीच करत नाही. म्हणूनच ‘फ्रीडम हाउस’ या स्वायत्त संस्थेच्या अहवालानुसार नागरिकांना दिले जाणारे हक्क डावलणाºया देशांच्या यादीत सौदी अरेबियाचा
क्र मांक वरून दहावा येतो!
आता अशी परिस्थिती असलेल्या देशामध्ये ‘स्त्रीलिंगी’ यंत्रमानवानं नक्की काय करणं योग्य आहे आणि काय करणं नियमबाह्य आहे हे कसं ठरवायचं?
जपानमध्ये जवळपास मानवी वाटाव्यात अशा प्रकारच्या ‘स्त्रीलिंगी’ यंत्रमानवाचा वापर पुरुष आपल्या जोडीदारासारखा खूप मोठ्या प्रमाणावर करतात. तिथल्या सामाजिक परिस्थितीमुळे हे घडत असल्यामुळे स्त्री-पुरुष संबंध भविष्यात नक्की कसे असतील याविषयी अत्यंत गंभीर चर्चा तिथे सुरू आहे.
भावनिक ते शारीरिक अशा सगळ्या गरजा पुरुष इथून पुढे हाडामासांच्या जोडीदाराऐवजी या यांत्रिक जोडीदाराकडूनच भागवून घेतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
चक्रावून सोडणारा हा प्रकार सौदी अरेबियामध्ये कशावरून घडणार नाही? आधीच दुय्यम असलेल्या स्त्रियांना अशा परिस्थितीत काय भोगावं लागेल?
स्त्री-पुरुष संबंध आणि स्त्रियांना दिली जाणारी दुय्यम वागणूक हा अनेक शतकांपासून चालत आलेला प्रश्न यंत्रमानवाच्या आगमनामुळे सुटणं तर दूरच; पण उलट आणखी क्लिष्ट होत जाणार अशी विचित्र भीती या निमित्तानं पुढे आली आहे.
आपल्याकडेही या प्रश्नाविषयी गांभीर्यानं विचारमंथन होणं म्हणूनच अत्यंत गरजेचं आहे!


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.